पक्ष्यांच्या हत्येचे प्रमाण गोव्यात कमी ः सक्सेना

0
98

>> पक्षी महोत्सवात श्रीलंकेतील पक्षीप्रेमी येणार

वनखात्याने १२ ते १४ जानेवारी दरम्यान आयोजित दुसर्‍या पक्षी महोत्सवात नेत्रावळी, खोतीगाव अभियारण्याबरोबरच महासागरातील पक्षी पाहण्याची संधी पक्षीप्रेमींना दिली जाणार आहे, अशी माहिती प्रधान मुख्य वन्यसंरक्षक अजय सक्सेना यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. गोव्यात पक्ष्यांच्या हत्येचे प्रमाण कमी असल्याची माहिती सक्सेना यांनी दिली.

देशभरात पक्षाच्या १२०० प्रकारच्या पक्ष्यांच्या जाती आढळून येतात. तर, गोव्यात ४४० प्रकारचे पक्षी आढळून येत आहेत. देश, विदेशातून पक्षी गोव्यात येतात. काणकोण तालुक्यातील अभयारण्यात तसेच समुद्र किनारी भागात मोठ्या प्रमाणात पक्षी आढळून येत आहेत. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी पक्षी निरीक्षण करण्याची संधी उपलब्ध केली जाणार आहे. बोंडला अभयारण्यात घेण्यात आलेल्या पहिल्या पक्षी महोत्सवात शंभरच्या आसपास पक्षीप्रेमी सहभागी झाले होते. दुसर्‍या पक्षी महोत्सवासाठी आत्तापर्यत ३५ पक्षीप्रेमींना नोंदणी केली आहे. या पक्षी महोत्सवात विद्यार्थ्यांचा समावेश करून घेतला जाणार आहे. श्रीलंकेतील पक्षीप्रेमी या महोत्सवात सहभागी होत आहेत, असेही सक्सेना यांनी सांगितले.

देशाच्या तुलनेत गोव्यात पक्षी हत्येचे प्रमाण कमी आहे, असा दावा सक्सेना यांनी केला. परराज्यात काही ठिकाणी पक्ष्यांचे छायाचित्रे काढण्याचा प्रयत्न केल्यास पक्षी दूर पळतात. तथापि, गोव्यात विविध ठिकाणी पक्षी मोकळ्या वातावरणात फिरताना दिसतात. पक्ष्यांची छायाचित्रे व्यवस्थितपणे घेतली जाऊ शकतात, असेही सक्सेना यांनी सांगितले.