पणजी व परिसरातील नागरीक पाणी तुटवड्यामुळे हैराण

0
87

राजधानी पणजीच्या विविध भागातील सर्व सामान्य नागरीक तिसर्‍या दिवशी पाण्याच्या तुटवडयामुळे पुरते हैराण झाले.
पाटो आणि मळा पणजी येथे जलवाहिनी बदलण्याचे काम पूर्ण केल्यानंतर सोमवार ४ रोजी संध्याकाळी ओपा पाणी प्रकल्पातून पाणी पुरवठ्याला प्रारंभ करण्यात आला. सुरूवाताली पाण्याचा दाब कमी होती. त्यामुळे मंगळवारी विविध भागात कमी दाबाने पाण्याचा पुरवठा होत होता. यामुळे शहर परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागला.

अनेक नागरिकांच्या नळाला मागील दोन दिवसात पाण्याचा पुरवठा झाला नाही. तसेच साठवून ठेवलेल्या पाण्याचा साठा संपल्याने अनेकांची गैरसोय झाली. मंगळवारी सकाळी पाण्याचा पुरवठा करण्यात आला. कमी दाबाचा पाणी पुरवठा करण्यात आल्याने अनेकांना थोडेच पाणी मिळाले. सदर पाण्याचा पुरवठा अपुरा होता. तसेच कमी दाबाच्या पाणी पुरवठ्यामुळे अनेकांना पाणी मिळाले नाही. पाणी पुरवठ्याबाबत शेकडो नागरिकांनी सांतईनेज – पणजी येथे पाणी पुरवठा खात्याच्या विभागाकडे तक्रारी केल्या. परंतु, नागरिकांना योग्य प्रमाणात पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. जलवाहिनीवरील दुरूस्ती काम हाती घेण्यापूर्वी पाणी पुरवठा विभागाने नागरिकांना योग्य माहिती न दिल्याने सुरूवातीला या विषयाकडे दुर्लक्ष केले. परंतु, सलग दोन दिवस पाण्याचा पुरवठा न झाल्याने अनेकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. काही भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा करून काही नागरिकांची गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मंगळवारी संध्याकाळच्या सत्रात पाण्याच्या दाब वाढल्याची माहिती नागरिकांनी दिली.
करंजाळे, चिंचोळे-भाटले, आल्तिनो, मळा, ताळगाव, बांबोळी, दोनापावला या भागांतील नागरिकांचे पाण्याअभावी हाल झाल्याच्या तक्रारी आहेत.