पणजी बसस्थानकावर अग्नितांडव

0
118

>> आरटीओ व कदंब कार्यालये, सुपरमार्केट आगीच्या भक्ष्यस्थानी
>> कोट्यवधींचे नुकसान

पणजी कदंब बसस्थानक इमारतीत काल पहाटे ५.३०च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्ता आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. मात्र, जेव्हा ही भीषण आग भडकली तेव्हा इमारतीत लोक नसल्याने जीवितहानी टळली. ह्या आगीत जळून खाक झालेली मालमत्ता नेमकी किती रु.ची आहे हे अद्याप कळू शकलेली नसले तरी ती कोटींच्या घरात असल्याचे अग्नीशामक दलातील सूत्रांनी सांगितले. ही आग शॉर्टसर्कीटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी आग नेमकी कशामुळे लागली ते अद्याप स्पष्ट झाले नसल्याचेही दलाने स्पष्ट केले. सुपर मार्केटचे मालक हम्रानी यांनी या आगीमुळे आपले ८० लाख रु.चे नुकसान झाले असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

बसस्थानक इमारतीतील तळमजल्यावर असलेल्या ‘प्रेझिडेन्शियल सुपर मार्केट’मध्ये भडकलेली ही आग बघता बघता इमारतीतील पहिल्या मजल्यावर असलेल्या वाहतूक खात्याच्या कार्यालयात व कदंब महामंडळाच्या कार्यालयात पसरली. त्यामुळे वरील दोन्ही कार्यालयांतील कागदपत्रे, फर्निचर व प्लायवूड आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ह्या आगीत वाहतूक खात्याची महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. तसेच आगीमुळे कार्यालयाचेही मोठे नुकसान झाले. अग्निशामक दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यासाठी सुमारे ५ तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले. शेवटी १०.३० वाजता त्यांनी आग आटोक्यात आणली.

आग १ हजार चौरस मीटरपर्यंत पसरली
कदंब बसस्थानक इमारतीत भडकलेली ही आग हळुहळू इमारतीत १ हजार चौ. मीटरपर्यंत पसरली. मात्र, अग्निशामक दल विनाविलंब बसस्थानक इमारतीत पोचल्याने आग आणखी दूरपर्यंत पसरण्याचा धोका टळला व तळमजल्यावरील अन्य दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून वाचली. सुपर मार्केटमध्ये सुगंधी द्रव्ये, तेल, तूप अशा आग भडकविणार्‍या वस्तू असल्याने आग भडकून ती दूरपर्यंत तसेच पहिल्या मजल्यावरही पोचली. त्यामुळे कदंब व वाहतूक खात्याची कार्यालये आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. मात्र, आग सुदैवाने पहाटे लागल्याने जीवितहानी टळली. ह्या आगीत प्रेझिडेन्शिएल सुपर मार्केटमधील लाखो रु.चा माल जळून खाक झाला.

आरटीओ कार्यालयाचे मोठे नुकसान : ढवळीकर
दरम्यान, आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या वाहतूक खात्याच्या कार्यालयाची पाहणी करण्यासाठी आलेले वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी ह्या दुर्घटनेत खात्याच्या कार्यालयाचे मोठे नुकसान झाले असल्याचे सांगितले. ह्या आगीत कोणकोणती महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली ते पहावे लागणार असल्याचे ते म्हणाले. आगीत कार्यालयाचे मोठे नुकसान झाले असल्याने कार्यालय अन्यत्र हलवावे लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. १० दिवसांच्या आत कार्यालय अन्य ठिकाणी हलवण्यात येईल, असे ते म्हणाले. बसस्थानक इमारतीला गळती लागल्याने हल्लीच इमारतीची ३५ लाख रु. खर्च करून दुरुस्ती करण्यात आली होती, अशी माहीतीही त्यांनी यावेळी दिली. ह्या आगीमुळे बसस्थानक इमारतीच्या टेरेसला किती नुकसान झाले आहे हे पहावे लागणार असल्याचे ढवळीकर म्हणाले.

सहा बंबांनी आग विझविली
अग्निशामक दलाच्या जवानांना ही आग आटोक्यात आणण्यासाठी सहा बंब आणावे लागले. त्यांपैकी दोन मोठे बंब हे तर प्रत्येकी १२ हजार लिटर एवढ्या पाण्याचे होते, असे सूत्रांनी सांगितले. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांबरोबरच पोलिसांनीही दुर्घटना स्थळी धाव घेतली. प्रेझिडेन्शियल सुपर मार्केटचे मालक हम्रानी हे रवी नाईक यांचे पुत्र रॉय नाईक यांचे सासरे होत. आगीची माहिती मिळताच रॉय नाईक यांनीही घटनास्थळी धाव घेतली.

साळकर ज्वेलर्सचे दागिने बचावले
ज्या सुपर मार्केटला भीषण आग लागली त्याच्या अगदी बाजूला साळकर ज्वेलर्सचे दुकान आहे. आगीची खबर कळताच त्यांनी धाव घेऊन आपल्या दुकानीतल सर्व सोने व सोन्याचे दागिने हलवल्याने त्यांचे करोडो रु.चे सोन्याचे दागिने बचावले. या इमारतीतील वीज वायरिंग जुनी असून त्यामुळेच शॉर्टसर्कीट होऊन ही आग भडकली असावी असा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे.

मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना आग दुर्घटनेची माहिती मिळताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच आवश्यक त्या सूचना केल्या. कदंब महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डेरिक पेरेरा नाटो म्हणाले की ह्या आग दुर्घटनेत कदंब महामंडळाचे किती नुकसान झाले हे एवढ्यात सांगता येणार नाही. आगीत इमारतीचे केवढे नुकसान झाले आहे तेही पहावे लागणार असल्याचे ते म्हणाले.

आग प्रतिबंधक यंत्रणा इमारतीत नाही
कदंब बसस्थानक इमारतीत कोणतीही आग प्रतिबंधक यंत्रणा नव्हती, असे बचाव कार्याच्या दरम्यान अग्निशमक दलाला आढळून आले. कदंब व वाहतूक खात्याच्या कार्यालयात ‘फायर एक्सटिंग्विशर’ही नव्हते. कदंब महामंडळाची इमारत ते सिटी बस स्टँड परिसरापर्यंत सुमारे १४० दुकाने आहेत. मात्र, सुदैवाने त्यांपैकी अन्य सर्व दुकाने आगीपासून बचावली.