पर्यटन क्षेत्रातील समस्यांवरील नियंत्रणासंदर्भात उच्चस्तरीय बैठक

0
119

>> मुख्यमंत्री पर्रीकरांकडून आयोजन

पर्यटन स्थळी होणारी भांडणे, पर्यटक समुद्रात बुडून मृत्यूमुखी पडण्याच्या घटना, पर्यटक व इतरांकडून मद्यप्राशन करून वेगाने वाहने चालवण्याचे घडणारे प्रकार आदींवर कसा आळा आणता येईल यावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज सोमवारी एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले आहे.
पर्यटक समुद्रात बुडून मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण कसे खाली आणता येईल, किनारपट्टी भागांत होणारी भांडणे व पर्यटकांवरील हल्ले कसे नियंत्रणात आणता येतील, सूर्यास्तानंतर पर्यटकांनी समुद्रात उतरू नये यासाठी कोणती उपाययोजना हाती घेणे शक्य आहे. किनार्‍यावर दारू, अमली पदार्थ आदींचे सेवन करून धिंगाणा घालण्याचे जे प्रकार घडतात ते घडू नयेत यासाठी काय उपाय करण्याची गरज आहे, याबाबत मुख्यमंत्री, अधिकारी व पर्यटन क्षेत्रातील लोकांशी चर्चा करणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
पर्यटन स्थळी अमली पदार्थांचा व्यवहार करणार्‍यांवर पोलिसांनी व विशेष करून पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी विभागाने कोणती पावले उचचली याचाही ह्या बैठकीत आढावा घेण्यात येणार आहे.
काही पर्यटक अतिसाहसाचे प्रदर्शन घडवीत दारू ढोसून अथवा सूर्यास्तानंतर समुद्रात उतरण्याचे तसेच किनार्‍यापासून घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त खोल समुद्रात जाण्याचे जे कृत्य करीत असतात अशा पर्यटकांवर कारवाईची गरज असल्याचे पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर यांनी हल्लीच नमूद केले होते. ह्या पार्श्‍वभूमीवर ही बैठक होत आहे.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या उच्च स्तरीय बैठकीला पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर, मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा व पर्यटन व्यावसायातील प्रतिनिधी हजर असतील. वरील समस्यांचे निराकारण करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करून कृती योजना निश्‍चित करण्यासंबंधी निर्णय घेण्यात येणार आहे.