पणजी-मडगाव महामार्गावर चार तास वाहतूक का

0
119

>> सततच्या प्रकारामुळे प्रवाशांत संताप; तातडीने उपायाची मागणी

गेल्या काही दिवसांपासून पणजी-मडगाव महामार्गावर ‘मेगा ब्लॉक’ होऊ लागलेला असून काल सोमवारी या मेगा ब्लॉकने कळस गाठला. काल या महामार्गावरील वाहतूक तब्बल चार तासांपेक्षा जास्त वेळ खोळंबल्याने मडगावहून पणजीच्या दिशेने येणार्‍या प्रवाशांचे अतोनात हाल झाले.

आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे पणजीहून मडगावच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरळीतपणे चालू होती. मात्र मडगावहून येणारी वाहने तब्बल चार तासांपेक्षा जास्त वेळ खोळंबून पडलेली असताना ही वाहतूक सुरळीत करण्यास वाहतूक पोलिसांना पूर्ण अपयश आले. परिणामी सकाळी १० वाजता मडगावहून सुटलेल्या बसगाड्या व अन्य वाहने दुपारी २ नंतरच पणजीत पोचली.

खोळंबा आठ दिवसांपासून
हे सगळे वाहतुकीचे रामायण गेल्या आठवडाभरापासून चालू असताना वाहतूक पोलीस व वाहतूक खाते बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. मागच्या आठवडाभरापासून कधी एक तास कधी दीड तास तर सोमवारी चार तास अशी पणजी-मडगाव महामार्गावरील वाहतूक खोळंबून पडत असताना यावर उपाययोजना काढण्याकडे अद्याप कुणीही लक्ष दिलेले नाही असे ह्या मार्गावरून रोज प्रवास करणार्‍या प्रवाशांचे म्हणणे आहे.
खरे म्हणजे गेल्या सहा महिन्यांपासून ह्या महामार्गावरील वाहतुकीचा खेळखंडोबा झालेला आहे. आणि मागच्या आठ-दहा दिवसांपासून तर समस्येने अगदीच उग्र रूप धारण केले असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. राज्याचे वाहतूक मंत्री कुठे आहेत असा सवालही ह्या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी विचारू लागले आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर गोव्यात नसल्याने ही वाहतूक समस्या आणखी जटील बनेल अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.

कर्मचारी वाहनांमध्ये अडकले
सोमवारी सकाळपासून दुपारपर्यंत मडगावहून पणजीच्या दिशेने जाणारी शेकडो वाहने वाहतूक कोंडीत अडकून पडल्याने मडगावहून पणजीत काम करण्यासाठी येणारा कर्मचारी वर्ग रस्त्यात वाहनासह अडकून पडला. तब्बल चार तास वाहनांमध्ये काढणे ही त्यांच्यासाठी मोठी परीक्षा तर ठरलीच. शिवाय उशिरा दुपारी कार्यालयात पोचल्याने त्यांना वरिष्ठांची बोलणीही खावी लागली. गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील बाह्य रुग्ण विभागात तपासणीसाठी आलेल्या कित्येक आजारी व्यक्तीनी माघारी परतावे लागले. पणजीहून मडगावच्या दिशेने जाणारी वाहतूक चालू असल्याने हे लोक विरुध्द दिशेने येणार्‍या बसमधून माघारी मडगांवी परतले.
पणजीला जाणारी वाहने का रोखून ठेवली?
पणजीहून मडगावच्या दिशेने जाणारी वाहने काही काळ थांबवून मडगांवहून पणजीच्या दिशेने जाणार्‍या वाहनांना वाट मोकळी का करून देण्यात आली नाही. तसे न करता मडगावहून पणजीच्या दिशेने जाणारी वाहने तब्बल चार तास ‘ट्रॅफिक जॅम’मध्ये का ठेवण्यात आली याचे उत्तर वाहतूक पोलीस व वाहतूक खात्याने द्यावे, अश मागणी चार तास वाहतूक कोंडीत अडकून पडलेल्या अनेक प्रवाशांनी केली आहे. ह्या महामार्गावरील उड्डाण पुलाच्या कामामुळे वाहतूक खोळंबून पडणार नाही याकडे संबंधित अधिकार्‍यानी लक्ष द्यावे व सततची डोकेदुखी कायमची सोडवावी, अशी मागणीही प्रवाशांनी केली आहे. सकाळी लोकांच्या कार्यालयात जाण्याच्या वेळेत म्हणजेच ८ ते ११ व संध्याकाळी ६ ते ७.३० ह्या वेळेत पुलाच्या कामामुळे वाहतुकीची कोंडी होणार नाही याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे, अशी मागणीही प्रवाशांनी केली आहे.