परराज्यांतून येणार्‍या मासळीत सापडले घातक रसायन

0
125

>> एफडीएच्या धाड सत्रावेळी झाले स्पष्ट

>> रसायन मर्यादित असल्याचा एफडीएचा दावा

अन्न आणि औषध संचालनालयाच्या पथकाने काल सकाळी पणजी मार्केट आणि मडगाव येथील घाऊक मासळी मार्केटमध्ये परराज्यांतून आणण्यात येणार्‍या मासळीच्या केलेल्या प्राथमिक तपासणीमध्ये फॉर्मालीन हे घातक रसायन आढळून आल्याने खळबळ उडाली. परंतु, एफडीएच्या बांबोळी येथील प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीमध्ये मासळीमध्ये फॉर्मालीन रसायन मर्यादित प्रमाणात असल्याचे आढळून आल्याने मासळी खाण्यासाठी सुरक्षित असल्याचे निवेदन संध्याकाळी उशिरा एफडीएच्या संचालिका ज्योती सरदेसाई यांनी जारी केले. यामुळे एफडीएने काही तासांतच मासळी खाण्यासाठी सुरक्षित असल्याचे जाहीर केल्याने राज्यभर तो चर्चेचा विषय बनला आहे.

परराज्यांतून कंटेनरमधून गोव्यात येणारी मासळी ताजी ठेवण्यासाठी घातक रसायने वापरतात. ती खाल्ल्याने कर्करोग होण्याची दाट शक्यता दै. नवहिंद टाइम्स या इंग्रजी दैनिकाने दिली होती. या वृत्ताने खडबडून जागे झालेल्या एफडीएने काल पहाटे ४ वाजता मडगाव येथील घाऊक मासळी बाजारात धाड घातली. कंटेनरमधून डीप फ्रीजमध्ये साठवून केरळ, चेन्नई, कर्नाटक व मालवण येथून आलेल्या १७ कंटेनरची झडती घेतली. त्यांतील तत्काळ मासळीची तपासणी केली असता प्रथम दर्शनी शवागारांमध्ये प्रेते टिकवण्यासाठी वापरण्यात येणारे फॉर्मालीन हे घातक रसायन वापरल्याचे स्पष्ट झाले. यामुळे घाऊक मासळी मार्केटात एकच खळबळ उडाली.
काल दिवसभर परराज्यांतून येणार्‍या मासळीतील घातक रसायनाच्या विषयावरून उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. सुरुवातीला घातक रसायन सापडल्याचे एफडीएने स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतर काही तासांनंतर संध्याकाळी तीच मासळी खाण्यासाठी सुरक्षित असल्याचे एफडीएने जाहीर केल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे.

मासळीच्या विक्रीवर परिणाम
एफडीएच्या पथकाने तपासणीनंतर परराज्यांतील ट्रकांमधील मासळीची विक्री न करण्याची सूचना संबंधितांना केली होती. त्यामुळे मडगाव येथील मासळीचा घाऊक बाजार बंद ठेवावा लागला. मुख्य घाऊक बाजार बंद राहिल्याने राज्यातील पणजी, म्हापसा, फोंडा व इतर मासळी मार्केटमधील मासळीच्या विक्रीवर परिणाम झाला. मासळीमध्ये फॉर्मालीन असल्याचे स्पष्ट झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. फॉर्मालीन रसायनयुक्त मासळी मनुष्याच्या आरोग्याला घातक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

मडगाव, पणजीत पहाटे तपासणी
राज्यात रसायनयुक्त मासळीची विक्री केली जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका संभवतो, अशी तक्रार आहे. देशातील काही भागात रसायनयुक्त मासळी आढळून आलेली आहे. त्यामुळे एफडीएने राज्यातील मासळीची तपासणी करण्याचा निर्णय घेतला होता. काल पहाटे ४ वाजल्यापासून एफडीएच्या दोन पथकांनी एकाच वेळी उत्तर आणि दक्षिण गोव्यात मासळीच्या तपासणीला सुरुवात केली. दक्षिण गोव्यात गेलेल्या पथकाने मडगाव येथील घाऊक मार्केटमध्ये केरळ, तामिळनाडू, ओरिसा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आदी राज्यांतून मासळी घेऊन आलेल्या १७ ट्रकांतील मासळीची तपासणी केली. या पथकाने केलेल्या प्राथमिक तपासणीमध्ये मासळीमध्ये फॉर्मालीन असल्याचे आढळून आले. त्यामुळे मासळीचे नमुने घेऊन पुढील तपासणीसाठी संचालनालयाच्या प्रयोग शाळेत पाठविण्यात आले. उत्तर गोव्यातील पथकाने पणजी मार्केटमधील मासळीचे नमुने घेतले होते. सुरुवातीला सावधगिरीचा उपाय म्हणून त्यावेळी मासळीची विक्री करू नये, अशी सूचना करण्यात आली होती. परंतु, मासळीमध्ये रसायनाचे प्रमाण मर्यादित असल्याने खाण्यासाठी सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले, असे सरदेसाई यांनी सांगितले.

कृषिमंत्र्यांना भेटले मासळीविक्रेते

मडगाव येथील घाऊक बाजारातील मासळीची विक्री बंद ठेवण्याची सूचना करण्यात आल्याने मासळी व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली. मडगावच्या बाजारात परराज्यांतून सुमारे एक कोटी रुपयांची मासळी आली होती. एफडीएने मासळीवर कारवाई सुरू केल्याने घाऊक मासळी बाजाराचे अध्यक्ष इब्राहिम व सहकार्‍यांनी काल सकाळी कृषिमंत्री विजय सरदेसाई यांनी भेट घेऊन लक्ष घालण्याची विनंती केली. त्यानंतर मंत्री सरदेसाई यांनी अन्न आणि औषध प्रशासन खात्याच्या संचालकांशी संपर्क साधून तत्काळ तपासणी करून अहवाल देण्यास सांगितले.
लोकांमध्ये घबराट पसरविणारी कुठलीही कृती अयोग्य आहे. आपण मुख्यमंत्री पर्रीकर आणि संबंधित अधिकार्‍यांशी या मासळीतील रसायनाच्या विषयावर चर्चा करून आपले मत व्यक्त केले आहे. एफडीएने सुध्दा रसायनाचे प्रमाण मर्यादित असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे गोमंतकीयांनी काळजी करण्याचे कारण नाही, असे मत नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले आहे.