पत्र

0
936

– संदीप मणेरीकर

प्रसिद्ध कवी प्रसाद कुलकर्णी यांची कविता…

पत्र लिहायला तुला घेतले
जे जे स्मरले ते, ते लिहिले
लिहिण्याजोगे सर्व संपता
पत्राखाली ‘तुझीच’ लिहिता
थरथरला का हात असा पण
पुलकित झाला तो हळवा क्षण!
एकेकाळी या पत्राचा असा दिमाख, तोरा होता. पत्र घेऊन पोस्टमन आला की, तो कुणाचं पत्र घेऊन आलाय, कोणाला, कसलं? असले नानाविध प्रश्‍न मनात हिंदकळून जातात. पोस्टमन दारात येऊन हाती पत्र देईपर्यंत जर तिथे उपस्थितांचा बीपी चेक केला तर तो कितीतरी वाढलेला असेल. पोस्टमनचा त्याचवेळी चेहरा जरा निरखला तर असं लक्षात येतं की पूर्वीच्या काळी जे साधू-संन्याशी अगदी निरपेक्ष व स्थितप्रज्ञ होते, त्यांचीच पुढची पिढी म्हणजे हे पोस्टमन असावेत एवढे ते शांत वाटतात. चेहर्‍यावरची एक रेषाही त्यांच्या हलत नाही. अगदी स्थितप्रज्ञ. कोणाच्याही जन्मल्याची चांगली वार्ता देताना त्यांच्या चेहर्‍यावर हास्य नसतं आणि कोणी मृत पावल्याचे तार देतानाही त्यांच्या डोळ्यात अश्रू नसतात. आनंद आणि अश्रू दोघांनाही एकाच समान पारड्यात तोलणारी पोस्टमन ही जमातच काही वेगळी असते.आमच्या घरी पोस्टमन कधी तरी येतो. बर्‍याच वेळेला तो कालची पत्र उद्या म्हणजे दोन दिवसांनी वगैरे घेऊन येतो. परंतु प्रामाणिकपणा हा पोस्ट, आणि पोस्टमन यांचाही वाखाणण्याजोगा असतो. केव्हाही लिहिलेलं पत्र उशीरा का होईना पण ते तुमच्या घरी पोहोचतच. हा प्रामाणिकपणा खरंच महत्त्वाचा आहे. आमच्या घरी पूर्वी ‘कांता’ हा पोस्टमन होता. तो पत्र घेऊन यायचा त्यावेळी ते पत्र कुणालाही आलेलं असलं तरी आम्हीच कुणीतरी ते फोडायचं आणि वाचायचं. त्या पत्रात आजी, आजोबांना एखाद – दुसरं दाखवलं की, ती खूष! आम्हांला मात्र बर्‍याचवेळा निराश व्हावं लागायचं. कारण बर्‍याचवेळा पत्रात लहानांना आशीर्वाद एवढंच वाक्य असायचं. पत्रात जर आमच्या नावाचा उल्लेख आलेला असेल तर आम्ही खूष व्हायचो, बर्‍याचवेळा आमच्या मामाच्या घराकडून मामा, मावशीचं पत्र यायचं. त्यात मात्र आमचा नावानिशी, संदीप काय करतोय, आमची आठवण काढतो की नाही असे प्रश्‍न हमखास विचारले जायचे. अशीच माझ्या मोठ्या भावाची, बहिणीची चौकशी केली जायची आणि मग आम्ही छोटे कंपनी जाम खूष व्हायचो. मग आई आम्हांला पत्र लिहायला बसवी. त्यावेळी मामा, मावशी ज्याचं कुणाचं पत्र आलेलं असेल त्याला पत्र पाठवताना महत्त्वाचा विषय झाल्यावर खाली मग संदीप आठवण काढतो, मामाच्या घरी जाऊया म्हणतो, संध्या तर रोजच तुमची आठवण काढते वगैरे मजकूर लिहिताना आम्हांलाही अत्यानंद व्हायचा. त्यानंतर मग सर्व मामा, मामी, आजी, मावशी, मामेभाऊ, बहिणी यांची नावं घालून भलं मोठं पत्र पाठवायचं. अगदी अर्जंट, पण किरकोळ मजकूर असेल तर पोस्टकार्ड त्याहून महत्त्वाचं. मजकुरासाठी आंतरदेशीय आणि भल्या मोठ्या मजकुरासाठी मात्र पाकीट त्यात तुम्ही दोन-तीन फुलस्केपपर्यंत मजकूर, लेख लिहून पाठवू शकता. त्यानंतर मग पुढची विभागणी म्हणजे लखोटे. त्यात कितीतरी मजकूर भरून पाठवता येतो. परंतु पोस्टाची ही सर्वसाधारण योजना आहे. त्यांचे दरही पोस्टकार्ड सगळ्यात कमी, मग आंतरदेशीय व मग पाकीट, लखोटे अशा चढत्या क्रमाने येतात.
बर्‍याचवेळा पोस्टमनकडून आपली निराशाही होते. पोस्टमन एखादं चांगल्या व्यक्तीकडून आपल्याला पत्र घेऊन आलाय म्हणून आपण धावत जातो आणि त्यावेळी पोस्टमन आपल्या हातात एलआयसीची पैसे भरण्याची नोटीस ठेवून मोकळा होतो. त्यावेळी आपल्याला त्या पोस्टमनचा राग येतो, पण ती आपली चूक असते. आपण अपेक्षा वाढवूनच जगत असतो आणि अचानक असा अपेक्षाभंग झाला की आपण खूप निराश होतो, हे आपल्याला सर्वांनाच पदोपदी अनुभव येत असतात. अशावेळी पोस्टमनचा स्थितप्रज्ञ स्वभाव आदर्श म्हणून ठेवण्यास काहीच हरकत नसावी. शाळेत शिकत असताना मराठी विषयात, व्याकरणात पत्रलेखन हा एक स्वतंत्र विषय होता. त्यावेळी आम्हांला परीक्षेत ५ गुणांचे पत्रलेखन येत असे. त्यात मजकुरापेक्षा पत्राचा मायना व मांडणी महत्त्वाची होती. पत्रात काय लिहिलंय यापेक्षा ते कसं लिहिलंय यावर जास्त भर असायचा. वडिलांना पत्र, आईला पत्र, नातेवाईकांना पत्र, लहान भावाला, त्यानंतर प्रशासकीय पत्रे वगैरे अनेक प्रकार त्यात होते. पत्र लिहिताना प्रथम सुरूवातीलाच वरती मधोमध ‘श्री’ लिहिणे, त्यानंतर वडिलांना पत्र असेल तर ती. रा. रा. म्हणजे तीर्थरूप राजमान्य राजश्री, आईला ती. स्व. म्हणजे तीर्थस्वरूप, असे प्रत्येकाचे मायने, त्यानंतर मग स. न. वि. वि., आशीर्वाद, वगैरे, मग मजकूर आणि त्यानंतर कळावे, तुझाच लाडका मुलगा, मुलगी, वगैरे वगैरे. घरगुती पत्र, व्यावसायिक पत्र, वगैरे पत्रांचे प्रकार आम्हांला होते. त्या त्या व्यक्तींना पत्रं अशी लिहायची, व्यक्तीचा आदरभाव कसा वाढवायचा, व्यक्तीचा आदर कसा ठेवायचा याची खरी शिकवण ही निर्जीव पत्रं जिवंत होत आम्हांला देत होती. पत्राचा आनंद, पत्र लिहिण्यामागची प्रेरणा आणि भावना, या गोष्टीच वेगळ्या.
पत्र लिहिणं हीसुद्धा एक लेखनकलाच! पत्र हा एक मैत्री वाढवण्याचा सुंदर प्रकार आहे. मध्यंतरी ‘बॉर्डर’ हा हिंदी चित्रपट आलेला होता. त्यात सीमेवरील जवानांना ‘संदेसे आते है…’ असं पत्रावरून एक सुंदर गीत चित्रीत केलं होतं. पत्राचं महत्त्व त्यावेळी कळतं. सासूरवाडीला सून होऊन गेलेली कन्या, स्वत:च्या आईला आठवणी किंवा इतर बाबतीत लिहित असलेलं पत्र, त्यात तळमळ, काळजी, आत्मियता किती होती? मुलगा दूर कुठेतरी शिक्षणाला गेलेला असता त्याची काळजी करणारं पत्र जेव्हा काळजाच्या गाभार्‍यातून आई लिहिते तेव्हा त्याची उपमा कशाला द्यावी? पत्र हेच मुळी आत्मियता, जवळीकता आणण्याचं, माणसं जोडण्याचं फार मोठं साधन आहे, होतं. आपल्या प्रियकराला वा प्रेयसीला पत्र लिहिणं म्हणजे तर जणू आत्माच त्यात ओतावा लागत असे. रुक्मिणीनं श्रीकृष्णाला लिहिलेलं पत्र हे जगातील पहिलं प्रेमपत्र असू शकतं.
आज जमाना बदललाय, लोकांकडे कोणाचकडे इतरांसाठी सोडूनच द्या; पण स्वत:साठीही वेळ उपलब्ध नाही. एकमेकांशी सुंदर, मनापासून अगदी काळजापासून संवाद साधण्याचं एक महत्त्वाचं साधन असलेलं ‘पत्र’ आपण हरवत चाललोलो आहोत. आज फोन, मोबाइल या तंत्रज्ञानाच्याा अत्यंत प्रगत माध्यमांद्वारे जग एवढं जवळ आलेलं आहे की फक्त जणू अमेरिकेतील एखादी व्यक्ती भारतातील व्यक्तीला आपटू शकेल तेवढंच बाकी आहे. एकमेकांना दिसण्यापर्यंत प्रगती केलेली आहे. संगणक या अद्वितीय उपकरणाला इंटरनेटची जोड मिळाली आणि अमेरिकेतील माणूस आपल्यासमोर उभा राहिला. पण त्याला आपण स्पर्श करू गेलो तर संगणकाची स्क्रीन हाताला लागते आणि तेवढाच रुक्षपणाही मनाच्या गाभार्‍यातही उत्पन्न होत आहे.
मोबाईलच्या या दुनियेत आईला फोन करताना आईचा ‘हॅलो’ हा आवाज कानापर्यंत पोहोचतो, सेकंदाच्या काही भागात आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो, समोरच ती व्यक्ती आहे अशा थाटात हजारो कोस दूर असूनही आपण तिच्याशी बोलू शकतो. पण आईचा कानाकडे ऐकू येणारा आवाज, हृदयात जात नाही. पण ‘पत्रा’तून तो हृदयापर्यंत नव्हे तर आत्म्यापर्यंत पोहोचत होता. आज मुलगी सासरी गेली की आईच्या मोबाइलवर ‘मी घरी पोहोचले’ एवढा मेसेज टाकते. त्यामुळे तो मेसेज आईला कळतो. तिने सांगितलच तर घरातील इतर सदस्यांपर्यंत पोहोचतो. मोबाइल आईचाच असल्याने कन्येलाही आईस असं लिहिण्याची गरज भासत नाही. त्यामुळे आईच्या मागे असलेली ‘तीर्थस्वरूप’ ही उपाधीही लुप्त झाली, आता पुढच्या पिढीपर्यंत ती गुप्त होणार आहे.
पत्राचं पूर्वी जसं अंगणात, ओसरी वा माजघरात सार्वजनिक वाचन व्हायचं तसं मेसेजचं वाचन होणार नाही, होत नाही. कारण पत्रातील आत्मभाव, आत्मियता, या मेसेजमध्ये नाहीच. मेसेजएवढा रूक्ष प्रकार आज झालेला आहे. प्रिय, ती., लाडक्या नावाच्या आधी येणार्‍या उपाध्या निघून गेल्या आहेत. फोनवर बोलतानाही दूरध्वनीबाबत बोलायचं तर कन्येनं फोन केला व आईनं घेतला तर आवाज एकमेकांना ओळखीचे वाटल्याने ‘आई’ हा शब्दही उच्चारणे बंद झालं तर मोबाइलवर क्रमांकच ‘सेव्ह’ केलेला असल्यामुळे मोबाइलच्या संभाषणातही ‘आई’ वा बछडे हे शब्द लोप पावलेत.
आता जग झपाट्याने जवळ आलंय; पण माणसातील दुरावा वाढतोय आणि ओलावा दूर जातोय, नष्ट होतोय. पत्रातील आपुलकीची जागा मेसेजच्या रूक्षतेनं घेतलीय. मेसेजमध्ये शब्दांचही बंधन आले. आणि पैशांचाच विचार आलाय. ‘पत्र’ हा आणखी एक मोती आज समाजाच्या माळेतून ओघळू लागलाय. पुढच्या पिढीला याची समज करून देणं, जाणीव करून देणं हे मागासलेपणाचं लक्षण होणार आहे.