पणजी व वाळपई मतदारसंघात आज मतदान

0
118

>> पोटनिवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज

>> पर्रीकर, विश्‍वजीत राणेंचे भवितव्य होणार सीलबंद

सगळ्या गोव्याचे लक्ष लागून राहिलेल्या पणजी व वाळपई मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होणार असून राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांचे भवितव्य आज मतपेटीत सीलबंद होणार आहे. सत्ताधारी भाजपबरोबरच विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेस पक्षानेही कधी नव्हे एवढी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे.

पणजीत भाजपचे उमेदवार म्हणून गोव्याचे मुख्यमंत्री असलेले मनोहर पर्रीकर तर कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून युवा कॉंग्रेस नेते गिरीश चोडणकर रिंगणात आहेत. पणजीत खरी लढत या दोघा उमेदवारांमध्ये होणार असली तरी गोवा सुरक्षा मंचतर्फे पक्षाचे अध्यक्ष आनंद शिरोडकर हेही रिंगणात आहेत. शिरोडकर हे भाजपची मते फोडू शकतात याची जाणीव भाजप कार्यकर्त्यांना असल्याने त्यांना नाही म्हटले तरी थोडीशी धाकधुक लागून राहिलेली आहे. भाजपचे मनोहर पर्रीकर तसेच कॉंग्रेसचे गिरीश चोडणकर अशा दोन्ही उमेदवारांनी आपलाच विजय निश्‍चित असल्याचा दावा केला आहे. मनोहर पर्रीकर यांच्या प्रचार कार्यात त्यांचे घटक पक्ष असलेल्या मगो, गोवा फॉरवर्ड यांनी सक्रीय भाग घेतला होता. तसेच सरकारला पाठिंबा दिलेल्या अपक्षांनीही तातडीने त्यांच्यासाठी प्रचार केला. कॉंग्रेसनेही यावेळी बर्‍यापैकी प्रचार केला. दरम्यान, गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे पणजीतील उमेदवार सिद्धार्थ कुंकळयेकर यांच्याविरुद्ध निवडणूक लढवून हरलेल्या बाबुश मोन्सेर्रात यांनीही यावेळी भाजपसाठी प्रचार केल्याने पर्रीकर यांच्यासाठी तिही जमेची बाजू ठरली आहे. दरम्यान, वाळपई मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीत भाजपतर्फे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे तर कॉंग्रेसतर्फे माजी मुख्यमंत्री व फोंडा मतदारसंघाचे आमदार रवी नाईक यांचे पुत्र रॉय नाईक यांच्यात लढत होत आहे. विश्‍वजित राणे हे वाळपईतील लोकप्रिय नेते असून सदर मतदारसंघातून ते चार वेळा विजयी झालेले आहेत. गेल्या वेळी निवडून आल्यानंतर काही दिवसांतच त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्यांची आरोग्यमंत्रीपदी वर्णी लावली होती.
यावेळी त्यांच्याविरुद्ध रॉय नाईक हे लढत देत आहेत. विश्‍वजित राणे यांनी आपल्याला विजयाची शंभर टक्के खात्री असल्याचे म्हटले आहे. तर रॉय नाईक विजयी होतील, असा विश्‍वास त्यांचे वडील रवी नाईक यांनी व्यक्त केलेला आहे.

पर्रीकरांना पाठिंबा ः बाबुश
भाजपचे उमेदवार मनोहर पर्रीकर यांना मतदान करू नका असे आवाहन आपण करीत असल्याचे जे ऑनलाइन वृत्त वायरल झालेले आहे ते खोटे असून त्यासंदर्भात आपण सायबर क्राईम पोलिसांकडे गुन्हा नोंदवला असल्याचे काल बाबुश यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. पर्रीकर यांना आपला पूर्ण पाठिंबा असून आपण व आपल्या पॅनलच्या सर्व नगरसेवकांनी त्यांच्यासाठी प्रचार केल्याचे बाबुश म्हणाले.

निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज
पणजी व वाळपई मतदारसंघातील पोटनिवडणूक सुरळीतपणे व्हावी यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी नीला मोहनन् यांनी काल येथे पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले. पोटनिवडणुकीसाठीचे सर्व साहित्य संबंधित मतदान केंद्रांवर पाठवण्यात आलेले आहे. मतदारांना पैसे अथवा दारू पुरवली जाऊ नये यासाठी दोन्ही मतदारसंघात ठिकठिकाणी वाहनांची तपासणी केली जात असल्याचे मोहनन् यांनी स्पष्ट केले. स्थानिक पोलीस व केंद्रीय निमलष्करी दले कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष ठेवून असल्याचे त्या म्हणाल्या. २१ रोजी संध्याकाळी ५ वाजल्यापासून दोन्ही मतदारसंघात दारूबंदी घोषित करण्यात आली होती. आज मतदानाच्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत ही दारुबंदी लागू राहील. तसेच २८ रोजी मतमोजणीच्या दिवशीही दारुबंदी लागू राहणार असल्याचे त्या म्हणाल्या.
मतपेट्या जुन्या वैद्यकीय महाविद्यालयात
मतपेट्या जुन्या वैद्यकीय महाविद्यालय इमारतीत ठेवण्यात येणार आहेत. पणजीच्या मतपेट्या तळमजल्यावर तर वाळपईच्या पहिल्या मजल्यावर ठेवण्यात येणार असून अनुक्रमे मतमोजणीही तेथेच होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उत्तर गोवा पोलीस अधीक्षक चंदन चौधरी यांनी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आल्याची माहिती दिली.