पणजीत कार पार्किंग शुल्क ताशी २० रुपये

0
153

पणजी महानगरपालिका क्षेत्रात पाच मार्गांवरील सशुल्क पार्किंगसाठी चार चाकी वाहनांसाठी पार्किंग शुल्क वाढविण्यात आले असून कारगाडी प्रति तास २० रुपये आणि पुढील प्रत्येक तासासाठी १५ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. जिल्हा दंडाधिकार्‍यांनी जुन्य दरानुसार सशुल्क पार्किंगसाठी अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेमध्ये आवश्यक दुरुस्ती करून घेतली जाणार आहे, अशी माहिती महापौर उदय मडकईकर यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

१८ जून रस्त्यावरील सनराईज हॉटेल ते चर्च चौकाजवळील बीएसएनएल कार्यालय, डॉ. आत्माराम बोरकर रस्त्यावरील चर्च चौकातील कॉर्पोरेशन बँक ते रायू चेंबर, चर्च सर्कल गार्डन, जुन्या सचिवालयामागील भाग, मिरामार सर्कल येथील जॅक सिक्वेरा रस्ता ते शारदा मंदिर स्कूल या भागात सशुल्क पार्किंगसाठी जागा निश्‍चित करण्यात आलेल्या आहेत. नवीन शुल्काची माहिती जिल्हा दंडाधिकार्‍यांनी दिली जाणार असून अधिसूचनेत आवश्यक बदल करून घेतला जाणार आहे, असेही महापौर मडकईकर यांनी सांगितले.

पाच ठिकाणच्या सशुल्क पार्किंग क्षेत्रात येणार्‍या रहिवाशांना एक कारगाडी पार्क करण्यासाठी मान्यता दिली जाणार आहे. शहरातील विविध भागात सुमारे १२० टुरिस्ट टॅक्सींना मोफत पार्किंगची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे, असेही महापौर मडकईकर यांनी सांगितले.
शहरातील विविध भागातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे, असे मडकईकर म्हणाले.