पणजीत ७ ते १० दरम्यान ‘ऍक्वा गोवा’ मत्स्य महोत्सव

0
185

मच्छीमारी संचालनालयातर्फे येत्या ७ ते १० डिसेंबर दरम्यान कांपाल, पणजी येथील साग मैदानावर पहिल्या ‘ऍक्वा गोवा’ या मेगा मत्स्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मच्छीमारी मंत्री विनोद पालयेकर यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

या महोत्सवात गोमंतकीयांना विविध जातीचे मासे पाहण्याची संधी मिळणार आहे. महोत्सव काळात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ऍक्वारियम फिश गॅलरी, व्यावसायिक स्टॉल्स, जिवंत मासे हौद महोत्सवात असेल. मुले व ज्येष्ठांसाठी स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. चर्चासत्र, कार्यशाळांचे आयोजन केले जाणार आहे. यात तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार या महोत्सवात सादरीकरण करणार आहेत. मिश्र संगीत, भारतीय संगीत व इतर संगीत ऐकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे, असे मंत्री पालयेकर यांनी सांगितले.

या महोत्सवाचे उद्घाटन ७ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या हस्ते करण्यात येईल. यावेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, नगरविकास मंत्री विजय सरदेसाई, गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर, दक्षिण गोवा पीडीएच्या अध्यक्ष रेणुका सिल्वा व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. १० रोजी होणार्‍या समारोप सोहळ्याला केंद्रीय कृषी व मच्छीमारी मंत्री राधामोहन सिंह उपस्थित राहणार आहेत.

प्रदर्शन सकाळी १० ते रात्री १० यावेळेत खुले राहणार आहे. मनोरंजनात्मक कार्यक्रम संध्याकाळी ५ ते १० यावेळेत होणार आहेत, असेही मंत्री पालयेकर यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला खात्याचे संचालक जयस्वाल उपस्थित होते.