पणजीच्या वीज कार्यालयावर महिला कॉंग्रेस मोर्चा नेणार

0
108

गोवाभरात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा व भरमसाठ वीज बिले यामुळे जनता हैराण झालेली असून याप्रश्‍नी प्रदेश महिला कॉंग्रेस पुढील आठवड्यात वीज खात्याच्या पणजी कार्यालयावर मोर्चा नेणार असल्याचे प्रदेश महिला कॉंग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
एका बाजूने सतत वीजपुरवठा खंडित होत आहे. तर दुसर्‍या बाजूने वीज खाते वीज दरात प्रचंड वाढ करून वीजग्राहकांना महागाईचा ‘शॉक’ देत असल्याचा आरोप कुतिन्हो यांनी केला.

फोंडा येथे पिता-पुत्राला वीजेचा धक्का बसून ते मृत्यूमुखी पडण्याची जी दुर्घटना घडली त्याची चौकशी होण्याची मागणीही कुतिन्हो यांनी केली. निकृष्ट दर्जाचे ट्रान्सफॉर्मर, निकृष्ट दर्जाचे पथदीप आदी कारणांमुळे वीज समस्या निर्माण झाली आहे. पथदीप नसल्याने गोवाभरात अंधाराचे साम्राज्य असल्याचे त्या म्हणाल्या.
भू-वीज वाहिन्या घातल्या असतानाही वीज पुरवठा पुन्हा पुन्हा का खंडित होत आहे, असा प्रश्‍नही कुतिन्हो यांनी केला. डिजिटल वीज मिटरमुळे ग्राहकांना हजारो रु. वीज बिले देऊ लागले असल्याचे कुतिन्हो यांनी सांगितले.

मृतांच्या कुटुंबियांना
नुकसान भरपाई द्या
फोंडा येथे पिता-पुत्राला विजेचा धक्का बसून त्यांचा मृत्यू होण्याची घटना घडली त्या कुटुंबाला वीज खात्याने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही कुतिन्हो यांनी यावेळी केली.