पणजीतील पे पार्किंग अंमलबजावणी बाबत संभ्रम

0
229

पणजी शहरातील पे पार्किंग प्रश्‍नावर महापौर नगरसेवक व आयुक्त यांच्यात तीव्र स्वरूपाचे मतभेद असून काल पार्किंग विषयावर चर्चा करण्यासाठी झालेल्या बैठकीत शहरात पे पार्किंग निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून सुरू करावी यावर कोणताही निर्णय होऊ शकला नाही. महापौर सुरेंद्र फुर्तादो यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या विषयावर एकही शब्द बोलण्यास तयार नसल्याचे पत्रकारंना सांगितले. महापालिकेचे आयुक्त संजीत रॉड्रीगसही वरील निर्णयाची अंमलबजावणी कधी व कशा पध्दतीने होईल, हे स्पष्ट सांगण्यास तयार नाहीत. शहरातील पे पार्किंगसाठी अनेक जागा तत्वत: यापूर्वीच निवडल्या होत्या. काही भागात शंभर टक्के व्यापारी आस्थापने आहेत तर काही भागात व्यापारी व निवासी घरे आहेत. पे पार्किंग केल्यानंतर निवासी लोकांच्या वाहनांचे काय करावे हा तिढाही सुटलेला नाही.