परेड मैदान झाडी व कचर्‍याच्या विळख्यात

0
89

>> फुटबॉल स्टेडियमची पायाभरणी होऊन उलटले १५ महिने!

काही वर्षांपूर्वी कांपालवरील बांदोडकर फुटबॉल स्टेडियम दर्जेदार फुटबॉल सामन्यांनी गजबजलेले असायचे. मात्र, शहरातील एक महत्त्वाचे क्रीडा केंद्र मानले जाणारे हे स्टेडियम सुमारे दशकभरापूर्वी तत्कालीन सरकारने मोडून टाकले. त्यानंतर आजतागायत शहरातील उदयोन्मुख फुटबॉलपटू फुटबॉल स्टेडियमसाठी टाहो फोडत आहेत. काही व्यक्ती – संस्थांनी त्यासाठी चळवळही उभारल्यानंतर कांपाल परेड मैदानावर स्टेडियम उभारण्याची घोषणा सरकारने केली. मोठा गाजावाजा करून २०१६ च्या मे महिन्यात तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते या स्टेडियमसाठी पायाभरणी केली. मात्र, पायाभरणीला १५ महिने उलटले तरी काम सुरूच झालेले नाही. उलट हे मैदान एक उकीरडा बनून राहिले आहे.
स्टेडियमची पायाभरणी होऊन सव्वा वर्ष उलटूनही कसलेच काम सुरू झाले नसल्याबद्दल फुटबॉलप्रेमींकडून नाराजी व्यक्त होते आहे. हे स्टेडियम उभारणीची जबाबदारी गोवा राज्य शहर विकास प्राधिकरण तथा जीसुडाकडे आहे. मात्र, या मैदानाकडे सध्या संबंधितांचे मुळीच लक्ष नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण सध्या या मैदानावर वनस्पती व झाडांचे घनदाट जंगल निर्माण झाले आहे. त्याखाली हजारो क्युबिक मीटर कचर्‍याचा डोंगर आहे. मैदानावर सर्वत्र सुमारे १५ फूट उंचीची घनदाट अशी झाडी वाढली असल्याने तेथेच झोपड्या बांधून राहणार्‍या लोकांकडून या झाडीचा वापर प्रातर्विधी उरकण्यासाठी केला जातो. बर्‍याच काळापासून पणजी महानगर पालिकेकडून येथे दररोज कचरा टाकला गेल्यामुळे तेथे कचर्‍याचे डोंगर निर्माण झाले होते. दरम्यान तो कचरा वेगळा करून त्याच ठिकाणी प्रक्रिया करण्याचेही काम सुरू होते. परंतु अजूनही मैदानावर प्रचंड प्रमाणात कचरा आहे.
दरम्यान, या प्रस्तावित फुटबॉल स्टेडियम उभारणीच्या अनुषंगाने जीसुडाचे सदस्य सचिव जगदिश होसमनी यांच्याशी संपर्क साधून या प्रकल्पाच्या सद्यस्थितीबद्दल विचारणा केली असता त्यांनी ‘आम्ही या प्रकल्पाच्या फाईलची प्रक्रिया सुरू केली आहे’, अशी माहिती दिली. प्रकल्पाची पायाभरणी होऊन १५ महिने उलटले याकडे लक्ष वेधले असता मैदानावरील कचरा हटविल्यानंतर ऑक्टोबरपासून स्टेडियम उभारणीचे काम सुरू होईल, असे होसमनी म्हणाले. मैदानावरील ४५ हजार क्युबिक मीटर कचरा हटविला आहे व सध्या ८ हजार क्युबिक मीटर कचरा आहे. मात्र पावसाळा अजून संपलेला नसल्याने नवीन वर्ष सुरू होईपर्यंत स्टेडियमचे काम सुरू होण्याची शक्यता नसल्याचे अनेकांचे मत आहे. ४६०० चौ. मी. क्षेत्राच्या प्रस्तावित स्टेडियमचा अंदाजित खर्च ४५ कोटी रुपये एवढा असल्याचे होसमनी यांनी सांगितले. हा खर्च आता वाढणार आहे काय असे विचारले असता त्यांनी नकारार्थी उत्तर दिले.
वर्षभरापूर्वी झालेल्या स्टेडियच्या पायाभरणी सोहळ्यास पर्रीकरांव्यतिरिक्त तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, शहर विकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा, महापौर सुरेंद्र फुर्तादो तसेच तत्कालीन शहर विकास खात्याचे संचालक एल्विस गोम्स आदी उपस्थित होते. सध्या परेड मैदानावर वाढलेल्या मोठ्या उंचीच्या वनस्पती तसेच तेथे काही परप्रांतियांनी झोपड्याही उभारल्या असल्याने उकीरड्याचे स्वरुप आले आहे.