पणजी मार्केट आजपासून राहणार चार दिवस बंद

0
134

पणजी महानगरपालिकेच्या मार्केटमधील एका दारूच्या दुकानात काम करणारी व्यक्ती काल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने राजधानीत खळबळ उडाली आहे. तसेच चिंबल गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने पणजी महानगरपालिकेने चार दिवस मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सोमवारी १५ जूनला मार्केट पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती महापौर उदय मडकईकर यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. चिंबलमध्ये सापडलेली कोरोना रुग्ण पणजी मार्केटमध्ये व्यवसाय करीत होती.

महानगरपालिकेचे अनेक कर्मचारी आणि विक्रेत्याचा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाशी संपर्क आल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. महानगरपालिकेच्या मार्केटमध्ये कार्यरत असलेल्या ४१ कर्मचार्‍यांची कोविड चाचणी केली जाणार आहे. तसेच महानगरपालिकेमध्ये कामासाठी चिंबलमधून येणार्‍या ६१ कामगारांना सात दिवस कामावर न येण्याची सूचना करण्यात आली आहे. या सर्व कामगारांची कोविड चाचणी करून घेतली जाणार आहे, असेही महापौर मडईकर यांनी सांगितले.

महानगरपालिकेच्या मार्केटमध्ये भाजी विक्री करणार्‍या एका महिलेला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या महिलेच्या स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

ताव्हेर्नवाला तो रुग्ण बेपत्ता
पणजीतून बेपत्ता असलेला ताव्हेर्नमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नवी दिल्लीतून रेल्वेने गोव्यात आला होता. कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. सदर व्यक्तीच्या नवी दिल्ली येथील पत्त्यावर संपर्क साधला असता सदर व्यक्ती नवी दिल्लीतून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी सविस्तर माहिती मिळविण्याचे काम सुरू आहे.

चिंबलमध्ये एकूण ५ रुग्ण
ताळगावनंतर आता चिंबलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह ५ रुग्ण आढळून आल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. चिंबलमधील एकाच कुटुंबातील तिघेजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती वास्को येथील आरोग्य केंद्रात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता. त्या सुरक्षा रक्षकाची पत्नी व सहा वर्षाचा मुलगा कोरोना बाधित असल्याचे चाचणीत स्पष्ट झाले आहे.