पक्षबदलूंना मांद्रेत थारा नाही

0
114

हरमल (न. वा.)
स्वतःच्या स्वार्थासाठी कॉंग्रेस पक्ष व मांद्रे मतदारसंघातील १६ हजार मतदारांचा विश्वासघात करणार्‍या पक्षबदलूंना पुन्हा मांद्रेत थारा नसेल. दयानंद सोपटे यांनी आपला गुणधर्म जनतेला दाखवून दिला आहे. येणार्‍या पोटनिवडणुकीत येथील स्वाभिमानी मतदार त्यांना त्यांची योग्य जागा दाखवून दिल्यशिवाय राहणार नाही, असे संतापजनक उद्गार मांद्रे मतदारसंघाचे माजी गट कॉंग्रेस अध्यक्ष नारायण रेडकर यांनी हरमल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत काढले.
कॉंग्रेस पक्षाचे हरमल ग्राम प्रमुख अनिल बर्डे यांच्या हरमल-बामणभाटी येथील निवास्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला नारायण रेडकर यांच्यासमवेत अनिल बर्डे, मांद्रे गट कॉंग्रेसचे उपाध्यक्ष आनंद शिरगांवकर, सदस्य जॉन डिसोझा व अन्य यावेळी उपस्थित होते.
स्वतःच्या स्वार्थासाठीं मनाने दुसर्‍या पक्षांत व शरीराने कॉंग्रेस पक्षांत असलेल्या अशा व्यक्ती पक्षात राहिल्यास ते पक्षाला मारक आहे. मुळांत या व्यक्तीबद्दल अनेकांनी पूर्वीच संशय व्यक्त केला होता. तो संशय आज खरा ठरला. मांद्रे मतदारसंघातील प्रत्येक मतदार, हितचिंतक, पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता हेच आमच्यासाठी सरकार आहे. अशा प्रसंगाने कार्यकर्ते व मतदार डगमगणारे नाहीत. यापुढे सोपटे यांना पक्षाची दारे कायमची बंद राहतील असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
सोपटेंनी पुढील पोटनिवडणुकीत निवडून येण्याचे स्वप्न न बघता केवळ पाच-सहा महिनेच भाजपच्या सत्तेचा उपभोग घ्यावा. अशी टीका व्यक्त करत अनिल बर्डे यांनी आपली नाराजी व्यक्त केली. आनंद शिरगांवकर यांनी, सोपटे यांनी उचललेले पाऊल चुकीचे असून यावेळी त्यांनी अन्य कार्यकर्त्याचा मुळी विचारच केला नाही. त्यांच्या चुकीला माफी नाही अशी नाराजी व्यक्त केली.