पणजी स्थानकावरील आरटीओ कार्यालय जुन्या पाटो पुलाजवळील इमारतीत हलवणार

0
100

आग दुर्घटनेमुळे येथील कदंब बसस्थानकावरील वाहतूक खात्याचे नोंदणी कार्यालय सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जुन्या पाटो पुलाजवळील इमारतीमध्ये तात्पुरते स्थलांतरित करण्यात येणार आहे. नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी गुरुवारपासून कार्यालयातील कामकाज सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती वाहतूक खात्याच्या सूत्रांनी दिली.

येथील कदंब बसस्थानकावरील सुपर मार्केट आणि वाहतूक खात्याच्या कार्यालयाला सोमवारी पहाटे लागलेल्या आगीमुळे ठप्प झालेला दुकान व्यावसायिकांचा व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येत आहे. आग दुर्घटनेच्या दुसर्‍या दिवशी बसस्थानकावरील बहुतांश दुकाने बंद होती. बसस्थानकावरील विद्युतपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला नव्हता. वायरींग तपासण्याचे काम जोरात हाती घेण्यात आले आहे. बसस्थानकावरील काही दुकानदारांनी जनरेटरच्या साहाय्याने आपला व्यवसाय सुरू केला. तसेच ज्या दुकानदारांनी स्वतंत्रपणे वीज कनेक्शन घेतले आहे त्यांचा वीजपुरवठा सुरळीत होता.
या आगीमुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिली. अग्निशामक दलाने नुकसान झालेल्याकडून नुकसानीबाबत माहिती मागितली आहे. येत्या एक – दोन दिवसात नुकसानीचा आकडा निश्‍चित होईल, अशी माहिती अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिली. मंगळवारी अग्निशामक दलाच्या अधिकार्‍यांनी बसस्थानकावरील सर्व दुकानांना भेट देऊन पाहणी केली. वाहतूक कार्यालय, सुपर मार्केटची साफसफाईचे काम जोरात सुरू होते.