पर्यटकांवर मेरशीत स्थानिक गुंडांचा तलवारींनी हल्ला

0
107

>> बसच्या काचा फोडल्या; महिलांवरही वार

>> १४ पर्यटक जखमी; तिघा स्थानिकांस अटक

गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या वसई – मुंबई येथील पर्यटकांच्या एका बसवर मेरशी येथील गुंडांनी तलवारी आणि चॉपरसह काल चढवलेल्या हल्ल्यात बसचालकासह चौदा प्रवासी जखमी झाले. त्यांपैकी तिघांची हाडे मोडली. जखमींमध्ये काही महिलांचाही समावेश आहे. पोलिसांनी विशाल गोलतेकर (३०), सूरज शेट्ये (४०) व लॉरेन्स डायस (३४) या तिघा स्थानिक तरुणांना अटक केली आहे. हल्ल्यावेळी पर्यटक बसमध्ये महिला, मुले व पुरुष मिळून ५० पर्यटक होते.

जखमींवर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करून जाऊ देण्यात आले. पर्यटक बसवरील या हल्ल्यामुळे गोव्यात येणार्‍या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, या प्रकरणी लवू यशवंत घोडेकर (वसई, पालघर) यांनी जुने गोवे पोलिसात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी विशाल गोलतेकर, लॉरेन्स डायस, सूरज शेट्ये व साई कुंडईकर या चौघांवर गुन्हा नोंदवला आहे.
मेरशी येथील एका पर्यटक निवासात रात्री वास्तव्याला राहिलेले मुंबईचे पर्यटक काल सकाळी तेथील बाजारातील एका रेस्टॉरंटमध्ये अल्पोपाहारासाठी गेले होते. नाश्ता करीत असलेल्या एका कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकाचा हात मागे बसलेल्या स्थानिक तरुणाला लागला. त्याने त्यावरून या कुटुंबाला शिवीगाळ केली. शिवी का देतोस असे विचारायला गेलेल्या पर्यटकांशी त्याची बाचाबाची झाली. यावेळी हॉटेल मालकाने हा वाद मिटवला, पण हे पर्यटक आपल्या ‘अलिशा’ या बसने परत जायला निघाले असता मोटारबाईकवरून आलेल्या दंडुके व चॉपरधारी तरूणांनी ही बस अडवली आणि दंडुक्यांनी बसच्या काचा फोडून टाकल्या. हल्लेखोरांनी बसचा दर्शनी आरसा तसेच बाजूचे आरशेही दगडफेक करून फोडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
बसमध्ये मुले व महिला असल्याने प्रसंगावधान राखून चॉपरधारी तरुणाला पकडले व पोलिसांशी संपर्क साधला. मात्र, पोलीस वेळेवर दाखल झाले नाहीत. दरम्यान, पकडलेल्या तरुणाच्या पंधरा – वीस सहकार्‍यांनी चॉपर आणि तलवारींनिशी पर्यटकांवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी पर्यटकांवर तलवारीचे आणि चॉपरचे वार करण्यात आले. भांडण सोडवायला गेलेल्या बसमधील महिलाही त्यातून सुटल्या नाहीत. त्यांच्यावरही वार झाले. अनेकांच्या हाता – पायांवर, पाठीवर वार झाले. या प्रकाराने हादरलेल्या पर्यटकांची पोलीस आल्यावरच सुटका झाली. हल्लेखोरांनी बसचा ड्रायव्हर शिवाजी शेळके यांना बसमधून ओढून बाहेर काढले आणि चारही आरोपींनी त्याला लाकडी दंडुक्याने जबर मारहाण केली. त्यामुळे ड्रायव्हर गंभीर जखमी झाला. यावेळी बसमधील पर्यटक व स्थानिकांनी दोघा आरोपींना पकडले तर साई कुंडईकर याने पळ काढला. या सार्‍या प्रकाराने गोव्यात पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटायला आलेल्या या पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. पर्यटकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मेरशी येथील तिघा गुंडांना अटक केली.

हल्लेखोर सराईत गुन्हेगार
पर्यटक बसवर हल्ला चढवून पर्यटकांना बेदम मारहाण करणारे आरोपी विशाल कळंगुटकर, लॉरेन्स डायस व सूरज शेट्ये हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांपैकी लॉरेन्स डायस याच्यावर कांपाल येथे एका युवतीवर बलात्कार केल्याचा आरोप असल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्ला प्रकरणी पोलिसांनी आरोपींवर ३४१, ३३५, ३२४, ३२६, ४२७, ३०६, ३५६, ५०४ व ५०६ कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.

कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही : पर्यटनमंत्री
पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यांविषयी पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांना विचारले असता ते म्हणाले की, कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाही नाही. मग ते गोमंतकीय असोत अथवा महाराष्ट्रीयन. पोलीस योग्य ती कारवाई करतील असे सांगून आपणाला नेमके काय झाले आहे ते माहीत नसल्याचे ते म्हणाले. मनोहर पर्रीकर हे गृहमंत्री असून ते सक्षम असे नेते आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास तो कसा हाताळावा याचे योग्य मार्गदर्शन ते पोलिसांना देतील, असे आजगावकर म्हणाले.