परतीचा पाऊस!

0
1157

– गौतमी गोपाळ चोर्लेकर

सृष्टीचे ऋतूचक्र कायम फिरत राहते. कालचक्राच्या बरोबरीने आपणही गती धरते आणि सृष्टीच्या सौंदर्यात वेगवेगळ्या छटांनी भर घालत राहते. उन्हाळ्यानंतर पावसाळा, पावसाळ्यानंतर हिवाळा, हिवाळ्यानंतर पुन्हा उन्हाळा… ह्या तीनही मोसमात सजलेली सृष्टी, तिची वेगवेगळी रूपे, तिचे बदलणारे सौंदर्य… सारेच कसे अप्रतिम… अद्भुत… सुंदर! ह्या मुळातच लावण्यवती असलेल्या सृष्टीचे सौंदर्य वाढू लागते ते पावसाळ्यात. अन् आभाळाचे लेणे घेऊन तृप्त होत जाते ही धरा… पाचवाचार शालू नेसून तिला असं बहरवून, फुलवून, खुलवून सतत बरसणारा पाऊस निघून जातो याच आश्‍विन महिन्यात. जाता जाता आपल्या अमृतधारांचा वर्षाव करतो. त्या वर्षावात पुन्हा बहरते, फळते, फुलते धरा… तृप्त होऊन जाते धरा. तनामनाने मोहरते धरा.

जून महीना आठवला की डोळ्यांसमोर दिसतो उदास शेतकरी. त्याची खिळलेली उदास नजर कोरड्या आभाळावरी. आभाळात मळभ भरून येत नसले तरी ते मळभ त्याच्या डोळ्यांत मात्र भरून येते. सुकलेल्या, तापलेल्या, भेगाळलेल्या जमिनीवर तीच नजर स्थिरावते अन् कायम स्वप्न पाहत असलेल्या त्या नजरेला असाहयतेची गळती लागते. दोन टपोरे कष्टाळू थेंब डोळ्यांतून पाझरतात. त्या दोन अश्रूंनी तरुण देवाचेही मन हेलावते. क्षणात आकाशात ढग जमू लागतात. विजांचा लखलखाट होतो. ढगांचा गडगडाट होतो. आकाराचे लेणे धारांनी कोसळू लागते. शेतकर्‍यांची सुकलेली स्वप्ने अन् उन्हाळ्यात सुकलेली धरती दोघांनाही दिलासा मिळतो. पावसाळा सुरू होतो. मुसळधार, कोसळधार पाऊस नाचू लागतो. सतत चार महीने त्याचं हे नृत्य चालू असते. या चार महिन्यांतील प्रत्येक दिवस धरेसाठी आनंदोत्सव असतो. शेतकर्‍यांच्या आशेचा किरण असतो. पावसाच्या पाण्याने तृप्त झालेल्या जमिनीच्या उदरात शेतकरी असंख्य पीकं पेरू लागतो. मायेच्या मायेने धरती पिकांना उब देते. बापाच्या आशीर्वादासारखा पाऊस त्यांना ओलावा देतो. हे पीक धरतीच्या उबेने अन् पावसाच्या ओलाव्याने बाळसं धरू लागते. अन् बघता बघता सृष्टी अमृतमय करून हा पाऊस परतू लागतो. त्याला परतीचे वेध लागतात.
भारत कृषीप्रधान देश. येथील सारेच बांधव भूमातेचे भक्त. तिच्या उदरातून येणार्‍या पिकावरच त्यांचा उदारनिर्वाह! कोणातरी कवीने सुरेख शब्दांत तिची महती गायली आहे. ते म्हणतात –
ही काळी आई
धनधान्य देई
जुळवी मनाची नाती
आमची माती आमची माणसं
ही काळी आई आम्हांला जे धनधान्य देते ते ह्या आभाळदानामुळेच भारत देशाला पावसाची देणगी लाभली आहे. अरबी समुद्र, बंगालची खाडी, हिंद महासागरामुळे ढग निर्माण होतात. तेच ढग संपूर्ण भारत वर्षात जून ते सप्टेंबर या महिन्यांत पाण्याचा वर्षाव करतात. ऑक्टोबर महिन्यात त्यांना परतीचे वेध लागतात. जाताजाताही हे ढग आपल्यातील थेंंबांचे दान धरतीला देऊन जातात.
चार महिन्यातील जलदानाने अन् शेतकर्‍यांच्या कष्टाचे चीज होते. त्यांनी रात्रीचा दिवस करून पेरलेल्या पिकांना दाणेदार कणसे येतात. त्यांचे सुगीचे व आनंदाचे दिवस जवळ येतात. शेतकर्‍यांच्या आनंदाचे प्रत्यक्ष दर्शन त्यांच्या शेतात डोलणार्‍या कणसांतून दिसून येते. आतासे कुठे सावळ्या रंगातले आभाळ निळा रंग लेवू लागते. समर्पणानंतरचे पवित्र तेज त्यांच्या रंध्रारंध्रातून दिसून येते. अशावेळी खाली धरतीवरची पिळवी धमक, सोनसळी गव्हा-भाताची केसरे डोलू लागतात. जणू आभाळाला ती धन्यवाद देत असतात. फारच अप्रतिमदृष्ट्या असते हे सारे! पावसामुळे शेतकर्‍यांच्या आणि त्यांच्या काळ्या आईच्या जीवनात आलेले गोजीरवाणे परिवर्तन जणू शेतकर्‍यालाही नवनिर्मितीचा आनंद प्रदान केलेला असतो या पावसाने.
परतीचा पाऊस ओसरू लागला की शेतकरी सज्ज होतो, त्याच्या घरातल्या माणसांच्या सुखाचे साधन असलेले हे पीक कापण्यासाठी. हातात कोयती घेऊन माथाभर वाढलेली ही दाणेदार कणसे कापताना वर्षभर केलेले कष्ट, हाताना आलेले फोड, पायांना पडलेल्या भेगा सारं काही विसरून जातो. सपासपा कोयती चालते अन् कणसे आडवी धरतीवर पडतात. दाण्यांचा सळसळाट होतो. तो आवाज त्याला जगातल्या कुठल्याही संगीतापेक्षा मधुर व मंजुळ वाटतो. कारण त्या कणसांतूनच त्याने पाहिलेल्या कितीतरी स्वप्नांना आकार यायचा असतो. ह्या सगळ्यांचे कारण असलेला तो पाऊस त्याला आपला सखाच वाटतो जणू. म्हणूनच कापलेल्या कणसांची मळणी घालताना शेतकरी भूमीपूजन करतो; पण हात मात्र आकाशाला जोडतो. तोच त्याच्यासाठी अन्नदाता, तोच त्याचा देव… वरुणदेव!
भारतीय संस्कृती माणूस व निसर्ग यांची नाळ जोडून ठेवते. इथले लोक कायम निसर्गाने त्यांच्यावर केलेल्या उपकारांची जाणीव ठेवतात. निसर्गाशी कृतज्ञ असतात. म्हणूनच तो निसर्गाच्या प्रत्येक घटकाला देव मानतो. त्याच भावनेतून निर्माण झालेला हा वरुणदेव मृग नक्षत्रातील पहिल्या सरीत भिजताना शेतकर्‍याला जेवढा आनंद होतो तेवढाच आनंद परतीच्या पावसाला निरोप देताना होतो. कारण पीकांनी भरलेले त्याचे अंगण हे त्या वरुणदेवाचेच देणे असते ना!
…………