परराज्यातील मासळीची नियमानुसार तपासणी

0
90

>> आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांची माहिती

अन्न आणि औषध प्रशासनाकडून (एफडीए) परराज्यातून येणार्‍या मासळीच्या तपासणीचे काम योग्य प्रकारे आणि नियमानुसार करण्यात येत आहे. मासळीवाहू ट्रकातील प्रत्येक मासळीची तपासणी करणे शक्य नाही. त्यामुळे ट्रकातील मासळीचे निवडक नमुने घेऊन तपासणी केली जात आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल दिली.

एफडीएकडे कर्मचार्‍यांची कमतरता असताना जास्तीत जास्त कर्मचार्‍यांची मासळीच्या तपासणीसाठी पोळे – काणकोण आणि पत्रादेवी – पेडणे येथील तपासणी नाक्यावर नियुक्ती करण्यात आली आहे. एफडीएकडून करण्यात येणार्‍या मासळीच्या तपासणीसंबंधी प्रसिद्ध झालेल्या वृत्ताबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास आरोग्यमंत्री राणे यांनी नकार दिला. आत्तापर्यंत केलेल्या तपासण्यांमध्ये मासळीमध्ये काहीच आक्षेपार्ह आढळून आलेले नाही, असेही आरोग्यमंत्री राणे यांनी सांगितले.

एफडीएची पथके दोन्ही तपासणी नाक्यांवर दिवस – रात्र कार्यरत राहून मासळी तपासणीचे काम करीत आहेत. राज्यात येणारी मासळी रसायनमुक्त ठेवण्यासाठी आवश्यक काळजी घेतली जात आहे. पोळे नाक्यावर गुरूवारी सकाळपर्यंत ३१६ मासळीवाहू ट्रकांची तपासणी करण्यात आली आहे. तर पत्रादेवी नाक्यावर ७७ मासळीवाहू ट्रकांची तपासणी करण्यात आली आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.