पणजी महापालिकेचे मार्केट शुक्रवारपासून खुले ः महापौर

0
132

लॉकडाऊनच्या तिसर्‍या टप्प्यात जी शिथिलता देण्यात आली आहे त्या शिथिलतेनुसार पणजी महापालिकेने नियोजनबद्धपणे पावले उचलत टप्प्याटप्प्याने आपल्या हद्दीतील बाजारपेठा सुरू करण्यावर भर दिला आहे. काल यासंबंधी दै. नवप्रभाशी बोलताना पणजीचे महापौर उदय मडकईकर म्हणाले की, शुक्रवारपासून महापालिका आपले भाजी मार्केट खुले करणार आहे. पणजीतील मासळी मार्केट दोन दिवसांपूर्वीच खुले करण्यात आल्याचे ते म्हणाले.

या भाजी मार्केटबाहेर १०० दुकाने आहेत. त्या शंभर दुकानांपैकी ५०-५० दुकानांना दिवसाआड उघडण्यास आम्ही परवानगी दिली आहे. म्हणजेच जी ५० दुकाने सोमवारी उघडण्यात आली ती मंगळवारी बंद ठेवावी लागतील. सोमवारी जी ५० दुकाने बंद होती ती मंगळवारी उघडण्यात येतील. म्हणजेच दर दिवशी १०० दुकानांपैकी केवळ ५० दुकानेच उघडता येतील. कुठल्या दिवशी कुठली ५० दुकाने उघडता येतील व कुठली ५० बंद ठेवावी लागेल हे महापालिकेने त्यांना ठरवून दिले असल्याचे मडईकर यांनी स्पष्ट केले. त्यानुसार सध्या १०० पैकी रोज ५० दुकाने उघडण्यात येत असून गर्दी टाळण्यासाठी ही पावले उचलण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.