पणजीतील अविस्मरणीय वास्तूंचे ऋणानुबंध

0
310
  •  रमेशचंद्र जतकर

प्रसिद्ध संचालक (निवृत्त)
गोवा सरकार

असे हे माझे पणजीतील वास्तूंचे आणि त्यातील व्यक्तींचे ऋणानुबंध. हे संबंध म्हणजे एक इंद्रधनुष्यच आहे. आज पणजी पूर्वीसारखी नसली तरी या वास्तूंनी पणजीचे ऐतिहासिक महत्त्व आणि सौंदर्य टिकवले आहे. ते तसेच राहो अशी माझी विधात्याकडे प्रार्थना.

आपण या जगात अवतरलो ती जन्मवेळ, जन्मस्थळ, शिक्षण, कार्यक्षेत्र, कार्यप्रदेश, त्यातील वास्तू आणि त्या राहणार्‍या व्यक्तींशी आलेले आपले कालमर्यादित ऋणानुबंध हे सारे विधिलिखित असतात. त्याला आपण नशीब म्हणतो. कारण आपल्याला ते आपल्या आवडी-निवडीप्रमाणे मिळत नसतात. या कालचक्रात कोणीच अपवाद नसतो. जो तो त्याच्या जीवनातील ऋणानुबंधानुसार अनुभवांची आठवण साठवण करीत असतो आणि सुख-दु:खाची माळ जपत आयुष्यातील कालपर्वाला सामोरे जात असतो.
माझ्याही जीवनात १९६२ पासून पणजीतील वास्तू आणि व्यक्तींशी जे ऋणानुबंध विधात्याने घडवून आणले ते आजही अर्धशतकानंतर एका चंदेरी दुनियेत घेऊन जात असतात.

पणजीचा फेरफटका मारताना लागणारे महत्त्वाचे टप्पे अविस्मरणीय आहेत. कारण ते आकर्षक आणि आपल्याला भावणारे, भावबंधन निर्माण करणारे आहेत. पर्यटकांच्या लक्षात राहण्यासारख्या प्रेक्षणीय स्थळांत पणजीतील मध्य वस्तीतील चौकोनी भाग आणि त्याच्या बाजूनी वाहनांची आणि माणसांची वर्दळ. चारी बाजूस उभ्या असलेल्या जुन्या-नव्या वास्तूंची बैठक कोणालाही संभ्रमात टाकणारी अशी आहे.
पोर्तुगीजकालीन नगररचनाकाराचे हे साडेचारशे वर्षांतील कर्तृत्व लोकवस्ती वाढलेल्या सध्याच्या पणजीत वाहतूक समस्या निर्माण करणारे झाले आहे. तरीही त्यात उल्लेखनीय वास्तू म्हणजे नगरपालिका उद्यानासमोरील ‘क्लब वास्को-द-गामा’ आणि तो साराच चौकोनी परिसर ओलांडल्यानंतर दृष्टीस पडते ते पणजीचे ‘मेरी इमॅक्युलेट चर्च.’ तेथून सुरू होणारे दोन उंचावलेले रस्ते तुम्हाला पणजीच्या दोन दिशांना घेऊन जातात. उजव्या बाजूने जाणारा रस्ता सांतईनेजला (म्हणजे मुंबईतील मलबार हिल) जातो व डाव्या बाजूने उंटाच्या पाठीसारखा चढाव-उताराचा मार्ग. त्याला कोर्ती म्हणतात. तो उतरून खाली आल्यावर उजव्या बाजूस आतल्या भागात प्रवेश केल्यावर ‘थर्टी फर्स्ट जानेवारी’ रोड. त्याच्या तोंडावर असलेली त्याच नावाची प्रख्यात बेकरी, तेथील केक, पेस्ट्रीज (एक पोर्तुगीज गोड पदार्थ), ब्रेड, बिस्किटे यांची चव तुमच्या जिभेवर बराच काळ रेंगाळणारी असते. तेथून पुढे आलात की लागते मुलींची मेरी इमॅक्युलेट कॉन्व्हेंट शाळेची मागची बाजू. त्यापुढे नावाजलेले मराठी माध्यमाचे पीपल्स हायस्कूल आणि सेंट सेबेस्टीय पॅलेस. त्यानंतर मळा ज्याला पोर्तुगीज भाषेत फोंताईनेस नावाने पणजीकर ओळखतात.

मी या मळ्याच्या टोकाला वेल्हो नावाच्या गोव्यातील प्रख्यात कॅथलिक ख्रिश्‍चन जमीनदाराच्या तीन खणी कौलारू लहान एकमजली बैठ्या बंगल्यात राहत होतो. सुमारे दोन किलोमीटरचा हा मळा-फोंताईनेस तेथील निवासस्थानांसाठी प्रसिद्ध आहे. तेथील घरे इंडो-पोर्तुगीज स्थापत्त्यशास्त्राच्या आकर्षक कल्पनांवर बांधलेली असून तो सारा परिसर ऐतिहासिक आणि अलौकिक असल्याने सरकारने त्याला ‘हेरिटेज झोन’ म्हणून घोषित केला असून तेथील घरात कोणतीही दुरुस्ती करण्यास मनाई केली आहे. आमने-सामने बांधलेली ही घरे आपल्याला एका मंतरलेल्या जगात घेऊन जातात. मळ्याच्या मध्यभागी इतिहासकालीन नैसर्गिक झरा असून त्याला मळेवासी ‘झरी’ म्हणतात. त्यातून मिळणार्‍या शुद्ध निर्भेळ पाण्यावर आपले जीवन आनंदात घालवतात. झरीच्या शेजारी असलेल्या टेकडीवर मारुती मंदिर आहे. संकट विमोचन हनुमान रात्रंदिवस मळेकरांना आशीर्वाद देऊन त्यांचे रक्षण करत असतो आणि मळेकरही फेब्रुवारी महिन्यात त्याची मोठी जत्रा भरवून पालखीतून त्याची मिरवणूक काढून आपली श्रद्धा त्याच्या चरणी अर्पण करतात.

टेकडीवर जाणारा रस्ता थेट पणजीच्या अल्तिनो भागाला जोडला गेला असून मध्यभागी असलेल्या मारुतीरायाचे दर्शन घेऊनच पणजीवासी ये-जा करीत असतात. आल्तिनो म्हणजे अतिप्रतिष्ठित, श्रीमंत, उद्योगपती आणि राजकारणात यशस्वी झालेल्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकारी मंत्रिगणांच्या बंगल्यांनी गजबजलेला भाग. सरकारशी निगडीत भारदस्त वातावरणातील या सार्‍या वास्तू आहेत.
गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांचा खासगी बंगलाही येथेच आहे. त्याला आता ऐतिहासिक महत्त्व आले आहे. मुक्तीनंतरच्या अनेक अविस्मरणीय चिरकालीन घटनांची ऐतिहासिक नोंदी केलेला हा मूक साक्षीदार- वास्तू भेट देण्यासारखा आहे. त्याशिवाय कॅथलिक ख्रिश्‍चन समाजाच्या मुख्य धर्मगुरूंचे निवासस्थान ‘बिशप पॅलेस’ आल्तिनोवर आहे. पोर्तुगीजकालीन लायसेम-लिसेव्ह कॉलेज, पणजीची आकाशवाणी, दूरदर्शन केंद्रे, सरकारी खातेप्रमुखांची (सचिव हुद्याचे) निवासस्थानेही मळा- आल्तिनो व्हाया मारुती मंदिर या चढणीवरील रस्त्यावर आहेत. एकंदरीत पणजीच्या भटकंतीत एकदा तरी पाहण्यासारखा हा नयनरम्य लोकप्रिय भाग आहे.

मळ्याचा उल्लेखनीय संदर्भ म्हणजे, या वस्तीत गोव्याच्या इतिहासातील नामवंत, असामान्य कर्तृत्वाच्या प्रसिद्ध व्यक्ती राहत असत. त्यातील अग्रणी म्हणजे जागतिक कीर्तीचे गोमंतकीय इतिहासकार डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर, गोवा विधानसभेचे सभापती गोपाळ आपा कामत, स्वातंत्र्यसैनिक शंकर सरदेसाई, आपा करमळकर यांचे वास्तव्य मळ्यातच होते. माझी त्यांची ओळख होती, पण तो ऋणानुबंध अल्पकालीन होता.
पणजीतील आणखी काही अविस्मरणीय वास्तू म्हणजे पणजी नगरपालिकेसमोर असलेले ‘कॅफे सेंट्रल.’ मी गोव्यात मार्च १९६२ मध्ये दै. ‘गोमन्तक’चा उपसंपादक होतो. तेव्हापासून १९९४ जूनपर्यंत सरकारचा प्रसिद्धी संचालक म्हणून सेवानिवृत्ती होईपर्यंत माझे ‘कॅफे सेेंट्रल’शी पोटपूजेसाठीचे ऋणानुबंध जुळले. पुण्यात आल्यानंतरही मी जेव्हा गोव्यात असतो तेव्हा पणजीतील या प्रख्यात तहान-भूक केंद्रातील पॅटिस, समोसे यांचा समाचार घेतल्याशिवाय राहत नाही. माझ्या माहितीप्रमाणे (चूक असल्यास क्षमस्व) कारवारच्या गायतोंडे कुटुंबीयांनी हा प्रसिद्ध खाऊकट्टा सुमारे ६० ते ७० वर्षांपूर्वी स्थापन केला असल्याचे कळते. त्यांच्या तीन पिढ्या गोमंतकीयांची खाद्यसेवा करण्यात गेल्या असतील. माझीही तीन पिढ्यांची प्रतिनिधी माझी नात कस्तुरी मंगेश जतकर (एमबीए झाल्यानंतर सध्या ती आयसीआयसीआय बँकेच्या ठाणे येथील शाखेत डेप्युटी मॅनेजर आहे.) अलीकडेच गोव्यात असताना कॅफे सेंट्रलमध्ये गेली होती. असे हे आमचे तीन पिढ्यांपर्यंतचे कॅफे सेंट्रलच्या खाद्यसंस्कृतीचे संबंध. असे हे कॅफे सेंट्रल अवश्य भेट देण्याचे ठिकाण. अजूनही संध्याकाळी पाच वाजल्यानंतर जिभेचे चोचले पुरवण्यासाठी येणार्‍या लोकांच्या गाड्या ‘आप कतार मै है’ म्हणत त्यांच्या मालकांच्या हातातील खाद्य पदार्थांचे दर्शनसुख घेण्यासाठी रांगेत उभ्या असतात. ही एक अविस्मरणीय आठवण.

गोव्याची खाद्यसंस्कृती जागतिक स्तरावर नेणारे आणखी एक फार प्रसिद्ध ठिकाण म्हणजे हॉटेल मांडवी. मी शिष्टाचार अधिकारी असल्याने आणि गोव्याला भेट देणार्‍या अनेक महनीय पाहुण्यांना मुख्यमंत्री, मंत्रीगण, सभापती वगैरेंतर्फे देण्यात येणार्‍या सन्माननीय आदर-सत्काराच्या पार्ट्या (भोजन व्यवस्था) तेथेच आयोजित करीत असे. मांडवीचे तेव्हाचे मॅनेजर कामत आणि मालक केणी बंधू यांच्याशी माझे सेवानिवृत्त होईपर्यंत संबंध होते. मांडवी हॉटेल हे एक असे संस्मरणीय ठिकाण आहे. पर्यटकांसाठी तेथील पाहुणचार आणि जेवण म्हणजे न विसरता येणारा सुखद अनुभव आहे. पणजीतील मांडवी नदीच्या फेरीबोटीच्या धक्क्याजवळ असलेली ही राजेशाही वास्तू मी कधीच विसरू शकत नाही.

पणजी फेरीबोट धक्का ते मिरामार, दोनापावला राजमार्गावर कला अकादमी, क्रीडासंकुल या वास्तू आहेत. दोनापावला हे पणजीपासून सात किलोमीटरवरील ठिकाणही काही जगप्रसिद्ध वास्तूंनी नावाजलेले आहे. गोव्याच्या राज्यपालांचे निवासस्थान राजभवन, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, गोवा विद्यापीठ, करंजाळे, मिरामारचे समुद्र किनारे आणि इतर परिसर, त्यांच्याशी जुळलेले माझे ऋणानुबंध म्हणजे एक अनमोल खजिना आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीचे पहिले डायरेक्टर डॉ. झेड ए. कासीम यांनी संस्थेला जगमान्यता मिळवून दिली. या संस्थेने अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सागर संशोधनाचे श्रेय मिळविलेले आहे. त्यातील विशेष उल्लेखनीय म्हणजे सौराष्ट्र सागर किनार्‍याखाली वसलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या द्वारकानगरीचे सापडलेले अवशेष. डॉ. कासीम यांनी संस्थेला जगमान्यता मिळवून देण्यासाठी घेतलेल्या श्रमांचे आज असंख्य सागर संशोधक चीज करत आहेत. असामान्य विद्याविभूषित असूनसुद्धा डॉ. कासीम सौजन्यता, साधी राहणी, लोकांना आपलेसे करून घेणारा मृदू स्वभाव आणि भारदस्त व्यक्तिमत्त्व या गुणांमुळे गोव्यात प्रसिद्ध होते. माझा त्यांचा ऋणानुबंध मी सेवानिवृत्त (१९९२) होईपर्यंत होता.
असे हे माझे पणजीतील वास्तूंचे आणि त्यातील व्यक्तींचे ऋणानुबंध. हे संबंध म्हणजे एक इंद्रधनुष्यच आहे. आज पणजी पूर्वीसारखी नसली तरी या वास्तूंनी पणजीचे ऐतिहासिक महत्त्व आणि सौंदर्य टिकवले आहे. ते तसेच राहो अशी माझी विधात्याकडे प्रार्थना.