पणजीतील आयनॉक्स सहा महिन्यांसाठी राहणार बंद

0
113

>> मार्च किंवा एप्रिलपासून सुरू होणार दुरुस्ती

पणजीतील आयनॉक्स थिएटरला नवा साज चढवण्याचे काम येत्या मार्च अथवा एप्रिल महिन्यापासून हाती घेण्यात येणार असल्याची माहिती गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. सप्टेंबर महिन्यापर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याचे ते म्हणाले.

आयनॉक्स मल्टिप्लेक्सची इमारत पाडण्यात येणार नसून केवळ नूतनीकरण करणे, तांत्रिकदृष्ट्या थिएटरचा दर्जा वाढवणे, सुशोभिकरण करणे असेच काम करण्यात येणार असून गोवा सरकार त्यावर एक पैसाही खर्च करणार नसल्याची माहिती फळदेसाई यांनी यावेळी दिली. सध्याची इमारत पाडून तेथे नवी इमारत बांधण्याचा कोणताही विचार नसून विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी वस्तुस्थिती जाणून न घेताच सरकार तेथे नवी इमारत बांधू पहात असल्याचे म्हटले होते. त्यावर कुणीही विश्‍वास ठेवू नये, असे फळदेसाई म्हणाले.

पणजीतील मल्टिप्लेक्स थिएटर २००४ साली बांधण्यात आले होते. तेव्हापासून आतापर्यंत या मल्टिप्लेक्सचे नूतनीकरण करण्यात आलेले नाही. आता नूतनीकरणाबरोबरच चित्रपट दाखवण्यासाठीची अत्याधुनिक अशी यंत्रणाही आणण्यात येणार आहे. थिएटर्समधील खुर्च्या बदलून जास्त आरामदायी अशा खुर्च्यांची सोय करण्यात येणार आहे. तसेच फरशाही बदलण्यात येणार आहेत. या मल्टिप्लेक्सचा वापर इफ्फी महोत्सवासाठी होत असल्याने या मल्टिप्लेक्सचा दर्जा हा आंतरराष्ट्रीयस्तराचा बनवण्यात येणार आहे.