परिहारक सेवा ‘‘आयुष’’

0
115

– म. कृ. पाटील, मुळगाव-अस्नोडा

मागील अंकावरून पुढे….
राज्यशासन आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाला, आरोग्य संचालनालय आणि वैद्यकीय शिक्षण-प्रशिक्षण महाविद्यालयाला फार मोठ्या योगदानाची गरज आहे. वैद्यकीय पदवी शिक्षण (एमबीबीएस), परिचारिका प्रमाणपत्र आणि पॅरामेडिकल अभ्यासक्रमांमध्ये ‘पॅलिएटिव्ह केअर’चा अंतर्भाव करायची तसेच आधीच बाहेर पडलेल्यांना अद्ययावत ज्ञानाचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी निर्धारित केलेली आहे.आपल्या देशात विविध स्तरांवर अनेक संस्था कार्यरत आहेत. राष्ट्रीय कर्करोग निवारण संस्था, एड्‌स् निवारण संस्था, राष्ट्रीय रोगनिवारण संस्था, वैद्यकीय पदवी पदव्युत्तर शिक्षण संस्था, महाविद्यालये, ग्रामीण आरोग्य व कुटुंब कल्याण अभियान, शासकीय आरोग्य संचालनालय या सर्वांनाही ‘पॅलिएटिव्ह केअर’ची अंमलबजावणी परस्परांच्या सहकार्याने आणि एक दिलाने करण्यास सूचना पाठविल्या आहेत. २०१२ साली केंद्र शासनाने नॅशनल प्रोग्रॅम पालिएटिव्ह केअर (एनपीपीसी) कार्यक्रमाची सुरुवात केली. या अभियानाची संकेत स्थळे ः ुुु.रिश्रर्श्रीा.ळपवळर.ेीस
आणि ुुुऽरिश्रर्श्रीाळपवळर.ेीस अशी आहेत.
आपल्या देशात याची सेवा-सुविधा कितपत उपलब्ध आहे याचा सर्व्हे जागतिक इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिटने केला तेव्हा अतिशय विदारक चित्र दिसून आले. यात संपूर्ण देशात फक्त दोन टक्केच सेवा-सुविधा उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले. याचाच अर्थ शासनाने या संदर्भात गंभीरपणे लक्ष दिलेले दिसत नाही. असे असले तरी आपल्या देशात शिक्षण आणि आरोग्य सेवा-सुविधा पुरविण्यात सतत अग्रेसर आणि प्रथम क्रमांकावर असलेल्या केरळ राज्यात सुखद चित्र पाहायला मिळते. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या फक्त ३ टक्के जनता केरळ राज्यात आहे. त्यांपैकी ९० टक्के जनतेला ही परिहारक सेवा-सुविधा पुरविण्यात केरळने उत्तुंग भरारी मारली आहे. तिथे या सेवेची मांडणी, रचना त्रिस्तरीय पद्धतीने करण्यात आली आहे. प्राथमिक स्तरावर ३० पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात आले. त्यांचा उत्कृष्ट अहवाल आल्यानंतर २०१३-१४ या आर्थिक वर्षात राज्यात १००० पेक्षा जास्त परिहारक सेवा केंद्रे, पंचायत निहाय प्रस्थापित करण्यात आलीत. पंचायत निहाय ‘कुटुंब’ हा प्रमुख घटक मानून कुटुंब निहाय सेवा, समाज निहाय संघटन प्रस्थापित करून सेवा-सुविधा पुरविण्याचे ध्येय निश्‍चित करण्यात आले. प्रशिक्षित परिचारिका, स्वयंसेवक आणि अशा आरोग्य सेवाव्रतीची एक टीम करण्यात आली. हे पथक प्रत्येक कुटुंबाला १५ दिवसातून एक भेट देते. रुग्ण व कुटुंबीयांची माहिती एकत्रित करून वरिष्ठांना पाठविते. त्यांच्या मार्गदर्शनानुसार रुग्ण आणि कुटुंबीयांना औषधोपचार सेवा, सुविधा आणि समुपदेशन करत असते. रुग्ण आणि वैद्य, डॉक्टर यांच्यामध्ये मानवतेचा सेतू उभारून रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामध्ये आत्मीयतेची भावना वृद्धिंगत करण्यात परिहारक टीम कार्य करते.
२० व्या शतकात रुग्ण आणि डॉक्टर/वैद्य यांचे संबंध जिव्हाळ्याचे, घरोब्याचे होते. कुटुंबाचा वैद्य किंवा डॉक्टर होता. रुग्णाशी मनमोकळेपणाने आणि आत्मीयतेने सुसंवाद साधून औषधोपचाराबरोबरच मानसिक आणि भावनिक संवेदना जपण्याची महान कामगिरी डॉक्टर करत होते. त्यामुळे रूग्णाईताला आणि कुटुंबीयांना डॉक्टर दिलासा देणारा आधारस्तंभ होता. अशी भावना अंतःकरणात रुजलेली होती. मानवता, माणुसकीपुढे अर्थार्जन गौण होते. आज अर्थार्जनाच्या हव्यासापायी मानवता, माणुसकी गौण बनली आहे. २१व्या शतकात रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामधील नातेसंबंधांची दरी दिवसेंदिवस रुंदावत चालल्याचे चित्र सर्वत्र आढळून येत आहे. ही वाढणारी गैरसमजाची दरी कमी करत शून्यावर आणण्याचे कार्य परिहारक सेवा संकल्पनेत सामावले आहे. रुग्ण आणि वैद्यकीय आस्थापने यांच्यामध्ये ग्राहक-मालक अशी भावना दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे. ही वाढती भावना कमी करण्यासाठीच केरळ राज्य शासनाने मानवतेच्या दृष्टिकोनातून ‘परिहारक सेवे’ची सर्वंकष रुग्णसेवा आपल्या राज्यात यशस्वीपणे राबविली आहे.
काय आहे ही परिहारक सेवा?…
* रूग्णाईताच्या शारीरिक, मानसिक, भावनिक वेदना सुसह्य करणे.
* रुग्ण व कुटुंबीयांच्या मानसिक, भावनिक, सामाजिक, आर्थिक आणि आध्यात्मिक भावनांची उकल करून सोडवणे.
* रूग्णाईताला आजारपणात सुसंवादातून आधार देणे.
* रुग्ण व कुटुंबीयांना गुणात्मक जीवन जगण्याकरता सकारात्मक ऊर्जा व पाठबळ देणे.
* परिहारक सेवेचे सेवाव्रतींचे रुग्ण आणि कुटुंबीयांशी सुसंवाद, समुपदेशन, औषधे, सेवासुश्रुषा गरजेनुसार पुरविण्याचे ध्येय.
* रूग्णाईताचे निर्धारित आयुष्य कमी अथवा जास्त परिहारक सेवेने होत नाही, साधन-सुविधांद्वारे गुणवत्तापूर्ण जीवन जगण्याची व व्यतीत करण्याची मनोशक्ती, मनोबल वाढविण्यास मदत करते.
* रुग्ण आणि कुटुंबीयांच्या भावभावनांचे संतुलन राखणे.
* रुग्णाला व्याधिमुक्त करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करणे.
* रुग्ण आणि कुटुंबीयांचे ताणतणाव, नैराश्य कमी करण्याकरिता सर्वतोपरी मदत करणे.
* व्याधीची तीव्रता कमी करण्यासाठी औषधोपचार, सर्वंकष सेवा, सुविधा पुरवणे.
रुग्ण = शासन + शिक्षण + औषध उपलब्धता
जागतिक आरोग्य संघटना जिनेव्हा या संस्थेने वरील तीन गोष्टींना प्राधान्य दिलेले आहे.
(क्रमशः)