परिहारक उपाययोजना ‘‘आयुष’’

0
101

– म. कृ. पाटील, मुळगाव-अस्नोडा
२१ व्या शतकातही आधुनिक विज्ञान तंत्रज्ञान आणि संशोधनीय विश्‍वात मानवाच्या काही चिवट, दुर्धर, असाध्य व्याधी आणि आजार-विकार असे आहेत की ज्याच्या नामोच्चारानेही समस्त प्रगत-अप्रगत मानवी जीवनच हबकून जाते. ज्या व्यक्ती आणि कुटुंबाच्या वाट्याला त्या व्याधी आणि ते आजार-विकार येतात त्या रुग्णाची आणि कुटुंबीयांची सामाजिक, मानसिक, भावनिक आणि आर्थिक व्यवस्था अधिकाधिक बिकट, हलाखीची आणि दयनीय बनत जाते. रुग्णाला शारीरिक प्राणांतिक वेदना, मानसिक, भावनिक ताणतणावाबरोबर नैराश्य, उदासी, एकाकीपणा सोबत चिडचिडेपणाची साथ लाभते. याचा विपरीत परिणाम कुटुंबीयातील लहान-थोर व्यक्तींच्या मानसिक, भावनिक, सामाजिक, आर्थिक आणि आध्यात्मिक संवेदना आणि भावभावनांवर होत जातो. त्या रुग्णाचा आणि परिवारातील इतर व्यक्ती, नातलगांचा चहूबाजूंनी कोंडमारा होतो. ‘‘धरले तर चावते, आणि सोडले तर पळते’’ अशी अवस्था झालेली असते. रुग्णाला आजारात, अपघातात सोसाव्या लागणार्‍या प्राणांतिक शारीरिक वेदना, त्रास, हालअपेष्टा, अवहेलना यामुळे रुग्णाइत व्यक्ती मेटाकुटीला येते. जीवन जगण्याची आशा निर्माण होण्याऐवजी नैराश्य भावनेत गुंतून जाते. त्यातच मृत्यूचे भय वाकुल्या दाखवत असते.
रुग्णाइत व्यक्तीची सेवा-शुश्रूषा आणि कुटुंबीयांचे समुपदेशन, औषधोपचार करून शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आर्थिक स्थिती पूर्ववत आणण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करायला हवेत. रुग्ण आणि कुटुंबातील इतर व्यक्तींसमवेत आत्मीयतेने, सामाजिक बांधीलकी, मानवतेच्या दृष्टिकोनातून सुसंवाद साधून समुपदेशनाद्वारे जीवन जगण्याची आशा निर्माण करत सामाजिक, आर्थिक, आध्यात्मिक आणि भावनिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आजच्या युगात भासत आहे. काही व्याधी व आजार औषधोपचाराने बरे होणारे असतात तर काही जुनाट, दुर्धर, असाध्य व्याधीतून रुग्णाचे पंचप्राण पंचतत्त्वात विलीन होतात. कुटुंबीय या धक्क्यातून लवकर सावरत नाहीत. असाध्य व्याधीत रुग्णाला सोसाव्या लागणार्‍या वेदना, त्रास, विविधोपचार करून सुसह्य करून सन्मानितपणे जीवन जगण्याची ऊर्मी, आशा जागृत करता येते. याची गरज दिवसेंदिवस वाढते आहे. रुग्ण आणि कुटुंबीयांच्या मानसिक, भावनिक, सामाजिक, आर्थिक समस्यांची उकल करून, त्यांना सर्वतोपरी साहाय्य औषधोपचार, सेवा सुश्रुषाद्वारे आंतरिक आणि मानसिक समाधान लाभू शकते.
पृथ्वीवरील इहलोकी कोणीही अमर नाही. कधी ना कधी हा इहलोक सोडावाच लागणार आहे. याची जाणीव आणि नेणीव प्रत्येकालाच आहे. ‘मृत्यू’ हा शब्दच कोणी उच्चारायला धजत नाही. प्रत्येकाला जास्तीत जास्त दिवस जगावे असे मनोमनी वाटते आणि ते रास्तही आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्व्हेनुसार १५% व्यक्ती अपघातात ध्यानी-मनी नसताना मृत्युमुखी पडतात. मानवाला वयाच्या ६५ व्या वर्षापासून स्मृतिभ्रंश, मधुमेह, अर्धांगवायू, रक्तदाब, संधिवात, हृद्रोग आणि कॅन्सर आदी भंडावून सोडतात. हे आजार कधी एकदा मानवी शरीरात प्रवेश मिळतो याची आतुरतेने वाटच पाहात असतात. मनाने आणि शरीराने थकलेल्या देहात ते कळतनकळत शिरतात आणि संपूर्ण देहाचा ताबा घेतात.
* वृद्धपणी शारीरिक हालचाल मंदावत जाते.
* गात्रे शिथिल होतात.
* वयपरत्वे मेंदू कार्य करीत नाही.
* परावलंबी जीवन जगावे लागते. अशावेळी खरी परिपूर्ण आधाराची खरी गरज भासते. बालपणी जसे ‘मी आहे ना!’ या तीन शब्दाला आसुसले असतो तसेच वृद्धपणीही ‘मी आहे ना!’ या तीन शब्दांच्या आधाराला, आत्मीयतेला लोक आसुसलेले असतात. फक्त औषधोपचारानेच आजारमुक्त, व्याधीमुक्त होता येत नाही. आजारमुक्त व सन्माननीय जीवन जगण्यासाठी शारीरिक, भावनिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक आणि आध्यात्मिक आधाराची, साहाय्याची, समुपदेशनाची आणि सुसंवादाची नितांत गरज भासते. ही गरज ‘‘पॅलिएटिव्ह केअर संकल्पना’’ पूर्ण करू शकते.
यामध्ये रुग्णाच्या आजार-विकाराचे शक्य तितक्या लवकर अचूक निदान होणे आवश्यक असते. म्हणजे रुग्ण आणि कुटुंबीयांना सर्व आघाड्यांवर निर्धाराने सामना करण्याचे धाडस आणि धैर्य मिळते. तसेच प्रत्येक मनुष्याची जाज्ज्वल्य इच्छा असते की माझ्या जीवनाचे अंतिम क्षण आणि श्‍वास स्वतःच्या हक्काच्या वास्तूत घालवावेत. सन्मानाने त्याच वास्तूत इहलोकाचा निरोप घ्यावा.
उपरोल्लेखित सर्व बाबींचा सारासार विचार-विनिमय करून ‘‘जागतिक आरोग्य संघटनेने (थकज)’’ युनोच्या आमसभेत २००२ साली ‘‘पॅलिएटिव्ह केअर’’ ही आरोग्य आणि कुटुंब कल्याणाची संकल्पना मांडली. पॅलिएटिव्ह केअरमध्ये रुग्ण आणि कुटुंबीयांना सर्वंकष सेवा-शुश्रूषा-औषधोपचार प्रदान करणे (ऍक्टिव्ह टोटल केअर) समाविष्ट आहे. युनोच्या आमसभेच्या संमतीनंतर सदस्य राष्ट्राच्या, राष्ट्राध्यक्षांना त्यासंबंधीची माहिती, मार्गदर्शक तत्त्वे, अभ्यासक्रम आणि सूचनाही पाठवल्या. त्यांची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी, अशा सूचनाही पाठवल्या. त्यानुसार आपल्या देशात आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाची निर्मिती झाली. त्यालाच ‘‘आयुष’’ ही भारतीय वैद्यकीय उपचारपद्धती संलग्न केली. याच मंत्रालयाच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची निर्मिती झाली आहे. या अभियाना अंतर्गत रुग्ण आणि कुटुंबीयांना समाजात सन्माननीय जीवन व्यतीत करण्याकरता अति आवश्यक औषधोपचार, सेवा, सुविधा आणि शुश्रूषा पुरविण्याची जबाबदारी आणि दायित्व आहे. हे महान व उदात्त कार्य फक्त शासनच पूर्ण करू शकणार नाही. त्याकरिता समाजातील निमशासकीय संस्था (एन्‌जीओ), स्वायत्त स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी वैद्यकीय आस्थापने, औद्योगिक कॉर्पोरेट आस्थापने आणि समाज यांचे सक्रिय सहकार्य आणि योगदानाची आवश्यकता आहे.
(क्रमशः)