पंतप्रधान मोदीच गोव्यातील खाणींचा प्रश्‍न सोडवतील ः विश्‍वजित राणे

0
103

गोव्याचा खाण प्रश्‍न केवळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हेच सोडवू शकतात व ते तो सोडवतील असा विश्‍वास आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल त्यासंबंधी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना व्यक्त केला. मोदी यांना गोव्याच्या खाण प्रश्‍नाची चांगली माहिती आहे. ते राज्यातील बंद पडलेल्या खाणींचा प्रश्‍न सोडवतील. गोव्यातील कॉंग्रेस नेत्यांनी जनगणमन करीत फिरण्याऐवजी नवी दिल्लीत जाऊन कॉंग्रेस अध्यक्षाची भेट घ्यावी व गोव्यातील खाण प्रश्‍नी केंद्रातील भाजप सरकारने संसदेत अध्यादेश आणला तर त्या अध्यादेशाला कॉंग्रेसने संसदेत पाठिंबा द्यावा, अशी विनंती आपल्या अध्यक्षांना करावी, असे राणे म्हणाले.
केवळ खाण अवलंबिताना भडकावण्याचे काम करणार्‍या कॉंग्रेस नेत्यांनी खाण सुरू करण्यासाठी काय करता येईल त्यासंबंधीची सूचनाही करावी, असे राणे म्हणाले.

पुलांची चाललेली बांधकामे
कॉंग्रेस नेत्यांनी पहावीत
कॉंग्रेस नेत्यांनी जनगण… करीत फिरण्यापेक्षा आता जुवारी व मांडवी पुलाचे बांधकाम कसे केले जात आहे ते पहावे अशी टीका काल आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी पत्रकार परिषदेत केली.
नव्या जुवारी पुलाची गरज आहे हे माहीत असतानाही कॉंग्रेसने काहीही केले नाही. मात्र केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर गोव्यात जुवारी नदीवर व मांडवी नदीवर तिसर्‍या पुलाचेही काम सुरू झाल्याचे राणे म्हणाले. कॉंग्रेसने लोकांना नमन करण्याचे नाटक रचले आहे. केवळ नमन करून काहीही होत नाही असे ते म्हणाले. कॉंग्रेसने अलीकडेच जनगण मन… नमन तुका गोयकार या अभियानाला राज्यात प्रारंभ केला आहे.

मोदी सरकारकडून
गोव्याला भरघोस निधी
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने गोव्याच्या विकासासाठी गेल्या चार वर्षांच्या काळात भरघोस निधी दिलेला असून आरोग्य खात्याला विभागीय कर्करोग इस्पितळ सुरू करण्यासाठी दिलेल्या १०० कोटी रु. सह एकूण ३५० कोटी रु. एवढा निधी दिला असल्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी सांगितले.