पक्षसंघटना मजबुतीसाठी फालेरोंची धडपड

0
101

– गुरुदास सावळ

कॉंग्रेस भवनासमोरील एका खुल्या हॉटेलात झालेल्या एका शानदार सोहळ्यात विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे यांनी लुईझिन फालेरो यांना अध्यक्षपदाची सूत्रे प्रदान केली. मावळते अध्यक्ष जॉन फर्नांडिस यांनी ही सूत्रे प्रदान केली असती तर ते अधिक सयुक्तिक ठरले असते. पण ज्या पद्धतीने जॉन यांची उचलबांगडी करण्यात आली ते पाहता ते या सोहळ्याला उपस्थित राहतील अशी अपेक्षा बाळगणे चुकीचे आहे.अवघ्या नऊ महिन्यांत जॉन फर्नांडिस यांना पायउतार व्हावे लागल्याने त्यांना दुःख होणे साहजिकच आहे. जॉन फर्नांडिस हे ज्येष्ठ कॉंग्रेस पुढारी आहेत, पडत्या काळात कॉंग्रेस संघटना बळकट करण्यासाठी ते कार्यरत राहतील असे वाटल्याने गोवा प्रभारी दिग्विजयसिंग यांनी त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. जॉन फर्नांडिस यांनी आपल्या विचित्र वागण्याने पक्षसंघटना बळकट करण्याऐवजी खिळखिळीच करून टाकली. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना निलंबित आणि पक्षातून काढून टाकण्याची कारवाई केल्याने विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे यांच्यापासून युवक कॉंग्रेस अध्यक्ष वालंका आलेमांव यांच्यापर्यंत सर्वजण चिडले होते. जॉन हटाव मोहीम त्यांनी चालू केली होती. प्रत्यक्षात ऑगस्ट महिन्यातच हा निर्णय झाला होता. जॉन यांना आणखी एक संधी देण्याचे कॉंग्रेसश्रेष्ठींनी ठरविले आणि त्यांना आणखी दोन महिने जीवदान मिळाले. पण त्यांनी आपल्या कारवाया चालूच ठेवल्याने अखेर जॉन यांची उचलबांगडी करण्यात आली. आपण जे काही केले ते पक्षाच्या भल्यासाठीच केले असे त्यांना प्रामाणिकपणे वाटते. त्यामुळे कॉंग्रेसश्रेष्ठींनी आपली उचलबांगडी करून आपल्यावर अन्याय केला असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे नूतन अध्यक्षांच्या सिंहासनरूढ सोहळ्याला हजर राहणे त्यांना प्रशस्त वाटले नसावे. कॉंग्रेससाठी पर्वरी येथे नवे भवन बांधण्याची योजनाही त्यांनी आखली होती.
नव्या अध्यक्षांनी कामाची सुरुवात मोठ्या दिमाखात केली. कॉंग्रेस कार्यालयात होमहवन करून त्यांनी कार्यालयाचे शुद्धीकरण करून घेतले. त्यानंतर पाद्रीला आणून पवित्र जलाभिषेक केला. कॉंग्रेस कार्यालयात होमहवन करण्याचा हा पहिलाच प्रसंग असावा. गोवा मुक्तीनंतरच्या गेल्या ५२ वर्षांत भाऊ काकोडकरांपासून जॉन फर्नांडिस यांच्यापर्यंत अनेक अध्यक्ष होऊन गेले, पण कधी कोणी हवन केल्याचे ऐकिवात नाही. गेल्या अडीच वर्षात कॉंग्रेसला जी साडेसाती लागली आहे त्यापासून सुटका करून घेण्यासाठी हवन करण्याची सूचना लुईझिनचे विश्‍वासू मोती देसाई यांनी केली आणि क्षणाचाही विलंब न करता लुईझिननी ती स्वीकारली. महाराष्ट्रात कॉंग्रेसचे जरी पानिपत झालेले असले तरी गोव्यात यापुढे कॉंग्रेसला चांगले दिवस येतील असे लुईझिनना वाटत आहे.
लुईझिन यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला बर्‍यापैकी गर्दी जमली होती. माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, रवी नाईक, फ्रान्सिस सार्दिन यांच्या उपस्थितीने व्यासपीठाला शोभा आणली. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि माविन गुदिन्हो सोहळ्याला फिरकले नाहीत. माविन या सोहळ्याला आले असते तर ते एक मोठे आश्‍चर्यच ठरले असते. ते मनाने कधीच भाजपवासी झाले आहेत. केवळ आमदारकी राखण्यासाठी ते अजून कॉंग्रेसमध्ये आहेत. दाबोळीत पोटनिवडणूक झाली तर भाजपाचे तिकीट देण्याची हमी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली तर आमदारकीचा राजीनामा देऊन परत निवडणुकीला सामोरे जाण्याची त्यांची तयारी आहे. भाजपाकडून अजून स्पष्ट आश्‍वासन मिळत नसल्याने माविन सध्या कुंपणावर बसून आहेत. त्यामुळे ते कॉंग्रेस अध्यक्षांच्या सोहळ्याला कसे जाणार?
दिगंबर कामत यांना कोणत्याही वादात पडणे आवडत नाही. फालेरो यांच्या सोहळ्याला ते नक्कीच आले असते. पण वैयक्तिक अडचणीमुळे ते पोचले नाहीत असे समजते. कॉंग्रेस पक्षाची आपल्याला गरज नाही असे जाहीरपणे सांगणारे बाबुश मोन्सेरात आणि जेनिफर मोन्सेरात, पांडुरंग मडकईकर आदी मोठ्या उमेदीने उपस्थित होते आणि या सोहळ्यात मिरवण्यात धन्यता मानत होते. गेली अडीच वर्षे पक्षकार्यापासून अलिप्त राहिलेले ज्योकिम आलेमांवही उपस्थित होते. जॉन फर्नांडिस यांनी अध्यक्षपदावरून काढून टाकलेले दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी तर लुईझिन यांचे अभिनंदन करणार्‍या जाहिराती दिल्या होत्या.
लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध उघडपणे बंड करणार्‍या फ्रान्सिस सार्दिन यांना अपेक्षेपेक्षा जास्त महत्त्व दिल्याने कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी मंडपातून काढता पाय घेतला. हा एक प्रकार सोडला तर बाकी सगळे आजी-माजी कॉंग्रेस पुढारी लुईझिन यांच्यावर खूश आहेत. जॉन यांना काढण्यात आल्याने राणे पितापुत्र सर्वात जास्त खूश आहेत. भालचंद्र नाईक यांना पुढे करून जॉन यांनी राणे पितापुत्रावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. गोवा पोलिसांनी या आरोपांची स्वेच्छा दखल घेऊन चौकशी चालू केल्याने दोन्ही खाशांना अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घ्यावी लागली. कोणी शेट्ये, गोवेकर किंवा आयरीश यांनी तक्रार केली असती तर राणे पितापुत्रानी मनावर घेतले नसते. मात्र कॉंग्रेस भवनातूनच गंभीर स्वरूपाचे आरोप कॉंग्रेस अध्यक्षांच्या हजेरीत करण्यात आल्याने ज्येष्ठ राणे भरपूर चिडले होते. जॉन अध्यक्ष असताना कॉंग्रेस कार्यालयात पाऊल न ठेवण्याचा पण त्यांनी केला होता. त्यामुळे लुईझिनच्या सोहळ्यात ते मोठ्या उमेदीने वावरत होते.
अध्यक्षपदाचा ताबा घेताच नूतन अध्यक्ष लुईझिन फालेरो आणि विरोध पक्षनेते दिल्लीला गेले असून नवी प्रदेश कार्यकारिणी नियुक्त करण्याच्या प्रश्‍नावर ते श्रेष्ठींशी सल्लामसलत करणार आहेत. कॉंग्रेस पक्षात नवे नेतृत्व उदयाला आणण्याचा प्रयत्न जॉन यांनी केला होता. मात्र लुईझिन जुनीच दारू नव्या बाटलीत घालण्याची शक्यता आहे. ते आपल्या विश्‍वासू माणसांनाच प्रदेश कॉंग्रेस समितीवर महत्त्वाची पदे प्रदान करतील हे उघड आहे. एम. के. शेख, मोती देसाई आदी ज्येष्ठ कॉंग्रेसजनांना महत्त्वाची पदे मिळणे साहजिक आहे. मगो पक्षातून कॉंग्रेसमध्ये आलेले रमाकांत खलप, धर्मा चोडणकर आदींना कॉंग्रेस पक्षाने कधी आपले मानलेच नाही. रमाकांत खलप यांना कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी जॉन यांनी महाराष्ट्रात पाठविले असते तर कॉंग्रेसच्या तीनचार जागा नक्कीच वाढल्या असत्या. आता लुईझिन फालेरो यांच्या नव्या प्रदेश कॉंग्रेस समितीत या लोकांना स्थान मिळेल असे वाटत नाही.
लुईझिन फालेरो यांना अध्यक्षपद मिळाल्याने सासष्टी तालुक्यातील कॉंग्रेसजनांत नवचैतन्य पसरले आहे. फालेरो यापूर्वी गोव्याचे मुख्यमंत्री होते आणि गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्षही होते. मात्र संपूर्ण गोव्याने त्यांना आपले नेते म्हणून कधी स्वीकारलेच नाही. गेली सात वर्षे तर ते गोव्यातील राजकारणात मुळीच सक्रिय नव्हते. नावेलीतून आपला पराभव करणारे चर्चिल आलेमांव यांना कॉंग्रेसने फेरप्रवेश देऊन मंत्रिपद दिल्याने चिडलेले फालेरो गेल्या साडेसात वर्षांत कॉंग्रेस व्यासपीठावर कधीच दिसले नाहीत. ईशान्य भारतातील सात छोट्या राज्यांचा कारभार त्यांच्यावर सोपविण्यात आला होता. कॉंग्रेसश्रेष्ठींनी सोपविलेली ही कामगिरी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. त्यामुळे त्यांचे दिल्लीतील वजन वाढले आणि गोव्यातील वजन कमी होत गेले. गेल्या सात वर्षांत गोव्यातील कॉंग्रेसजनांशी त्यांचा काडीचाही संबंध नाही. त्यामुळे नव्या तरुणांना वाव देण्याबाबत त्यांचा गोंधळ होण्याची शक्यता आहे. जुन्याजाणत्या नेत्यांना विविध पदे प्रदान करताना नव्या उमेदीच्या तरुण कार्यकर्त्यांनाही प्रदेश कॉंग्रेस समितीत सामावून घ्यावे लागेल, अन्यथा येरे माझ्या मागल्या होऊन जाईल.
जॉन फर्नांडिस यांनी गोव्यातील सर्व गटकॉंग्रेस समित्या बरखास्त केल्या होत्या. आपल्या विश्‍वासू लोकांकडून होतकरू तरुण कार्यकर्त्यांची नावे मागवून नव्या अध्यक्षांची यादी श्रेष्ठींकडे पाठविली होती. जॉन यांची ज्या दिवशी उचलबांगडी झाली त्याच दिवशी गटकॉंग्रेस अध्यक्षांच्या यादीला श्रेष्ठींनी मान्यता दिली होती; मात्र ही यादी जाहीर होण्यापूर्वीच अध्यक्ष बदलल्याने ती यादी शीतपेटीतच राहिली. नव्या अध्यक्षांनी जुन्याच समित्या कायम राहतील असे जाहीर केल्याने नव्या समित्या नियुक्त करण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. गटपातळीवरील समित्यांनी गेल्या अडीच वर्षांत काहीच हालचाल केलेली नाही. फोंडा गट कॉंग्रेस समिती तेवढी नेहरू जयंती आणि पुण्यतिथी कार्यक्रम आयोजित करीत असते. इतर ३९ मतदारसंघांत एखादा कार्यक्रम झाल्याचे ऐकिवात नाही. नव्या अध्यक्षांना पक्षाचे राज्यपातळीवरील एखादे अधिवेशन घेऊन कार्यकर्त्यांना जागृत करावे लागेल.
लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही कॉंग्रेस पक्षाने मान वर काढलेली नाही. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अनेक कल्याणकारी योजना आक्रमकपणे चालू करून समाजाच्या सर्व घटकांना आपल्या पक्षाशी जोडून घेतले आहे. दयानंद सामाजिक सुरक्षा आणि गृह आधार या दोन योजनांचा सुमारे तीन लाख लोकांना प्रत्यक्ष लाभ मिळत आहे. त्यामुळे हे सर्व लाभधारक आज भाजपाशी बांधले गेलेले आहेत. पक्षाचे संघटक सचिव सतीश धोंड पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी झटत आहेत. त्यामुळे सासष्टी वगळता इतर तालुक्यांतील ग्रामीण भागात कॉंग्रेसला सदस्य मिळणेही कठीण होणार असे दिसते. भाजपाच्या आक्रमक भूमिकेमुळे कॉंग्रेसच्या सदस्य नोंदणी मोहिमेला कितपत प्रतिसाद मिळेल याबद्दल शंकाच आहे.
महाराष्ट्रात कॉंग्रेस-राष्ट्रवादीची युती तुटल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महत्त्व आता दिवसेंदिवस कमी होत जाणार हे उघड आहे. गोव्यात तर यापुढे राष्ट्रवादीला भवितव्यच नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे गोव्यातील सर्व नेते आणि त्यांचे कार्यकर्ते आता कॉंग्रेसच्या वाटेवर आहेत. नीळकंठ हळर्णकर, जुझे फिलिप डिसौझा, अविनाश भोसले, सुरेंद्र सिरसाट इत्यादींनी कॉंग्रेस पक्षात यावे म्हणून फालेरो यांनी याआधीच प्रयत्न चालू केले आहेत. राष्ट्रवादीला आता गोव्यात भवितव्य नाही हे या नेत्यांनाही कळले आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते कॉंग्रेसमध्ये गेले तर वास्को व थिवी या दोन मतदारसंघांत तरी कॉंग्रेस भक्कम होऊ शकेल. माविन गुदिन्हो कॉंग्रेस सोडण्याच्या मार्गावर असल्याने जुझे फिलिप डिसौझा यांचा मार्ग मोकळा आहे. थिवीत तर कॉंग्रेसकडे आज कार्यकर्तेच नाहीत. त्यामुळे नीळकंठ हळर्णकर कॉंग्रेसमध्ये आल्यास त्यांचे भव्य स्वागत होईल. फालेरो यांच्यापुढे अनेक अडचणी असल्या तरी कॉंग्रेसची पुनर्बांधणी करण्यात त्यांना बर्‍याच प्रमाणात यश मिळेल असे वाटते; मात्र सत्तेजवळ पोचतील असे वाटत नाही.