परप्रांतीयांचे आक्रमण रोखायलाच हवे

0
103

– प्रल्हाद भ. नायक, दुर्गानंदनगर, कुडचडे
दि. २२ डिसेंबर २०१४ च्या ‘नवप्रभा’ च्या अंकात सौ. सपना नाईक, चिंबल यांनी ‘वाचकीय’ सदरात ‘यालाच स्वातंत्र्य म्हणतात का रे भाऊ’ या शिर्षकाखाली लिहिलेले पत्र फारच आवडले. त्यांचा संपर्क असता तर अभिनंदन केले असते.
दि. २ जानेवारी २०१४ च्या नवप्रभाच्या अंकात विश्‍वास मधुकर पेडणेकर यांनी लिहिलेल्या ‘सरकारने आदर्श गोव्याचे ध्येय बाळगावे’ या लेखाने पुनर्उजाळा दिला.
सौ. सपना नाईक असोत अथवा विश्‍वास पेडणेकर असोत, दोघांनीही बदललेल्या गोव्याविषयी चिंता व्यक्त केली आहे! दोघांचेही विचार वास्तवाला धरून आहेत.
पूर्वीच्या काळी आपला गोवा कसा शांत, सुंदर आणि सुरक्षित होता हे आम्ही ज्येष्ठ नागरिकांकडून ऐकतो. सध्या गोवा तसा नाही ही खंत त्यांच्या बोलण्यातून जाणवते. आज गोव्यासमोर असलेल्या समस्या आणि भविष्यातील अपरिमित हानी टाळण्यासाठी नागरिकांनी सतत जागरूक आणि सतर्क असणे गरजेचे आहे!आज गोव्यासमोर असलेल्या अनेक समस्यांपैकी, परप्रांतीयांची वाढत चाललेली संख्या ही एक ज्वलंत समस्या आहे. भारतातील कोणतीही व्यक्ती, नोकरी – धंद्यानिमित्त, व्यवसायानिमित्त अथवा अन्य कुठल्याही कारणास्तव भारतात कोठेही वास्तव्य करू शकते, हे मान्य आहे. पण त्याला सुद्धा मर्यादा हवी.
परप्रांतीय जर एखाद्या भौगोलिक भागावर सामाजिक, सांस्कृतिक परिणाम करीत असतील तर त्यांना रोखणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. परप्रांतीय गोव्यात येतात त्याप्रमाणे गोमंतकीय परराज्यात, परदेशात जातात असा दावा केला जातो. नक्कीच गोमंतकीय परराज्यात, परदेशात जातात, परंतु ते तिथे स्थायिक होत नाहीत. काही जण स्थायिक झाले तरी अल्प संख्येमुळे ते तिथल्या सामाजिक, सांस्कृतिक परंपरेवर परिणाम करू शकत नाहीत. ते तिथल्या संस्कृतीशी मिळवून घेतात. त्याउलट गोव्यात कन्नड समाज, तेलगू समाज, मल्याळम समाज, गुजराती समाज असे परप्रांतीय गट करून असतात. गोमंतकीय त्यांचे खाद्यपदार्थ (इडली, डोसा, ढोकळा इ.), नृत्य (गरबा) आवडीने करतात. पण त्यांनी आमचे ‘मणगणे’, ‘अळसांदे तोणाक’, ‘कुणबी नृत्य’ घेतल्याचे दिसत नाही!
आज गोव्याची लोकसंख्या पाहता अवघ्या काही वर्षांत परप्रांतीयांची संख्या गोमंतकीयांपेक्षा जास्त असेल यात शंका नाही. कुठलेही क्षेत्र घ्या, तिथे परप्रांतीयांनी कब्जा केलेला दिसून येईल. परप्रांतीय आपलेच बांधव आहेत हे कुणीही नाकारू शकणार नाही. परंतु त्यांच्यामुळेच गोव्याची ओळख बदलत चाललेली आहे हे लक्षात घ्यावेच लागेल.
अंगमेहनतीची कामे गोमंतकीय करू शकत नाहीत, हे म्हणणे अर्धसत्य आहे. आपले सगळेच बांधव परदेशात उच्च अधिकारी म्हणून काम करतात असे नाही. श्रम संस्कृती रुजवायला आपण कमी पडलो ही वस्तुस्थिती आहे.
बेकरी, वर्तमानपत्र वितरण, हॉटेल, फळे – भाजी विक्री, मासेविक्री, सलून, ड्रायव्हिंग, घरबांधणी अशा सर्वच व्यवसायांत परप्रांतीयच दिसतात.
परप्रांतियांना हिणवू नका. त्यांच्यामुळेच गोवा उभा आहे. असा ‘लाखमोलाचा’ सल्ला आमचे राज्यकर्ते देत असतात. एकगठ्ठा मतांसाठी राज्यकर्ते परप्रांतियांचे फाजील लाड करतात हे कटू सत्य आहे. त्यांना शिधापत्रिका, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, अन्य परवाने मिळवून देण्यात राज्यकर्ते पुढाकार घेतात. परप्रांतीय व्यवसाय धंद्यातच नव्हे तर नोकरीतसुद्धा दिसतात. खासगी असो अथवा सरकारी, परप्रांतीयांना सहजपणे नोकर्‍या मिळतात. एखाद्या नातलगाकडे चार/आठ दिवस वास्तव्यास आलेला परप्रांतीय चार दिवसांत खांद्याला जेवणाचा डबा अडकवून नोकरी करण्यास चाललेला पाहून नोकरी मिळविण्यासाठी धडपडणारा गोमंतकीय तरूण वैफल्यग्रस्त झाल्यास नवल नव्हे!
गोव्यातील कित्येक तरूण एका बिहारी कंत्राटदारांकडे आपल्याला नोकरी मिळवून देण्यासाठी विनंती करताना मी पाहिले आहेत. त्याने कित्येकांना नोकर्‍या मिळवून दिलेल्या आहेत. एखाद्या गोमंतकीय तरुणाला परराज्यात जाऊन त्या राज्यातील मालकाच्या कंपनीत तिकडच्या तरुणांना नोकर्‍या मिळवून देणे शक्य होईल का?
परप्रांतीयांचा मोठा धोका म्हणजे ते राजकीय क्षेत्रावर प्रभाव टाकतात. त्यांच्या एकगठ्ठा मतांच्या आधारावर नालायक व्यक्ती निवडून येते. परप्रांतीयांची संख्या वाढण्यास राज्यकर्त्यांप्रमाणेच आपणही जबाबदार आहोत. आपण त्यांना काम देतो, राहायला घर देतो.
परप्रांतीयांमुळे चोर्‍या, विनयभंग, बलात्कार वाढले आहेत. सर्व गोमंतकीय सज्जन आहेत असे नव्हे! पण आज परप्रांतीयांच्या लोंढ्यांमुळे गोवा सुंदर आणि सुरक्षित राहिला नाही हे सत्य आहे! गोवा राष्ट्रीय प्रवाहात सामील होत आहे हे जरी खरे असले तरी त्यामुळे तरुण पिढी बिघडत चालली आहे. ती व्यसनाधीन होत आहे. तिला संस्कृतीचा विसर पडत चालला आहे. आपल्या भाषेचा, संस्कृतीचा विसर पडणे हे आपल्या प्रांतासाठी धोक्याचे आहे.
आजची तरुण पिढी आत्मकेंद्रित झाली असून माणुसकी विसरत चाललेली आहे. परप्रांतीयांना रोखून आपली ओळख, संस्कृती टिकवणे हे प्रत्येक जागृत नागरिकाचे कर्तव्य आहे.