परीक्षा शिक्षा नव्हे….वळण लावणारी दीक्षा!

0
114

– प्रा. रामदास केळकर
आली लग्न घटी समीप… असे वाक्य म्हणावे ती परीक्षा घटी समीप आलेली आहे. कोण दहावीच्या तर कोण बारावीच्या परीक्षेला आपल्या वर्षाच्या मेहनतीची शिदोरी घेऊन सज्ज झालेले आहेत. परीक्षेचे स्वरूप थोडेङ्गार बदलत जात असले तरी शेवटी परीक्षा ही परीक्षाच. आणि त्याचे थोडेङ्गार दडपण येणे स्वाभाविक. पण अनुभवाने असे दिसून येते की विद्यार्थ्यापेक्षा जास्त दडपण हे चक्क पालकावर आलेले असते. दिवसागणिक तुमचा अभ्यास आणि प्रत्यक्ष तो पेपरवर उतरावयाचा दिवस ह्यातील अंतर जसजसे कमी होत जाते तसे हे दडपण वाढत जाते. ते दडपण कमी व्हावे ह्या दृष्टीने हा लेख लिहिण्याचा प्रयत्न.
एखादा सैनिक असो वा खेळाडू प्रत्यक्षात युद्धभूमीवर, मैदानावर उतरत असतो तेव्हा तो तयारीनेच उतरलेला असतो. त्यासाठी त्याला सततचे मार्गदर्शन लाभलेले असते. हे मार्गदर्शन शास्त्रीय पद्धतीचे असते. कधी उठावे… पासून काय खावे?… ह्याचे निश्चित वेळापत्रक त्याला पाळावे लागते. ह्या शिदोरीवर तो युद्धभूमीवर वा मैदानावर बाजी मारत असतो. आपण परीक्षा देतेवेळी हीच रणनीती काटेकोरपणे अमलात आणली तर यश मिळविणे कठीण नाही. बरेचदा काही विद्यार्थी परीक्षेच्या अखेरीला जोरात अभ्यासाला लागत असतात, ते ङ्गार धोक्याचे असते. कैक वेळा काही गोष्टी आपल्या हाती असत नाही किंवा काही गोष्टींचा आपल्याला पूर्वीच अंदाज असेल तर अभ्यासाचे वेळापत्रक बिघडू शकते. उदा. घरी लग्न समारंभ असणे, आसपास वाढदिन किंवा स्पर्धा, मंदिरातले कार्यक्रम असतील तर त्याच्या भोंग्याने अभ्यासात व्यत्यय येऊ शकतो. एक म्हणजे आपण परीक्षेचे टेन्शन घेऊ नये. परीक्षा यायच्या वेळी येईलच. आपण नियमित पण मनापासून अभ्यास करत जावे. अशा मानसिकतेत केलेला अभ्यास लक्षात राहात असतो. ही मानसिकता तुम्हाला आशावादी राहण्यास मदत करेल. आपण शिक्षक मंडळीशी संवाद साधत असता पण कधी उत्तमरीत्या यश मिळविलेल्या माजी विद्यार्थ्याशी कधी संवाद साधलाय का? त्याचे अनुभव, उत्तर देण्याची संकल्पना, मुद्देसूद उत्तर देण्याची शैली आदींवर चर्चा केल्यास तुमच्या अभ्यासाला वेगळी दिशा मिळू शकते.
नियोजन :
कुठल्याही कार्याला नियोजनाने सुरुवात होत असते. आपला प्रत्येक दिवस महत्त्वाचा हे लक्षात घेऊन वेळापत्रकाची आखणी करा. एव्हाना दहावी, बारावी परीक्षेच्या पूर्व परीक्षा पूर्ण झालेल्या असतील. तेव्हा तुम्हाला प्रश्‍नपत्रिकेचे स्वरूप, कुठला विषय कठीण जाऊ शकतो ह्याची कल्पना आलेली असणारच. ज्या चुका तुमच्याकडून कळत नकळत झालेल्या असतील त्याची चर्चा तुम्ही तुमच्या त्या त्या विषयांच्या शिक्षकाकडे जरूर कराव्यात. कठीण भाग समजून घेण्याचा प्रयत्न करा. जो विषय कठीण त्याला जास्त वेळ द्यावा पण हे करताना अधून मधून पुरेशी विश्रांती. योग्य तिथे ब्रेक हवा. तसेच पुरेशी झोप घ्यायला टाळू नका. विषयानुरूप अभ्यास करताना जिथे पाठांतर आवश्यक आहे तिथे ते जरूर करावे. काही ङ्गार्मुल्याचे तक्ते, सनावल्यांच्या याद्या, महत्त्वाच्या शब्दांचे स्पेलिंग परत परत वाचून लक्षात ठेवा. ह्यांचे तक्ते तयार केल्यास उपयोगी पडतात. जर परीक्षेचे वेळापत्रक आलेले असेल तर ते लिहून नीट आपल्या अभ्यासाच्या खोलीत दिसेल असे ठेवा व त्याप्रमाणे अभ्यासाचे वेळापत्रक आखा.
• सराव :
कुठल्याही परीक्षेचा सराव अतिशय महत्त्वाचा असतो. प्रश्नपत्रिका सोडविल्यास तुम्हाला आत्मविश्वास तर येईलच शिवाय वेळेचे व्यवस्थापनही तुम्ही करू शकाल. जेवढा जास्त सराव तेवढा तुम्हाला आत्मविश्वास येईल. कुठल्या प्रश्‍नाला किती वेळ लागतो ह्याची कल्पना येईल. अलीकडे तुम्हाला ज्यादा वेळ दिला जातो त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता. ज्या पेनने तुम्ही सराव करत असता तेच पेन घेऊन परीक्षा द्यायला जा. कारण त्या पेनची तुम्हाला सवय झालेली असते आणि ते पेनही कुरकुर न करता लिहिते होत असते. मुख्य परीक्षेपूर्वी आपण प्रश्नपत्रिका सोडविलेल्या असतील तर परीक्षा केंद्रातील वातावरणाचा तुमच्यावर परिणाम जाणवणार नाही. प्रश्नपत्रिका वेळेत सोडविणे हे सुद्धा अनेक विद्यार्थ्यांना सरावाअभावी जमत नसते. त्यामुळे त्यांचे बहुमूल्य गुण जातात.
• प्रलोभने टाळा :
परीक्षेला आपण अभ्यास करत असता तेव्हा अनेकदा प्रलोभने येत असतात जसे एखादा आपला जवळचा मित्र आपली नवीन बाइक घेऊन तुम्हाला ङ्गिरायला येण्यासाठी आमंत्रण घेऊन येतो. तुम्हीसुद्धा ह्याला बळी पडता. पण लक्षात घ्या नेमके त्याच वेळी त्या मित्राला अपघात झाला तर…! काळवेळ सांगून येत नसते. कदाचित ह्या अपघातामुळे तुम्हाला आठवडाभर जर इस्पितळात रहावे लागले तर अभ्यासाचे वेळापत्रक कोसळेल ह्याचे भान ठेवा. अगदी जरुरी पुरता टीव्ही पहा. ठळक बातम्या, एखादे काही वेळासाठी मनोरंजन करणारा संगीताचा कार्यक्रम तोही ब्रेक सारखा. त्यापेक्षा बागेत चला, आवडीचे संगीत ऐका. आपल्या आवडीच्या मित्राशी संवाद साधा. आई- बाबांना त्यांच्या कामात मदत करा. अशाने तुमच्या मनावरील ताण हलका व्हायला मदत होईल. ताण असह्य होत असेल तर आपल्या पालकाशी, मोठ्या भावंडाशी, शिक्षकाशी किंवा तुमच्या शाळेतील समुपदेशकाशी बोला. ह्यामुळे ताण हलका व्हायला मदत होईल. कारण सततचा अभ्यास करून ताण येऊ शकतो. अधून मधून ब्रेक घ्याच. थकलेले शरीर आणि थकलेला मेंदू उत्तम रीतीने काम करूच शकणार नाही. काहीवेळा जवळचे नातेवाईक, शेजारी एखादे काम करावे म्हणून आग्रह करतात त्यावेळी नाही म्हणायला शिका. ह्यात त्यांचा अपमान करावा असा हेतू नाही पण यावेळी पालकांनी त्यांची समजूत घालावी किंवा आपण पालकांमार्ङ्गत ही गोष्ट टाळावी.
• अभ्यासाची वेळ:
खरे तर अभ्यासाची अमुकच वेळ असे काही निश्चित सांगता येत नसते. प्रत्येकाच्या दृष्टीने ह्याचे उत्तर बदलेल. एखाद्याला पहाटे अभ्यास करायला आवडेल तर एखाद्याला जागरण करून. ज्यावेळी तुम्हाला करायला आवडेल ती वेळ निवडावी. काही वेळा आपल्या ह्या वेळेत परिस्थितीनुसार बदलही करावा लागतो हे ध्यानात ठेवावे. अभ्यास करताना मित्र मैत्रिणीचे छोटे छोटे गट करून अभ्यास करण्याची जुनी पण प्रभावी पद्धत. जर शक्य असेल तर हा प्रयोग अनुभवायला हरकत नाही. तुमचे अभ्यासाचे वेळापत्रक सर्वांना दिसेल अशा पद्धतीने घरात लावून ठेवा कारण जेव्हा तुम्ही ब्रेक घ्याल तेव्हा त्याची कल्पना घरातील मंडळींना येईल.
• पालकांनी दूरचे मदतनीस व्हावे :
अनेकदा मुलांपेक्षा त्यांच्या पालकांना आपल्या मुलांची जास्त चिंता पडलेली असते. कारण वाढत्या स्पर्धांची झळ त्यांना पोचलेली असते. ही झळ मुलांना लागू नये ह्या चांगल्या हेतूने पालक मंडळी आपल्या मुलावर अभ्यासाचा ताण आणतात. कृपया ह्या गोष्टी टाळाव्यात. त्यांना काय हवे काय नको ह्याची काळजी जरूर घ्या. अभ्यासासाठी अनुकूल वातावरण ठेवायला जरूर मदत करा. त्याला प्रोत्साहन द्या. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करायला मदत करा. मार्काबाबत तर चर्चाच करू नका. कारण तुम्हीच तुमच्या मुलांचे आधार असता. दहावी बारावी म्हणजे काही आयुष्य नव्हे. तो एक टप्पा आहे. त्या पलीकडे बराच पल्ला त्याला गाठायचा आहे हेही लक्षात ठेवा. काहीवेळा चांगला विद्यार्थी ह्या परीक्षेत कमी गुण घेऊन उत्तीर्ण होतो. अशा वेळी समजूतदारपणे स्थिती हाताळा. मी तुला सांगितले नव्हते. तुझे भविष्य कठीण आहे. अशी निराश करणारी वाक्ये तुमच्या शब्दकोशातून काढूनच टाका. • उपासना करावी :
आपल्या आराध्य देव देवतेची उपासना आपल्याला सकारात्मक विचार करायला प्रेरित करते. त्यामुळे मनाची एकाग्रता वाढायलाही मदत होते. संध्याकाळच्या वेळी देवासमोर बसून आपण प्रार्थना करून हा लाभ घ्यावा.
• परीक्षा काळातील आहार :
हा एक स्वतंत्र विषय आहे. भरपूर पाणी पिणे, मानवी शरीर ७०% पाण्याने बनलेले आहे. संतुलन राखण्यासाठी द्रव पदार्थ पोटात जाणे महत्त्वाचे. केवळ पाणीच नव्हे तर नारळपाणी, कोकम, संत्री, मोसंबी, ताक अशा माध्यमातूनही आपण पाण्याचे संतुलन राखू शकता. बाजरी पदार्थ टाळायला प्राधान्य द्या. तेलकट पदार्थ ह्या दिवसात टाळावे. ह्यामुळे घशाला त्रास होऊ शकतो शिवाय पचायला जड असल्याने झोपही येते परिणामी अभ्यासाचे वेळापत्रक कोलमडेल. प्रथिनयुक्त आहार घ्यावा. ह्यासाठी मोड आलेली कडधान्य, उसळी, दूध, अंडी आहारात असावे. ङ्गळे, पालेभाज्या, सुका मेवा ह्यालाही प्राधान्य द्यावे. ह्या काळात शरीराची प्रतिकारशक्ती वाढविणे गरजेचे असल्याने व्हीटॅमिन ए, ई, सी युक्त पदार्थ आहारात असावे. ताण-तणाव दूर करण्यासाठी एकाग्रता, स्मरणशक्ती वाढविण्यासाठी दीर्घ श्वसन करणे, योग, शारीरिक व्यायाम उपयोगी पडतो.
व्यायाम आणि मनाचा उत्साह यांचे नाते जिवाभावाचे. शारीरिक तंदुरुस्ती व्यायामावर अवलंबून असते. सूर्यनमस्कार, चालणे हे सहज करण्याजोगे व्यायाम. परीक्षार्थीला ङ्गिटनेस नसेल तर अभ्यास करूनही ऐनवेळी आजार डोके वर काढू शकतो.
परीक्षेपूर्वीचा एक आठवडा अतिशय महत्त्वाचा असतो. उजळणीवर भर असू दे. त्रासदायक काम टाळा. ह्या काळात उपाशी राहण्याचे प्रयोग करू नका कारण रिकाम्या पोटी ऍसिडीटी होते. त्यामुळे अस्वस्थ वाटू शकते. प्रत्यक्ष परीक्षेचा दिवस येईल त्या दिवशी शांत चित्ताने केंद्रावर जा. आपला क्रमांक कुठच्या वर्गात आहे ते पहा. पेपर हाती आल्यानंतर शांत मनाने तो वाचून काढा. आपल्या हाती योग्य त्याच विषयाचा पेपर दिला आहे ह्याची खात्री करा. आता विद्यार्थ्यांना ह्यासाठी ज्यादा वेळ दिला जातो त्याचा पुरेपूर लाभ घ्या. सोबत पाण्याची बाटली न्यायला विसरू नका. खिशात एखादी चॉकलेट ठेवावी. रक्त आणि साखर यांची पातळी शरीरात योग्य प्रमाणात असेल तर मनाची एकाग्रता चांगली राहते असा अनेकांचा अनुभव आहे. परीक्षेचे साहित्य सोबत नेल्याची आदल्या दिवशी खात्री करून ठेवा. ह्यात ज्यादा पेन, पेन्सिल, आपले ओळखपत्र, कंपासपेटी असावे.
• शेवटी एक लक्षात असू द्या…
ह्या परीक्षेपेक्षा जीवनातील परीक्षा जास्त महत्त्वाच्या. आयुष्याची वाटचाल करताना ह्या परीक्षेसारखीच आपली अवस्था होत असते. त्या वेळीही आपल्याला वरीलप्रमाणे टिप्स हव्या असतात. अशा वेळी मनाचा कणखरपणा कुठल्याही परिस्थितीला तोंड द्यायला मदत करत असतो. महायुद्धातील बॉम्बमुळे बेचिराख झालेले जपान, पुढे त्सुनामीच्या धक्क्यातून सावरणारा तोच जपान, बॉम्बस्ङ्गोटाने हादरलेली पण नंतर सावरलेली मुंबई, कर्करोगाशी झुंजत पुन्हा क्रिकेट मैदानावर आलेला युवराजसिंग, कर्जाच्या डोंगराखाली दबून गेलेला पण जिद्दीने यशस्वी पुनरागमन करणारा अमिताभ बच्चन, तुरुंगात अनेक वर्षे राहून लढा देणारे नंतर देशाचे नेतृत्व करणारे नेल्सन मंडेला आदींची यशोगाथा आपल्याला जीवनातील परीक्षांचे पेपर सोडवायला मदत करतील. तुम्हीसुद्धा अशा छोट्या छोट्या प्रेरक गोष्टी परीक्षा काळात वाचून काढल्या तर त्याचा नक्कीच उपयोग होईल. यशस्वी भव. शुभेच्छा !