पणजीत कोण?

0
102

पणजी विधानसभा मतदारसंघातील आजच्या पोटनिवडणुकीत चार उमेदवार रिंगणात असले, तरी मनोहर पर्रीकर यांचे राजकीय वारसदार सिद्धार्थ कुंकळकर आणि कॉंग्रेसचे उमेदवार व पणजीचे महापौर सुरेंद्र फुर्तादो यांच्यातील लढतीकडे संपूर्ण राज्यातील जनतेचे लक्ष आहे. मनोहर पर्रीकर यांंच्या पाठीशी पणजीची जनता आजवर सातत्याने उभी राहिली. ते म्हापशाचे असूनही त्यांना स्वीकारले आणि दरवेळी भरघोस मतांनी निवडून दिले. आता ते केंद्रात संरक्षणमंत्री बनले असल्याने आपला राजकीय वारसदार तशाच भरघोस मतांनी निवडून आणणे ही त्यांना आपली जबाबदारी वाटते, त्यामुळे ते आपली केंद्रीय मंत्रिपदाची झूल उतरवून ठेवून स्वतः प्रचारात उतरले आहेत. ‘बाय वन, गेट टू’ ची भावनिक हाक त्यांनी पणजीकरांना दिलेली आहे. दुसरीकडे सुरेंद्र फुर्तादो गेली वीस – पंचवीस वर्षे पणजीच्या प्रश्नांशी निगडित राहिले आहेत. महापौरपदाची त्यांची कारकीर्द छोटी असली, तरी नगरसेवक म्हणून दीर्घकाळ ते पणजीच्या प्रश्नांमध्ये रस घेत आले आहेत. यावेळी कॉंग्रेसने त्यांना उमेदवारी देऊन लढतीत चुरस आणली असली, तरी फुर्तादो यांना ज्यांनी महापौर बनवले ते बाबूश मोन्सेर्रात यावेळी गूढ कारणांसाठी त्यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. कुंकळकर, फुर्तादो आणि उच्चविद्याविभूषित, परंतु पणजीला आजवर परिचित नसलेले समीर केळेकर, कुळ मुंडकारांचा पणजी शहरवासियांसी संबंधित नसलेला प्रश्न घेऊन रिंगणात उतरलेले सदानंद वायंगणकर या चौघांपैकी कोणाला निवडायचे याचा फैसला आज पणजीची सुज्ञ, विचारी जनता करणार आहे. पणजी हे सुशिक्षितांचे शहर आहे. जवळजवळ ९१ टक्के साक्षरता असलेल्या या शहरातील मागील निवडणुकांत अत्यंत उत्साही व भरघोस मतदान होत आले आहे. २०१२ च्या निवडणुकीत ७७.१३ टक्के मतदान झाले होते. गेल्या लोकसभा निवडणुकीतही ७३. २७ टक्के मतदान पणजीत झाले होते. असेच भरघोस मतदान यावेळीही होईल यात शंका नाही. पणजी हे राजधानीचे शहर असले तरी तिला अनेक समस्यांनी ग्रासलेले आहे. विशेषतः कचरा आणि पार्कींग व वाहतूक कोंडी या येथील मूलभूत समस्या. जोडीला सांतिनेज नाल्याची अस्वच्छता, आल्तिनोसारख्या भागातील पाणीटंचाई, अशा नागरी समस्या मतदारांपुढे आहेत. त्यांच्या सोडवणुकीचे आश्वासन दोन्ही प्रमुख उमेदवारांनी आपल्या जाहीरनाम्यांत दिलेले आहे. या निवडणुकीतील जमेची बाजू म्हणजे प्रचाराच्या निमित्ताने का होईना, या दोन्ही उमेदवारांनी पणजीचे घरोन्‌घर पिंजून काढले. त्यामुळे मतदारांच्या समस्यांची कल्पना तरी त्यांना आली. पणजीच्या समस्यांकडे या निमित्ताने लक्ष वेधले गेले हेही नसे थोडके. पाचवेळा आमदार राहिलेले पर्रीकर आणि गेली पंचवीस वर्षे नगरसेवक असलेले आणि गेले अठरा महिने महापौर राहिलेले फुर्तादो यांनी आपल्या कारकिर्दीत पणजीकरांसाठी काय केले याचा चोख हिशेब मतदार आता करणार आहेत. मोफत वायफाय आणि गार्डन सिटी करण्यापेक्षा या शहराला कर्करोगाप्रमाणे ग्रासलेल्या कचरा, पार्कींग, वाहतूक कोंडी, पाणीटंचाई, सांडपाणी निचरा अशा मूलभूत सुविधांच्या सोडवणुकीची मतदारांना अधिक प्रतीक्षा आहे. शहरात एकूण २२ हजार मतदार आहेत आणि त्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या त्यात अधिक आहे. पर्रीकर पणजीवासियांमध्ये लोकप्रिय आहेत यात शंकाच नाही, परंतु आता त्यांच्यानंतर तीच स्वीकारार्हता सिद्धार्थ यांना मिळणार का हे पाहावे लागेल. सुमारे बारा हजार हिंदू मतदार, त्यातही तीन – साडे तीन हजार सारस्वत, सुमारे आठ हजार ख्रिस्ती मतदार आणि अकराशे मुस्लीम मतदार अशी पणजी मतदारसंघातील मतदारांची साधारणतः विभागणी आहे. अल्पसंख्यक मतदारांचा कल यावेळी कोणत्या बाजूने असेल हेही या निवडणुकीत महत्त्वाचे ठरेल. पर्रीकर यांनी अल्पसंख्यकांमध्ये निर्माण केलेला विश्वास कितपत टिकून आहे हेही हा निवडणूक निकाल सांगणार आहे. सिद्धार्थ यांच्या पाठीशी पर्रीकर ठामपणे उभे आहेत. फुर्तादोंच्या प्रचारात रवी, राणे, दिगंबर वगैरे कॉंग्रेसचे दिग्गज उतरले असले, तरी पणजीत ज्यांचा प्रभाव आहे असे बाबूश मात्र दूर राहिले आहेत. या सार्‍याची गोळाबेरीज निकालातून प्रकटेल. जो निवडून येईल त्याच्यावर पणजी शहराचा कोंडलेला श्वास मोकळा करण्याची मोठी जबाबदारी असेल!