पणजी महापालिका मार्केट संकुल ४ दिवसांपासून वीज पुरवठ्याविना

0
138

येथील पणजी महानगरपालिकेच्या मार्केट संकुलाला वीज पुरवठा करणार्‍या केंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने मागील चार दिवसांपासून मार्केट संकुल काळोखात बुडाला आहे. महानगरपालिकेने वीज पुरवठा केंद्राच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. तथापि, तांत्रिक बिघाड दुरुस्तीच्या प्रयत्नाला रविवारपर्यंत यश प्राप्त झाले नाही.
मार्केटमधील काही व्यापार्‍यांनी जनरेटरच्या साहाय्याने पर्यायी विजेची सोय केली आहे. तर, काही व्यापारी मेणबत्तीच्या उजेडात व्यापार करीत आहेत. मार्केटचा वीज पुरवठा खंडीत असल्याने व्यापार्‍यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. तसेच खरेदीसाठी जाणार्‍या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. राजधानीतील प्रमुख मार्केटमध्ये खरेदीसाठी दररोज नागरिकांची गर्दी असते.

मागील चार दिवसांपासून मार्केट संकुल काळोखात बुडाल्याने व्यापार्‍यांबरोबरच नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मार्केटमधील नागरिकांना चालण्यासाठी ठेवण्यात आलेल्या जागेवर काही व्यापार्‍याकडून सामान ठेवले जात आहे. त्यामुळे मार्केटमधील काळोखामुळे फेरफटका मारताना त्रास सहन करावा लागत आहे. मार्केटमधील काही व्यापार्‍यांनी दुकानात इनव्हर्टर बसविलेले आहेत. परंतु, इनव्हर्टर चार्ज करण्याची सुविधा नसल्याने चालत नाहीत. काही व्यापार्‍यांनी जनरेटरच्या माध्यमातून विजेची सोय केली आहे. तर बहुतांश व्यापारी मेणबत्तीच्या उजेडात व्यवसाय करीत आहे. वीज पुरवठा नसल्याने इलेेक्ट्रॉनिक वजन काटे चालत नसल्याने बरेच व्यापारी व्यवसाय करू शकत नाहीत. त्यामुळे मार्केटमध्ये खरेदीसाठी येणार्‍या नागरिकांना वरच्यावर खेपा घालाव्या लागत आहेत. वीज पुरवठा लवकर पूर्ववत होणार नसल्याने काही व्यापार्‍यांनी वजन काट्यासाठी खास बॅटरी बसवून घेतली आहे.

दुरुस्तीसाठी खाजगी ठेकेदाराची मदत : महापौर
मार्केटला विजेचा पुरवठा करणार्‍या केंद्रात जोरदार पावसामुळे गुरुवार ८ ऑगस्ट रोजी पाणी घुसल्याने मोठा तांत्रिक बिघाड झाला आहे. या वीज केंद्रातील संपूर्ण यंत्रणा नादुरुस्ती झाली आहे. वीज खात्याच्या अधिकार्‍यांनी वीज केंद्राची पाहणी केली. परंतु, वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश प्राप्त झालेले नाही. त्यामुळे वीज केंद्राच्या दुरुस्तीसाठी खासगी ठेकेदारांची मदत घेतली जात आहे. सोमवारपर्यंत वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती महापौर उदय मडकईकर यांनी दिली.