‘पंढरीची वारी’ ः एक अद्भुत, अतर्क्य …

0
299
– अंजली आमोणकर 
... नामाच्या कल्लोळाने चराचरावर एक प्रकारचा हळवा ओलावा पसरलेला असतो. रस्त्यावरील माती अबीर – गुलाल बनून, वारकर्‍याच्या देहाला लपेटून घेते. दिंडीतील प्रत्येक पावलागणिक तुमचे पद-प्रतिष्ठा-परिवार सगळे काही मागे पडत असते…
आषाढ शुक्ल एकादशीलाच देवशयनी एकादशी म्हणतात. महाराष्ट्रातील गावागावांतून निघालेल्या वार्‍या या दिवशी पंढरपुरात पोहोचतात. आता तर कर्नाटक व गोव्यातील अनेक वारकर्‍यांची पथके उत्साहाने व आनंदाने या वारीत सहभागी होतात. वारी म्हणजे देवाच्या जयघोषात निघालेली पदयात्रा. पंढरीची वारी ही वर्षातून दोन वेळा निघते. आषाढात व कार्तिकात. आळंदी येथून संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पादुका व देहू येथून संत तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी पंढरपूरला रवाना होते. वारकरी संप्रदायात लहान-मोठा असा भेद नाही. केवळ ‘नामजप’- हेच त्या वारकर्‍यांचे वर्तमान व भविष्य असते. विष्णूचा अवतार असलेल्या पांडुरंग अर्थात विठ्ठलाचे वारकरी असलेले भक्त गळ्यांत तुळशीमाळ घालून, गोपीचंदनाचा टिळा लावून, अखंड नामस्मरण करत वारीत एकरूप होताना दिसतात. ‘शिस्त’ हा वारीचा कौतुकास्पद भाग आहे. शेकड्यांच्या संख्येने दिंडीत सहभागी होऊन लोक मग आपली दिंडी रजिस्टर करून, नोंदणी क्रमांक घेतात. रथाच्या मागे क्रमांकानुसारच जातात. तीन-तीन वारकर्‍यांच्या ओळी केलेली लाखो वारकरी सामील असलेली रस्त्याच्या डाव्याच बाजूने शिस्तीत चाललेली व रामनामात दंग असलेली वारी पाहिली की बघणार्‍यालाही भक्तीचे व कौतुकाचे भरते येते.
सातशे वर्षांहून अधिक काळ अखंड निघणारी पंढरीची वारी हा महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातला चमत्कार आहे. या दिंडीच्या वाटेवर ना चांगली राहण्याची व्यवस्था, ना झोपण्याची सोय. पण तरीही लक्षावधी जनांचा प्रवाह एका विठ्ठलनामाने प्रेरित होऊन चालत असतो. वरून पाऊस पडत असतो व चिंब भिजलेला हा जन-समुदाय, टाळ-मृदंगाच्या ठेक्यात पावले पुढे पुढे टाकण्यात मग्न असतो. कोणत्याही लौकिक सुविधांकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नसतो. इतर जनसमुदायाला सतत फक्त एकच प्रश्‍न भेडसावत असतो की आपला कामधंदा, उद्योग-व्यवसाय, पोटपाणी, घरदार सोडून हे इतके लोक वारीत का सामील होत असावेत? पावसाच्या शिडकाव्याने आधीच सगळा परिसर अभिमंत्रित झालेला असतो. त्यांत चंदेरी वर्ख चढावा तद्वत, नामाच्या कल्लोळाने चराचरावर एक प्रकारचा हळवा ओलावा पसरलेला असतो. रस्त्यावरील माती अबीर – गुलाल बनून, वारकर्‍याच्या देहाला लपेटून घेते. दिंडीतील प्रत्येक पावलागणिक तुमचे पद-प्रतिष्ठा-परिवार सगळे काही मागे पडत असते. वारकर्‍याचा धर्म अगदी वेगळा आहे. तेथे कर्मकांडाला स्थान नाही. केवळ कपाळी अबीर-चंदन व गळ्यात तुळशीमाळ घातल्याने वैष्णवांच्या मेळ्यात सामील होता येत नाही. तेथे कापरासारख्या निर्मळ मनाची गरज असते. पंढरीची वारी अद्वितीय, अविस्मरणीय, अवर्णनीय, अतुल्य व अद्भुत असते; कारण कोणतेही निमंत्रण, कोणताही सांगावा वारकर्‍यांना असत नाही. असते फक्त देहमनाची भक्तिपूर्ण ऊर्मी. वारीची पहिली जागतिक नोंद बी.बी.सी.ने घेतली. त्यानंतर ‘पंढरीची वारी’ हा जागतिक आकर्षणाचा विषय ठरला. आज अनेक परदेशी या वारीत सामील होताना दिसतात. एकानेव आईना कोवा ही जपानी महिला- वारकरी पस्तीस वर्षे वारी करते आहे. वारीचे व्यवस्थापन हा खरोखर अभ्यास व संशोधनाचा विषय आहे.
या वारकर्‍यांची भूक भागवण्याकरता अनेक लोक, अनेक संस्था पुढे येतात. जागोजागी चहा-फराळाच्या टपर्‍या – दुकाने – गाडे – ठेले सबंध दिवस विनामूल्य चालू असतात. अनेक डॉक्टर, विनामूल्य आरोग्य – शिबिरं चालवतात. परंतु पाणी व स्वच्छता या दोन गोष्टींकडे सरकार हव्या तेव्हा सुविधा व मदत देत नाहीये व लक्ष पुरवीत नाहीये ही खेदाची बाब आहे. लाखो लोकांकरता केवळ एक सार्वजनिक नळ व एकच मोबाईल स्वच्छतागृह !!! मग मागे टाकून दिलेल्या घाणीचा उपद्रव गावकर्‍यांना अतोनात होतो. हे सुधार ताबडतोब अमलात यायला हवेत! म्हणजे वारकर्‍यांप्रमाणेच सर्व जनलोक म्हणतील– ‘‘या पंढरीचे सुख पाहता डोळा,
उभा तो जिव्हाळा, योगीयांचा….’’