पर्यटकांवर हल्ले

0
128

काश्मीरमध्ये शाळकरी मुलांच्या बसवर झालेल्या दगडफेकीची घटना ताजी असतानाच श्रीनगरहून गुलमर्गकडे निघालेल्या पर्यटकांच्या एका वाहनावर झालेल्या दगडफेकीत एक पर्यटक मृत्युमुखी पडला. काश्मीर खोर्‍यामध्ये गेली किमान आठ – दहा वर्षे हिंसाचार चालला आहे, परंतु पर्यटकांवर सहसा हल्ले होत नव्हते. जेव्हा दहशतवाद्यांनी तसे हल्ले चढवले तेव्हा स्थानिक काश्मिरी जनतेने त्या विरोधात प्रतिक्रिया व्यक्त केली होती, कारण पर्यटन हे लक्षावधी काश्मिरींसाठी रोजीरोटीचे साधन आहे. मात्र, या वर्षी काश्मीरमध्ये येणार्‍या पर्यटकांना लक्ष्य करण्याच्या घटना वाढत असल्याचे दिसते. आजवर दगडफेक करणारे काश्मिरी युवक केवळ लष्कर, निमलष्कर वा पोलिस यांनाच लक्ष्य करायचे, परंतु केंद्र सरकारने दहशतवाद्यांविरुद्ध स्वीकारलेले कठोर धोरण आणि त्याची परिणती म्हणून सातत्याने चाललेला देशद्रोह्यांचा खात्मा यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या शक्ती आता शाळकरी मुले आणि पर्यटक यांनाही लक्ष्य बनवू लागल्याचे दिसते आहे. खरे म्हणजे अशा प्रकारचे हल्ले हा काश्मिरींसाठी आत्मघातच ठरणार आहे. पर्यटन हे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेचे एक प्रमुख अंग आहे. राज्याच्या उत्पन्नात पर्यटनक्षेत्राचा वाटा सात टक्क्यांचा आहे. दहशतवाद आणि हिंसाचारामुळे गेल्या दोन वर्षांत खोर्‍यातील पर्यटनात मोठी घट दिसून आली आहे. पर्यटन वृद्धीसाठी मग जम्मू काश्मीर पर्यटन विभागाने जोरदार प्रयत्न केले. पत्रकारांचे दौरे आखले, पर्यटकांना ५० टक्के सवलत जाहीर केली, काश्मीर सुरक्षित आहे हा संदेश पोहोचवण्याची धडपड केली. तरीही गेल्या वर्षी पर्यटकांची संख्या रोडावलेलीच राहिली. आता थेट पर्यटकांनाच जर अशा प्रकारे लक्ष्य केले जाणार असेल तर काश्मीरच्या पर्यटनाचा कणा मोडून गेल्याशिवाय राहणार नाही. जवळजवळ पंचवीस लाख काश्मिरींचे पोट जरी पर्यटनावर चालत असले तरी पर्यटन नसेल तर ‘हम भूखे नही मरेंगे’ अशी भाषा तेथे ऐकू येते, कारण सफरचंद, अक्रोड आणि इतर सुक्या मेव्याचे मोठे उत्पन्न खोर्‍यात घेतले जाते. त्याची मोठ्या प्रमाणावर निर्यात चालते. काश्मिरी सफरचंदांची निर्यात १.७३ दशलक्ष मेट्रीक टनच्या घरात आहे. अक्रोडाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत काश्मीरचा वाटा सात टक्के आहे. शिवाय गालिचे, शाली, अक्रोडाच्या लाकडाच्या वस्तू वगैरे हस्तकलेचीही निर्यात होते. त्यामुळे अर्थात पैसा खुळखुळत असतो. पण पर्यटनात घट होणे म्हणजे रोजगाराला मुकणे ठरेल हे लक्षात घेणे जरूरी आहे. पर्यटनावर किती प्रकारचे लोक अवलंबून असतात पाहा – हॉटेलवाले, ट्रॅव्हल एजंट, भाडोत्री वाहनधारक, हाऊसबोटवाले, शिकारेवाले, घोडेवाले, गाईड, हस्तकला व्यावसायिक, पर्यटनस्थळांवरील दुकानदार ही सगळी मंडळी केवळ पर्यटनावर अवलंबून असते. हिंसाचारामुळे हॉटेल, हाऊसबोटींतील पर्यटकांच्या वास्तव्याचे प्रमाण अर्ध्याहून अधिक उतरले आहे. याचे खापर आजवर इलेक्ट्रॉनिक मीडियावर फोडले जात असे. केंद्रातील मोदी सरकारचा हा डाव असल्याचा आरोप होत होता. काश्मीरमधील दगडफेकीचा त्रास पर्यटकांना कधीही झालेला नाही, पण टीव्हीवाले अशा घटना अतिरंजित स्वरूपात दाखवतात असा काश्मिरी जनतेचा आक्षेप असे आणि ते खरेही होते. परंतु परवाची घटना जर पाहिली तर आता थेट पर्यटकांनाच लक्ष्य केले जाताना दिसते आहे. गेल्या काही दिवसांत काश्मीरमध्ये पर्यटकांवर अनेक ठिकाणी असे दगडफेकीचे प्रकार घडले आहेत. गेल्या ३० एप्रिलला केरळच्या पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. मुंबईची एक महिला जखमी झाली. आता चेन्नईचा २२ वर्षांचा तीर्थमणी दगडफेकीत हकनाक ठार झाला आहे. दगडफेक करणार्‍या काश्मिरी तरुणांना चिथावणी देणार्‍यांना पाकिस्तानातून पैसा येतो हे तर आता उघड गुपीत आहे. अशा दगडफेक करणार्‍यांना ‘संगबाज’ म्हणतात. हा एक धंदाच होऊन बसला आहे. त्यांना महिन्याला सात – आठ हजार रुपये ‘पगार’ मिळतो. कपडे मिळतात, बूट मिळतात. आयएसआयने आजवर यावर आठशे कोटी रुपये खर्च केल्याचे गुप्तचर यंत्रणांनी उघडकीस आणले आहे. फुटिरतावादी नेते त्या पैशात ऐषारामात राहतात. एवढे असूनही या दगडफेक करणार्‍या गावगुंडांवर लष्कर वापरत असलेल्या पेलेट गनवर केवढा गहजब करण्यात आला. दगडफेक करणारे हे आमचे ‘बच्चे’ आहेत असे मायेचे कढ मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्तींना येत होते. आज निरपराध पर्यटकांना हे ‘बच्चे’ लक्ष्य करू लागले आहेत, त्यावर मात्र आपली मान शरमेने झुकल्याचे नक्राश्रू त्या आणि उमर अब्दुल्ला ढाळत आहेत. दगडफेक करणारी टोळकी फोफावण्यास काश्मीरचे ढोंगी नेतृत्वच खरे तर जबाबदार आहे. पर्यटकांवरील या हल्ल्यांनी काश्मीरचीच कोंडी होईल. काश्मीरमध्ये येणारे पर्यटक कारगिल, लेह – लडाखकडे वळतील. काश्मिरींची भले उपासमार होणार नाही, परंतु बेरोजगारीचे मोठे संकट ओढवेल त्याचे काय? आत्मघाताकडे आपण वाटचाल करीत आहोत हे काश्मिरींना उमगायला हवे. पाकिस्तानला विकले गेलेले म्होरके आपल्याला वापरून घेत आहेत, देशोधडीला लावत आहेत हे या मंडळींना कधी कळणार?