परदेशी विमा संरक्षण

0
138
  • शशांक गुळगुळे

परदेशी विम्याच्या बर्‍याच पॉलिसीज उपलब्ध असल्या तरी यांपैकी योग्य पॉलिसी कोणती हे प्रत्येकाने स्वतः ठरवून ती घ्यावी. खाजगी कंपन्यांच्या तुलनेत सार्वजनिक उद्योगातील विमा कंपन्या कमी दराने प्रिमियम आकारतात व यांचा विमा घेणे विमाधारकाला जास्त सुरक्षित वाटते!

 

परदेशी प्रवासाला जाताना तुम्हाला प्रवास विमा (ट्रॅव्हल इन्शूरन्स) उतरविता येतो. परदेशप्रवासात सामान हरवले, विमान चुकले, विमान रद्द झाले व यामुळे तुमचे जे आर्थिक नुकसान होणार, जी आपत्ती तुमच्यावर ओढवणार, त्या आपत्तींना संरक्षण देणारी पॉलिसी उपलब्ध आहे. याशिवाय फक्त विमानप्रवासापुरते संरक्षण देणारीही पॉलिसी आहे. उदाहरण द्यायचे तर जर तुम्ही मुंबई-लंडन विमानप्रवासासाठी ही पॉलिसी उतरविली व तुमचा प्रवास सुखरूप होऊन तुम्ही लंडन विमानतळावर सुखरूप उतरलात की या पॉलिसीचे अस्तित्व संपते. फक्त प्रवासाचा कालावधी इतकेच हिचे आयुष्य असते. फक्त प्रवासात अपघात झाला तरच ही पॉलिसी संरक्षण देते. समजा विमान कोसळले व त्यातून प्रवास करणार्‍याने ही पॉलिसी उतरविलेली असेल व यात सदर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला, तर त्याच्या कायदेशीर वारसाला विमा कंपनीतर्फे त्याने जितक्या रकमेचा विमा घेतला होता तेवढी रक्कम देण्यात येते, तेवढ्या रकमेचा दावा संमत करण्यात येतो. याशिवाय विमा कंपनीतर्फेही मृत प्रवाशाच्या वारसास नुकसानभरपाई देण्यात येते.

आणखी एक पॉलिसीचा प्रकार म्हणजे परदेशी आरोग्य विमा (फॉरेन हेल्थ इन्शुरन्स) पॉलिसी. परदेशात, विशेषतः परदेशातील प्रगत देशांत वैद्यकीय खर्च फार जास्त असतो. त्यामुळे कित्येक परदेशी रुग्ण भारतात दिल्ली, मुंबई अशा महानगरांत उपचार घेण्यासाठी येतात. परदेशातील वास्तव्यात काही आजारपण आल्यास या पॉलिसीतून नुकसानभरपाईचा दावा करता येऊ शकतो. परदेशात उपचार घ्यावयाचे असल्यासही विमा संरक्षण उपलब्ध आहे. भारतातील विशेषतः राजकारणी व सिनेसृष्टीतील व्यक्ती उपचारांसाठी परदेशात जातात अशांसाठीही विमा संरक्षण उपलब्ध आहे.

एखाद्या रुग्णाचे निधान भारतात झाले असेल व त्याला परदेशात उपचार घ्यावयाचे असतील तर अशांसाठी अपोलो मुनिच हेल्थ इन्शुरन्स कंपनीची एक पॉलिसी आहे. या सुविधेचे नाव क्रिटिकल अ‍ॅडव्हान्टेज असून नेहमीच्या आरोग्य विमा पॉलिसीबरोबर जास्त प्रिमियम भरून ही पॉलिसी मिळू शकते. पण यासाठी किमान 10 लाख रुपयांचा विमा उतरावा लागतो. या विम्यासाठी भरलेल्या प्रिमियमच्या रकमेवर भारतीय प्राप्तीकर कायद्यानुसार कर-सवलतही मिळते. ही पॉलिसी आठ प्रकारच्या आणि गंभीर आजारांनाच विमा संरक्षण देते. यात 5 लाख यू.एस. डॉलर्स म्हणजे अंदाजे तीन कोटी भारतीय रुपयांपर्यंचा कमाल विमा उतरविता येतो (डॉलरच्या दराप्रमाणे यात बदल होतो). याशिवाय रुग्णाच्या हॉस्पिटलचा सर्व खर्चाचा दावा संमत होतो. याशिवाय रुग्णाचा, मदतनीसाचा व या रुग्णाला कोणी अवयव दान करणार असेल तर त्याचा प्रवासखर्चही विमा कंपनी देते. ही पॉलिसी ‘कॅशलेस’ असल्यामुळे विमा कंपनीचे ज्या हॉस्पिटलशी ‘टायअप’ आहे, अशा हॉस्पिटलांतच उपचार करून घ्यावे लागतात.

मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनीची परदेशी आरोग्य विम्यासाठी असलेल्या पॉलिसीचे नाव ‘हार्ट विश’ आहे. नऊ प्रकारच्या गंभीर आजारांना व परदेशात असताना अकस्मात तब्येत बिघडून हॉस्पिटलात दाखल व्हावे लागल्यास ही पॉलिसी घेता येते. अमेरिका व कॅनडा या देशांत तर या पॉलिसीचे संरक्षण हवे असेल तर अतिरिक्त प्रिमियम भरावा लागतो. रेलिगेअर हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या दोन आंतरराष्ट्रीय विमा मोठ्या पॉलिसी आहेत. एक पॉलिसी गंभीर स्वरूपाच्या आजारांना संरक्षण देणारी असून दुसरी पॉलिसी नियोजित किंवा आकस्मिक उद्भवणार्‍या आजाराला संरक्षण देणारी आहे. ही पॉलिसी कमाल 6 कोटी रुपयांपर्यंतची उतरविता येते. परदेशातील 45 दिवसांच्या वास्तव्यासाठी हे संरक्षण उपलब्ध असते. रॉयल सुंदरम् जनरल इन्शुरन्स कंपनीच्या दोन प्रकारच्या पॉलिसीज आहेत. या 11 प्रकारच्या गंभीर स्वरूपाच्या आजारांसाठी नियोजित हॉस्पिटलमध्ये उपचार व अकस्मात उद्भवलेला आजार व त्यासाठी तात्काळ तिकिटांचा 3 लाख रुपयांपर्यंतचा दावा संमत होऊ शकतो. अमेरिका व कॅनडात उपचार घ्यावयाचे असल्यास अतिरिक्त प्रिमियम भरावा लागतो. यात दीड कोटी रु.पर्यंतचा विमा उतरविता येतो. सिगमा टीटीके हेल्थ इन्शुरन्स कंपनी आणीबाणीच्या वेळीच परदेशी आरोग्य विम्याचे संरक्षण देते. हा विमा घेणार्‍यास परकीय चलनात परदेशात त्याला त्याचे हॉस्पिटलचे बिल भरावे लागते. ही कंपनी पॉलिसीधारकाचा दावा भारतातच व भारतीय चलनातच संमत करते. हा जास्तीत जास्त 1 कोटी रुपयांचा विमा उतरविता येतो. दावा पॉलिसीवर्षात एकदाच संमत होऊ शकतो. पॉलिसीवर्षात एकाहून जास्त वेळेस परदेशात हॉस्पिटलात भरती व्हावे लागल्यास ही कंपनी विमा संरक्षण देणार नाही. वर्षातून फक्त एकच दावा संमत होणार. या विम्याच्या प्रिमियमची रक्कम जास्त असते. 30 वर्षांच्या व्यक्तीने जर 40 लाख रुपयांचा विमा नियोजित हॉस्पिटलायझेशन व अकस्मात हॉस्पिटलायझेशनसाठी उतरविता तर त्याला 40 हजार रुपये इतका प्रिमियम भरावा लागतो. कंपनीतर्फे जेव्हा त्यांच्या कर्मचार्‍यांना कार्यालयीन कामकाजासाठी परदेशात पाठविले जाते तेव्हा कंपनी आपल्या कर्मचार्‍यांचा परदेश वास्तव्यात आऊट व इन पेशन्ट अशी दोन्ही संरक्षणे देणारी विमा पॉलिसी उतरवितात. तसेच विम्याच्या दाव्यावर कमाल मर्यादा बसवलेल्या पॉलिसी घेतात.

परदेशात उपचार करून घेण्याची (विशेषतः उच्चभ्रूंत) क्रेझ भारतीयांत आहे. परदेशात उपचार करून घेणे हे एक स्टेटस सिम्बॉल समजले जाते. परदेशात उपचार खर्च भारतात येणार्‍या खर्चापेक्षा प्रचंड असतो. कित्येक भारतीयांना भारतातील वैद्यकीय खर्चही परवडत नाही. अशांना परदेशात उपचार करून घेणे अशक्यप्राय गोष्ट आहे. परदेशी विम्याचे प्रिमियमही प्रचंड असतात व दावे संमत होण्यासाठी अटीही पुष्कळ असतात. परदेशी विम्याच्या बर्‍याच पॉलिसीज उपलब्ध असल्या तरी यांपैकी आपल्यासाठी योग्य पॉलिसी कोणती हे प्रत्येकाने स्वतः ठरवून योग्य ती पॉलिसी घ्यावी. खाजगी विमा कंपन्यांप्रमाणे सार्वजनिक उद्योगातील विमा कंपन्यांच्याही सर्व प्रकारच्या परदेशी विमा पॉलिसी आहेत. खाजगी कंपन्यांच्या तुलनेत सार्वजनिक उद्योगातील विमा कंपन्या कमी दराने प्रिमियम आकारतात व यांचा विमा घेणे विमाधारकाला जास्त सुरक्षित वाटते!