पर्यटन खात्याला साधनसुविधांसाठी केंद्र सरकारकडून १०० कोटींचा निधी

0
99

स्वदेश दर्शन योजनेखाली गोवा पर्यटन खात्याला केंद्र सरकारकडून १०० कोटी रु.चा मदत निधी मंजूर झालेला आहे. या योजनेखाली राज्यातील विविध किनार्‍यांवर पर्यटकांसाठी साधनसुविधा उभारण्यात येणार असून त्यावर चर्चा करण्यासाठी पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर यांनी आज ४ सप्टेंबर रोजी एक उच्चस्तरीय बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत आमदार व किनारपट्टी तालुक्यातील सरपंच उपस्थित राहणार असल्याचे काल पर्यटन खात्यातील सूत्रांनी सांगितले.
स्वदेश दर्शन योजनेखाली राज्यातील किनार्‍यांवर शौचालये, कपडे बदलण्यासाठीच्या खोल्या, लॉकर सुविधा, पार्किंगची सोय व सुशोभिकरण, विजेची रोषणाई आदी विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत. ह्या विकासकामांसाठीचा आराखडा तयार करताना आपण किनारपट्टी भागातील पंचायतींच्या सरपंचांना विश्वासात घेणार असल्याचे मंत्री आजगावकर यांनी स्पष्ट केले आहे.
ही योजना मार्गी लावण्यासाठी आमदार व सरपंच आवश्यक ते सहकार्य करतील व आजच्या बैठकीला मोठ्या संख्येने हजर राहतील, असा विश्‍वास आजगावकर यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील किनार्‍यांवर वरील साधनसुविधा वाढवल्यानंतर राज्यातील पर्यटनाला गती मिळणार असून किनारपट्टीवर येणार्‍या पर्यटकांची चांगली सोय होणार असल्याचे आजगांवकर यांनी म्हटले आहे.