पंजाबची राजस्थानवर १२ धावांनी मात

0
81

>> रविचंद्रन अश्‍विनची अष्टपैलू चमक

किंग्स इलेव्हन पंजाबने काल मंगळवारी इंडियन प्रीमियर लीगच्या १२व्या मोसमातील ३२व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा १२ धावांनी पराभव केला. किंग्स पंजाबने १८२ धावांचा यशस्वी बचाव करताना राजस्थानचा डाव ७ बाद १६८ धावांवर रोखला.

धावांचा पाठलाग करताना राहुल त्रिपाठीने जोस बटलरसह राजस्थानच्या डावाची सुरुवात केली. या जोडीने पहिल्या गड्यासाठी ३८ धावा जोडल्या. अर्शदीपने धोकादायक बटलरला बाद करत ही जोडी फोडली. संजू सॅमसनने यानंतर त्रिपाठीसह धावफलक सतत हलता ठेवता दुसर्‍या गड्यासाठी ५९ धावांची भागीदारी केली. रविचंद्रन अश्‍विनला स्वीप मारण्याच्या प्रयत्नात सॅमसनचा त्रिफळा उडाला. यावेळी राजस्थानचा संघ ११.४ षटकांत २ बाद ९७ अशा मजबूत स्थितीत होता व विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करत होता. अर्धशतकाकडे वाटचाल करत असताना त्रिपाठीने अनेक चेंडू निर्धाव खेळले. दुसर्‍या टोकाने अजिंक्य रहाणेला मुक्तपणे फलंदाजी करणे न जमल्याने राजस्थानवरील दबाव वाढत गेला. यासह सामन्यावरील त्यांची पकड निसटत गेली. यातच ऍश्टन टर्नक (०), जोफ्रा आर्चर (१) यांनी केवळ हजेरी लावण्याचे काम केले. स्टुअर्ट बिन्नीने ११ चेंडूंत नाबाद ३३ धावा करत पराभवाचे अंतर कमी केले. पंजाबचा कर्णधार अश्‍विनने फलंदाजी करताना कुलकर्णीला शेवटच्या दोन चेंडूंवर ठोकलेले षटकार पंजाबच्या विजयाचे अंतर ठरवून गेले.

तत्पूर्वी, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. ख्रिस गेल व लोकेश राहुल या जोडीने पंजाबच्या डावाची सुरुवात केली. ख्रिस गेलने चांगली सुरुवात करताना मोठी खेळी करण्याचे संकेत दिले होते. परंतु, बार्बेडोसच्या जोफ्रा आर्चरने जमैकाच्या ख्रिस गेलला यष्टिरक्षक संजू सॅमसनकरवी झेलबाद केले. आर्चरचा चेंडू ‘थर्ड मॅन’च्या दिशेने खेळण्याचा अयशस्वी प्रयत्न त्याला भोवला. गेलने २२ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकार खेचत ३० धावा केल्या. दुसर्‍या टोकाने राहुलने मोजून मापून आक्रमकता दाखवली. राहुलने ३ चौकार आणि २ षटकार खेचत ४७ चेंडूत ५२ धावा केल्या. यंदाच्या मोसमातील त्याचे हे चौथे व आयपीएलमधील १४वे अर्धशतक होते. त्याच्या या अर्धशतकी खेळीत निर्धाव चेंडूंची संख्या अधिक असल्याने प्रतिस्पर्धी संघावर त्याची खेळी दबाव टाकू शकली नाही. टीम इंडियाचा कसोटी सलामीवीर मयंक अग्रवाल मोठा फटका खेळताना झेलबाद झाला आणि पंजाबला दुसरा धक्का बसला. मयंकने १२ चेंडूत १ चौकार आणि २ षटकार यांच्या साहाय्याने २६ धावा केल्या. न्यूझीलंडचा लेगस्पिनर ईश सोधीने एका उंची दिलेल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो सीमारेषा पार करू शकला नाही. यष्टिरक्षक फलंदाज निकोलस पूरन ६ चेंडूत ५ धावा करून माघारी परतला. मनदीप फारसा प्रभाव पाडू शकला नाही. तो शून्यावर बाद झाला. डेव्हिड मिलरने पंजाबच्या धावसंख्येत भर घालत मोलाचा वाटा उचलला. त्याने केवळ २७ चेंडूंत ४० धावा करताना मरगळलेल्या धावगतीला उभारी दिली. धवल कुलकर्णीने टाकलेल्या डावातील शेवटच्या षटकातील अखेरच्या दोन चेंडूंवर अश्‍विनने षटकार लगावून पंजाबला १८२ अशी आव्हानात्मक धावसंख्या रचून दिली. अश्विनने केवळ ४ चेंडूत नाबाद १७ धावा केल्या.

किंग्स इलेव्हन पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून पराभूत झालेल्या आपल्या संघात तीन बदल करताना सॅम करत, अँडी टाय व सर्फराज खान यांना बाहेर बसवताना मुजीब रहमान, अर्शदीप सिंग व डेव्हिड मिलरचा संघात समावेश केला. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर विजय मिळविलेल्या संघातून स्टीव स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, कृष्णप्पा गौतम यांना बाहेर बसवत स्टुअर्ट बिन्नी, ऍश्टन टर्नर व ईश सोधी यांना संघात सामावून घेतले.

धावफलक
किंग्स इलेव्हन पंजाब ः लोकेश राहुल झे. आर्चर गो. उनाडकट ५२, ख्रिस गेल झे. सॅमसन गो. आर्चर ३०, मयंक अगरवाल झे. आर्चर गो. सोधी २६, डेव्हिड मिलर झे. बटलर गो. कुलकर्णी ४०, निकोलस पूरन झे. रहाणे गो. आर्चर ५, मनदीप सिंग त्रि. गो. आर्चर ०, रविचंद्रन अश्‍विन नाबाद १७, मुजीब उर रहमान नाबाद ०, अवांतर १२, एकूण २० षटकांत ६ बाद १८२
गोलंदाजी ः धवल कुलकर्णी ४-०-३७-१, जयदेव उनाडकट ४-०-४८-१, जोफ्रा आर्चर ४-०-१५-३, ईश सोधी ४-०-४१-१, श्रेयस गोपाळ ४-०-३१-०
राजस्थान रॉयल्स ः राहुल त्रिपाठी झे. अगरवाल गो. रविचंद्रन ५०, जोस बटलर झे. पूरन गो. अर्शदीप २३, संजू सॅमसन त्रि. गो. रविचंद्रन २७, अजिंक्य रहाणे झे. शमी गो. अर्शदीप २६, ऍश्टन टर्नर झे. मिलर गो. मुरुगन ०, जोफ्रा आर्चर झे. राहुल गो. शमी १, स्टुअर्ट बिन्नी नाबाद ३३, श्रेयस गोपाळ झे. अगरवाल गो. शमी ०, जयदेव उनाडकट नाबाद ०, अवांतर १०, एकूण २० षटकांत ७ बाद १७०
गोलंदाजी ः अर्शदीप सिंग ४-०-४३-२, मुजीब रहमान ३-०-२४-०, मुरुगन अश्‍विन ४-०-२४-१, रविचंद्रन अश्‍विन ४-०-२४-२, मोहम्मद शमी ४-०-४६-२, मनदीप सिंग १-०-८-०