पर्यावरणाचा मान राखलाच पाहिजे

0
223
  • देवेश कु. कडकडे (डिचोली)

आपण यशस्वी पर्यायी विकासाचा वेध न घेता पर्यावरणाच्या हानीकडे दुर्लक्ष करून अल्पवेळात ज्या क्षेत्रातून पैसा खुळखुळतो तेच क्षेत्र निवडण्याकडे भर देतो. हे असेच चालू राहिले तर निसर्गाच्या हिरव्यागार सान्निध्यात मिळणारी सुख, शांती आणि गारवा हरवून बसू.

मानवी जीवनात पर्यावरणाचे महत्त्वपूर्ण स्थान आहे, याची आपल्याला आता विविध घटनांमधून जाणीव होऊ लागली आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या संवर्धनासाठी अनेक संस्था पुढे सरसावल्या आहेत. ग्रामीण भागातील लोकांना पर्यावरणाविषयी आस्था असते. खास करून आदिवासी समाजाचे पर्यावरणाशी जिवाभावाचे नाते आहे. मात्र, शहरी भागात कोणाला त्याची फिकीर नसल्याचे दिसते. जागतिक तापमानवाढ, हवामानातील बदल, पावसाचा लहरीपणा, चक्रीवादळे, महापूर, दुष्काळ, वणवा आणि कचरा इत्यादी विषयांवर आता गांभीर्याने विचारविनिमय होत आहे. शहरातून निसर्ग हरवत चालला आहे. त्यामुळे शहरातील माणसे निसर्गाच्या सान्निध्यात जाण्यासाठी खेडेगावात पिकनिक काढत असतात. मानवाकडून पर्यावरणाचा ज्या तर्‍हेने र्‍हास होत आहे, त्याला अनुसरून भविष्यकाळात पृथ्वीवरील सर्व प्राणिमात्रांचे जीवन धोक्यात येणार आहे. हजारो वर्षांपासून मानव निसर्गाशी मिळतेजुळते घेत आपले जीवन कंठीत होता.

आपल्या संस्कृतीने निसर्गाला देव मानून त्याची पूजा करण्याची परंपरा आहे. त्यातूनच नागपंचमी, नारळी पौर्णिमा, गणेश चतुर्थी यासारखे सण अस्तित्वात आले. गणेश चतुर्थीच्या काळात आपण माटोळीच्या स्वरूपात रानावनातील दुर्मीळ वनस्पतींची पूजा करून निसर्गाशी नाते जोडत असतो. ‘जगा आणि जगू द्या’ हा आपल्या संस्कृतीचा मूलमंत्र आहे. १९ व्या शतकात औद्योगिक क्रांतीमुळे आणि शास्त्रीय प्रगतीपुढे मानवाच्या गरजा वाढल्या. त्यातून हावरटपणाच्या नादात पर्यावरणाचा विनाश होण्यास प्रारंभ झाला. औद्योगिक कारखान्यातून येणार्‍या धुरामुळे अनेक इमारती काळवंडल्या आणि माणूस फुप्फुसाच्या विकारांनी आजारी पडू लागला. तीव्र गतीने वाढणार्‍या लोकसंख्येच्या कारणामुळे त्यांच्या पोषण आणि इतर अत्यावश्यक साधन सुविधांसाठी वैज्ञानिक आणि तांत्रिक ज्ञानाचा अंदाधुंद वापर झाला. गृह, उद्योग, रस्त्याच्या निर्माणासाठी जंगलाची बेसुमार तोड, डोंगर कापणीसारखे प्रकार मागचा पुढचा विचार न करता कृतीत येऊ लागले. हळूहळू पर्यावरणाला निर्माण होणारे धोके जसे लक्षात येऊ लागले, त्याने भविष्यात पुढच्या पिढीला त्याचे उग्र स्वरूपाचे दुष्परिणाम भोगावे लागतील.

पर्यावरण म्हणजे पाणी, जमीन, हवामान, प्राणी, वनस्पती आणि नैसर्गिक साधनसंपत्ती ही मानवासाठी आवश्यक आहे. या पर्यावरणाच्या कुटुंबाचा एक प्रमुख सदस्य असलेला मानव आपले उत्तरदायित्व विसरला आहे.

जलप्रदूषण, हवा प्रदूषण, मातीचे प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, औद्योगिकीकरण, जंगलांचा विनाश, आम्लधर्मी पाऊस, ग्लोबल वॉर्मिंग यांच्या घातक परिणामांपासून वाचण्यासाठी अथक प्रयत्नांची आवश्यकता आहे. वातावरणातील प्रदूषणकारी घटकांमध्ये पडणारा पाऊस हा दिवसेंदिवस आम्लधर्मी होत असून त्याचा सजीवांवर घातक परिणाम होतो. कीटक, जीव जंतू यांच्यावर फवारे करण्यासाठी वापरण्यात येणारी रासायनिक औषधे पावसाळ्यात पाण्याबरोबर अनेक विषारी घटक जमिनीमध्ये खोल जातात आणि त्याचा जमिनीच्या सुपिकतेवर परिणाम होतो. आज शहरीकरणामुळे ५० टक्क्यांपेक्षा जास्त जंगले नष्ट झाली आहेत. त्यामुळेच बिबटे, हत्ती, रानडुक्कर यांसारखे प्राणी मानवी वस्तीत धुडगूस घालीत आहेत. ही घुसखोरी माणसांची की या प्राण्यांची हा आता मोठा प्रश्‍न आहे. जर मानवाने त्यांचा भाग काबीज करण्याचा प्रयत्न केला, तर ते मानववस्तीत येऊन धुडगूस घालणारच.
आपल्या हक्कांसाठी सदैव जागृत असणारा मनुष्य मात्र वनप्राण्यांच्या हक्कांची पायमल्ली करीत असतो. वन हे देशाचे वैभव आहे तर वनाचे वैभव आहे वन्य जीव. जिथे वृक्ष तोडले जातात तिथे परत लागवड न केल्यामुळे जमिनीला क्षती पोचते. वृक्षारोपण, वृक्ष संगोपन, वृक्षसंवर्धन कृतिशील रीतीने करावे लागेल. अनेक संस्था वृक्षलागवडीसाठी अनेक लक्षणीय उपक्रम राबवताना दिसतात. घरात अपत्य जन्माला आले तर त्या आनंदाने एका वृक्षाची लागवड करावी आणि पुढे मुलाला त्याचे संगोपन करण्यास शिकवावे. त्यामुळे मुलाचे आणि त्या वृक्षाचे भावनिक संबंध जुळतील, तसेच घरात मृत व्यक्तीच्या नावानेही वृक्षारोपण करावे म्हणजे त्याची आठवण सदैव राहील. जंगले नष्ट झाली तर सल्फ्युरिक ऍसिडचा पाऊस पडू शकेल आणि पृथ्वीची वेळीच काळजी घेतली नाही तर एक हजार वर्षांत मानवजात नष्ट होईल, असा इशारा महान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी दिला आहे. मानवाने आपल्या भौतिक सुखासाठी केलेली जंगलाची कत्तल हे पर्यावरणाच्या र्‍हासाचे प्रमुख कारण आहे. वृक्षांचे महत्त्व अपरंपार आहे.

अण्णा हजारेंनी गावकर्‍यांना बरोबर घेऊन पाच लाख वृक्षांची लागवड केली आणि पाण्याची समस्या कायमची सोडवली. जागतिक तापमानाच्या वाढत्या परिणामांच्या कक्षात जी २७ राष्ट्रे येतात त्यात भारताचाही समावेश आहे. ही आता चिंताजनक बाब आहे. जगाचे तापमान वाढतच राहिले, तर अनेक देश पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबई बेटांबद्दल शास्त्रज्ञांनी वेळोवेळी सावधगिरीचा इशारा दिला आहे. हवामानातील बदल हा आपल्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. पिकांचा स्थानिक हवामानाशी जवळचा संबंध असतो. त्याचा पिकांवर परिणाम होतो. दुष्काळ, अवकाळी पावसामुळे पिके नष्ट होऊन शेतकरी कर्जबाजारी होतो आणि आत्महत्येचा मार्ग निवडतो.

माणसाला शुद्ध हवा, शुद्धपाणी मिळेनासे झाले आहे. मनुष्य आपल्या सुखशांती आणि सुबत्तेसाठी वाटचाल करीत असतानाच आपल्या वाटेवरती प्रदूषणाचे काटे पसरवीत आहे. आपली बुद्धिमत्ता आणि महत्त्वाकांक्षेने पर्यावरणाच्या माध्यमातून त्याने आपला विकास साधला. मात्र, त्याची परतफेड करायला विसरला. केवळ भौतिक विकासाची झापडे लावलेले राजकारणी आणि त्याच्यामागे फरफटत जाणार्‍या समाजाला शास्त्रज्ञांनी दिलेल्या धोक्याची दखल घ्यावीशी वाटत नाही. पृथ्वीवरील सर्वांत हावरट असलेल्या मनुष्याने नेहमी ओरबाडण्याचे काम केले.
नदी, तलाव, सरोवर इत्यादींच्या पाण्याच्या अतिरेकी उपसा यांचा फटका पाणथळ जागांना बसला. अनेक जलचर प्राणी निघून गेले, स्थलांतरित झाले तर काही निराधार झाले. समुद्र, नद्यांतील प्रदूषणाने समुद्र मासेमारीवर संकट कोसळले आहे. आपल्या नद्या गटार बनत चालल्या. मनुष्याने आपल्याला सर्व बाजूने सोयीसुविधा निर्माण केल्या. मात्र, इतर प्राण्यांचा आधार हरवला. गेल्या ५० वर्षांत अनेक झाडांच्या, प्राण्यांच्या जाती नष्ट झाल्या. जंगले, डोंगर यांच्यामध्ये घट होत गेली. वाढत्या विकासाबरोबर हवा, पाणी, घन कचरा आदींच्या प्रदूषणाचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला असल्यामुळे पाणी आणि अशा वस्तूंचा पुनर्वापरावर अधिक भर देण्याची आवश्यकता आहे.

दुर्दैव हेच की आपण यशस्वी पर्यायी विकासाचा वेध न घेता पर्यावरणाच्या हानीकडे दुर्लक्ष करून अल्पवेळात ज्या क्षेत्रातून पैसा खुळखुळतो तेच क्षेत्र निवडण्याकडे भर देतो. हे असेच चालू राहिले तर निसर्गाच्या हिरव्यागार सान्निध्यात मिळणारी सुख, शांती आणि गारवा हरवून बसू. पुढच्या पिढीसाठी नैसर्गिक संपन्नता, किनारे, रानेवने, स्वच्छ जल, हवा याची शाश्‍वती कशी देणार?