पर्यावरणाची हानी न करता किनार्‍यांवरील शॅक हटवा

0
162

>> पर्यटन खात्याचा शॅक मालकांना आदेश

राज्यातील यंदाच्या पर्यटन मोसमाची काल सांगता झाली. पर्यटन खात्याने समुद्र किनार्‍यांवर शॅक मालकांनी उभारण्यात आलेले शॅक पर्यावरणाची हानी न करता हटविण्याची सूचना केली आहे.

पर्यटन खात्यातर्फे पर्यटन मोसमात दरवर्षी समुद्र किनार्‍यांवर शॅक चालविण्यासाठी शॅक मालकांना जागांचे वितरण केले जाते. पर्यटन खात्याने उपलब्ध केलेल्या जागेत शॅक मालकांकडून शॅकची उभारणी केली जाते. पर्यटन खात्याने एका आदेशाद्वारे शॅक हटविण्याची सूचना केली असून तत्‌संबंधीचा अहवाल १० जूनपर्यंत सादर करावा, असे सूचित केले आहे.

शॅक मालकांनी शॅकचे सामान कशा पद्धतीने हटविले याबाबत २० जूनपर्यंत अहवाल सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. काही शॅक मालकांकडून शॅक उभारण्यासाठी वापरलेले साहित्य समुद्र किनार्‍यांवर वाळूमध्ये पुरून ठेवले जाते. तर काही जणांकडून सामानाला आग लावून विल्हेवाट लावली जाते.
एखादा शॅक मालक शॅक हटविताना पर्यावरणाचे नुकसान करीत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. त्याला २०१८-१९ च्या पर्यटक हंगामात शॅक उभारण्यासाठी परवानगी देण्यावर फेरविचार केला जाऊ शकतो. पर्यटन खात्याच्या सूचनांचे शॅक मालकांनी वेळेवर पालन करावे. अन्यथा त्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाणार आहे, असा इशारा पर्यटन खात्याने दिला आहे.