पर्यावरणाचा समतोल राखून खाण उद्योग सुरू करा

0
155

>> राज्यातील कामगार संघटनांची जाहीर सभेत मागणी

गोवा खाण महामंडळाची स्थापना आणि पर्यावरणाचा समतोल राखून राज्यातील बंद पडलेला खाण व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी प्राधान्यक्रम द्यावा. कामगार कायद्यात बदल करू नये, अशा मागण्या राज्यस्तरीय कामगार दिन कार्यक्रमात काल करण्यात आल्या.

आयटक आणि सीटू या कामगार संघटनांनी कामगार दिनानिमित्त शहरातून भव्य रॅली काढली. कदंब बसस्थानकाजवळील क्रांती सर्कलजवळून रॅलीला सुरुवात करण्यात आली. येथील चर्च चौकाजवळ रॅलीचे जाहीर सभेत रूपांतर झाले.
खाण कंपन्यांनी कामावरून कमी केलेल्या कामगारांना पुन्हा सेवेत सामावून घ्यावेत, स्थानिकांना ८० टक्के रोजगाराची हमी द्यावी, सरकारी आणि खासगी कंपन्यांतील कंत्राटी पद्धत बंद करावी, कंत्राटी व तात्पुरत्या नोकरीवरील कामगारांना समान काम समान वेतन द्यावे, टॅक्सी, बस, रिक्षा ऑपरेटर, लघु व्यावसायिक आदींच्या हितरक्षणाला प्राधान्य द्यावे, सातवा वेतन आयोग सर्व सरकारी महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्थांना लागू करावा, कामगारांना किमान वेतन २० हजार रुपये द्यावे आदी ठराव कामगार दिन कार्यक्रमात संमत करण्यात आले आहेत.

कामगार नेते ख्रिस्तोफोर फॉन्सेका यांनी केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध केला. देशात कामगारांच्या हितार्थ कार्यरत असलेले ४४ कामगार कायदे बदलण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. कामगार कायद्यात बदल केल्यास कामगारांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. कामगारांच्या हितासाठी कायद्यात आवश्यक सुधारणा करण्याची गरज असताना केंद्र सरकार केवळ बड्या उद्योगपतींचे हित डोळ्यांसमोर ठेवून कामगार कायद्यात बदल करण्यासाठी प्रयत्न करीत आहे, असा आरोप फॉन्सेका यांनी केला.

देशात अस्तित्वात असलेले महत्त्वाचे कामगार कायदे मोडीत काढून केवळ ४ कामगार कायदे तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कामगार कायद्यातील दुरुस्तीला सर्वांनी विरोध केला पाहिजे. कामगारांना मिळणारे ३५० रुपये किमान वेतन तुटपुंजे आहे. किमान वेतनात वाढ करण्याची गरज आहे, असे ऍड. सुहास नाईक यांनी केली.
विदेशातील कामगार कायद्याच्या धर्तीवर देशातील कामगार कायद्यात बदल करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हा कायदा तयार केल्यास कुणालाही कायम स्वरूपी नोकरी मिळणार नाही. कामगारांना मिळणार्‍या सुविधा कमी होणार आहे. कामगार कायद्यात दुरुस्तीचा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे, असेही ऍड. नाईक यांनी सांगितले.
यावेळी कामगार नेते राजू मंगेशकर, आनंद बेतकीकर, नरेश शिगावकर, कमलाकांत गडेकर, सावियो ब्रागांझा आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमात निवृत्त कामगार आयुक्त रत्नकांत म्हार्दोळकर, कलाकार शंकुतला भरणे, कामगार नेते एस. एस. नाईक व इतरांचा सन्मान करण्यात आला. आयटकचे अध्यक्ष प्रसन्न उटगी यांनी स्वागत केले.