परराज्यातील मासळीकडे गोमंतकीयांची पाठ

0
107

फॉर्मेलीन लावून गोव्यात पाठवण्यात येणार्‍या परराज्यातील मासळीवरील बहिष्कार गोमंतकीयांनी चालूच ठेवला असून काल रविवारीही मडगांव, पणजीसह विविध शहरे व गावातीलही मासळी बाजारांमध्ये नेहमीच्या तुलनेत शुकशुकाट दिसत होता.
सध्या लोकांनी गोव्यातील खाडी-मानशींवरील तसेच रापणीची व गोड्या पाण्यातील मासळी, चिकन, मटन, अंडी, सुकवलेली मासळी आदीकडे आपला मोर्चा वळवला आहे.

राज्यात मच्छिमारी पुन्हा सुरू होईपर्यंत आम्ही परराज्यातील मासळी खरेदी करणार नाहीत असे सांगणार्‍या व तसे ठरवलेल्या गोमंतकीयांची संख्या बरीच मोठी आहे. काही लोक गोड्या पाण्यातील व मानशीची मासळी मिळवण्यासाठी दूरपर्यंत जाऊ लागले असल्याचेही वृत्त आहे.

समाज माध्यमांवर सध्या मासळी हाच चर्चेचा प्रमुख मुद्दा आहे. परराज्यातून येणार्‍या विषारी मासळीवर बहिष्कार घाला. गोव्यातीलच मासळी खरेदी करा, राज्यातील गोड्या पाण्यातील मासळीला प्राधान्य द्या, गोव्यात मच्छिमारी सुरू होईपर्यंत नदी, तलावातील मासळी अथवा अंडी, चिकन, मटन असे पर्याय शोधा अशा सूचना लोक आपले नातेवाईक तसेच मित्र मंडळींना करू लागले आहेत. काही जण थोडे दिवस शाकाहार करा अशी सूचनाही करताना दिसत आहेत.

दुसर्‍या बाजूने आता लोकांच्या दबावामुळे सरकारनेही ह्या मासळी माफियांची गय केली जाणार नाही अशी वक्तव्ये सुरू केली आहेत. फॉर्मेलीनचा वापर करून गोव्यात मासळी घेऊन येणार्‍या परराज्यातील गाड्या जप्त करण्यात येतील असे शनिवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यानी ट्विटरवरून म्हटले होते. तसेच अन्न आणि औषध प्रशासन खात्याचे मंत्री विश्वजीत राणे व या प्रकरणी वादग्रस्त ठरलेले मंत्री विजय सरदेसाई यानीही आम्ही ह्या माफियांच्या बाजूने नव्हे तर जनतेच्या बाजूने आहोत असे सांगणारी निवेदने केली होती.