पंतप्रधान मोदी, अमित शहांकडून सीएएप्रश्‍नी जनतेची दिशाभूल ः सोनिया

0
102

कॉंग्रेस पक्षाने काल सीएएविरोधात येथे आयोजिलेल्या विविध विरोधी पक्षांच्या बैठकीत २० विरोधी पक्षांनी सहभाग घेऊन या कायद्याला प्रखर विरोध दर्शविला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीएए कायद्यासंदर्भात देशातील जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप यावेळी कॉंग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांनी केला. लोकांना सुरक्षा पुरविणे व सुशासन या अनुषंगाने मोदी सरकार सपशेल उघडे पडल्याचा दावा त्यांनी केला.

सीएए, एनआरसीवरून देशभरात कधी नव्हे एवढे प्रक्षोभाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा कायदा आणून मोदी सरकारने धार्मिक तेढ व विद्वेष देशभरात पसरविल्याचा आरोपही सोनिया गांधी यांनी केला. जमिया मिलिया, बनारस हिंदू विश्‍वविद्यालय, अलिगड मुस्लिम विश्‍वविद्यालय यांच्या पाठोपाठ जवाहरलाल नेहरू विद्यापीठात भाजपच्या आशीर्वादाने जे भयानक कांड घडले ते संपूर्ण देशाने पाहिले आहे अशी टीका त्यांनी केली. या पार्श्‍वभूमीवर सर्व विरोधी पक्षांनी एकजुटीने केंद्र सरकारचे वाईट मनसुबे उधळून लावावे असे आवाहन त्यांनी केले.

या बैठकीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, डाव्या आघाडीतील सीताराम येच्युरी, डी. राजा, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, शरद यादव, उपेंद्र कुशवाहा, नॅशनल कॉन्फरन्सचे हुस्नैन मुसदी, राहुल गांधी, गुलाम नबी आझाद, अहमद पटेल, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आदी उपस्थित होते.
मात्र, तृणमूल कॉंग्रेस, बहुजन समाज पक्ष, आम आदमी पार्टी यांच्या नेत्यांनी विविध कारणांवरून या बैठकीला उपस्थित राहण्याचे टाळले.

दरम्यान, शिवसेना नेते तथा राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी या बैठकीविषयी योग्य समन्वयाच्या अभावी शिवसेनेतर्फे कोणीही उपस्थित राहू शकले नाही असा खुलासा केला आहे. सीएए कायद्यात काही उणिवा असल्याने त्यावर चर्चा व्हायला हवी असे ते म्हणाले.