पंचायतींचे संमिश्र निकाल

0
112

>> सरपंचांची निवड १९ रोजी
>> भाजपच्या बाजूने कौल ः मुख्यमंत्री

राज्यातील १७५ ग्रामपंचायतींचे निकाल काल जाहीर झाले असून उत्तर गोव्यात सत्ताधारी भाजप व सरकारच्या घटक पक्षांनी पाठिंबा दिलेले बहुसंख्य उमेदवार निवडून आले आहेत. तर दक्षिण गोव्यात निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये कॉंग्रेस समर्थक उमेदवारांची संख्या अधिक असल्याने निवडणुकीत कोणत्याही पक्षाला वर्चस्व सिद्ध करण्यास अपयश आले आहे. अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले आहेत. कळंगुट पंचायतीचे सर्वेसर्वा तथा उपसरपंच जोजेफ सिक्वेरा यांचा पराभव झाला तर नेवरा पंचायतीचे सरपंच विनोद कामत सलग आठव्यांदा निवडून आले.

तिसवाडीत कॉंग्रेसचे सांतआंद्रे मतदारसंघाचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांचे पॅनल आजोशी – मंडुर, आगशी येथे निवडून आले. मात्र, पाळी – शिरदोण येथे त्यांच्या पूर्ण पॅनलचा पराभव झाला. करमळी पंचायतीवर भाजपचे मंत्री व नेते पांडुरंग मडकईकर यांच्या पॅनलने झेंडा फडकवला.
बार्देशात अनेक सरपंच पराभूत
बार्देश तालुक्यातील अनेक पंचायतींच्या सरपंचांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवत नव्या चेहर्‍यांना संधी दिली. ओशेल – शिवोली पंचायतीचे सरपंच रामा कुबल, साळगावचे एकनाथ आरोस्कर, आसगावचे व्हिक्टर डिसोझा, कळंगुटच्या सरपंच रेश्मा कळंगुटकर, वेर्ला-काणकाचे सरपंच मोहन दाभाळे, हडफडे – नागवा सरपंच महिमा कोरगांवकर या विद्यमान सरपंचांचा पराभव झाला. बार्देशातील निकाल ऐकण्यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर हजारो समर्थकांची गर्दी उसळली होती.
डिचोलीत भाजपचे वर्चस्व
डिचोली तालुक्यातील सोळा पंचायतींची मतमोजणी काल पूर्ण झाली असून बहुतेक पंचायतींवर भाजपचा झेंडा फडकला आहे. या तालुक्यातील काही विद्यमान पंचायत सदस्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर काही चौथ्या, पाचव्यावेळी विजयी झाले. साखळीचे आमदार सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी मतदारसंघातील सहा पंचायतींवर भाजपचा झेंडा फडकणार असल्याचा दावा केला आहे. तर मयेचे आमदार प्रवीण झांट्ये यांनी मतदारसंघातील सर्व पंचायतींवर भाजपची सत्ता येणार असल्याचा दावा केला आहे. आमदार राजेश पाटणेकर यांनी पाच पैकी चार पंचायतींवर भाजपाचे वर्चस्व असल्याचे सांगितले.
सत्तरीत भाजप
कॉंग्रेसला संमिश्र यश
सत्तरीत कॉंग्रेसला संमिश्र यश मिळाले आहे. वाळपई मतदारसंघात भाजपाने पंचायती राखल्या तर पर्ये मतदारसंघात मात्र भाजपच्या हातातून पंचायती निसटल्या आहेत. पर्येचे भाजप मंडळाध्यक्ष दीपाजी राणे व वाळपईचे सखाराम गावकर यांचा दारुण पराभव झाला. वाळपईत खोतोडा, गुळेली, सावर्डे व नगरगाव या चार पंचायती भाजप समर्थकांकडे गेल्या. पर्येत मोर्ले पंचायत सोडल्यास भिरोंडा, पिसुर्ले, म्हाऊस, ठाणे-डोंगुर्ली, पर्ये, केरी या पंचायती कॉंग्रेसने काबिज केल्या आहेत. सत्तरीत गुळेलीचे सरपंच विशांत नाबर, होंडा सरपंच उर्मिला माईणकर, ठाणे डोंगुर्लीच्या अंकिता गावस, पर्येचे भिसो गावकर यांचा पराभव झाला.
काणकोणात कॉंग्रेसची सत्ता
काणकोण मतदारसंघातील सर्व सहा पंचायतींवर आपल्या समर्थकांनी विजय संपादन केला असल्याचा दावा काणकोणचे आमदार इजिदोर फर्नांडिस यांनी केला आहे. त्यांनी समर्थन दिलेले खोतीगाव पंचायतीचे सर्व सात सदस्य, गावडोंगरी पंचायतीचे ९ पैकी ६, पैंगीणमध्ये ५ पैकी चार, लोलये पंचायतीचे ९ पैकी ७, श्रीस्थळ पंचायतीचे ७ पैकी ४ तर आगोंदा पंचायतीमध्ये ७ पैकी ५ सदस्य आपल्या गटाचे निवडून आल्याचा दावा काणकोणच्या आमदारांनी केला
आहे.
फोंडा, धारबांदोड्यात नवीन चेहरे
फोंडा व धारबांदोडा तालुक्यातील पंचायतींत मतदारांनी नवीन चेहर्‍यांनी संधी दिली आहे. दुर्भाट पंचायतीत सर्व ७ उमेदवार पहिल्यांदाच निवडून आले. कवळे पंचायतीत ९ सदस्यांपैकी ६ महिला उमेदवार जिंकल्या आहेत. धारबांदोडा पंचायतीत फॅमिली राज आले आहे. या पंचायतीत बालाजी गावस सलग चौथ्यावेळी, त्याची बहीण स्वाती गावस तिळवे तिसर्‍यांदा व भाऊ दत्तराज गावस पहिल्यांदा विजयी ठरले.

पिता जिंकले, पुत्र हरले!
सावर्डे पंचायतीतील प्रभाग २ मध्ये ७० वर्षीय आनंद बाबुराव नाईक हे रिंगणात होते. तर त्यांचे पुत्र बाबुराव नाईक हे दुसर्‍या प्रभागातून रिंगणात उतरले होते. त्यांच्यापैकी वडील आनंद नाईक जिंकले तर पुत्र बाबुराव हरले.

सत्तरीत दोघे
एका मताने जिंकले
वाळपई मतदारसंघातील खोतोडा पंचायतीतील प्रभाग तीनमध्ये शारदा हरिजन यांनी निहारिका परवार यांच्यावर एका मताने विजय मिळविला तर पर्ये पंचायतीच्या प्रभाग पाचमध्ये सखा सावंत यांनी गुरुदास गावकर यांच्यावर एका मताने मात केली.

भाजप प्रमुख शक्ती असल्याचे सिद्ध : मुख्यमंत्री
पंचायत निवडणुकीत मतदारांनी भाजपच्याच बाजूने कौल दिला असून विधानसभा निवडणूक निकालाच्या तुलनेत पंचायत निवडणूक निकाल समाधानकारक आहे. या निकालानंतर राज्यात भाजप प्रमुख शक्ती असल्याचे सिद्ध झाल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विजयी ठरलेल्या काही उमेदवारांना भेटल्यानंतर सांगितले.
अनेक पंचायतींमध्ये भाजप समर्थक उमेदवारांनी सर्वच्या सर्व जागा जिंकल्या आहेत. यात महत्त्वाचे म्हणजे कॉंग्रेसचा सफाया झाला असल्याचे पर्रीकर म्हणाले. काही ठिकाणी भाजप समर्थक व सहकारी उमेदवारांनी बहुमत मिळविले आहे. प्राथमिक माहितीनुसार भाजपला मोठ्या संख्येने जागा मिळाल्या आहेत. पक्षाचे कार्यकर्ते तसेच समर्थन लाभलेले ९०-९५ टक्के उमेदवार विजयी ठरले असल्याचे पर्रीकर यांनी सांगितले.
पंचायतींना अनेक अधिकार असून जबाबदार्‍याही आहेत. राज्याच्या प्रगतीसाठी पंचायती बरेच योगदान देऊ शकतात. पंचायतींना स्वच्छ भारत अभियानात सहभागी करून घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

कळंगुट मतदारसंघावर आमदार लोबोंची पकड
कळंगुट मतदारसंघातील कांदोळी, पर्रा व कळंगुट या पंचायतींवर आमदार मायकल लोबो यांनी आपली पकड असल्याचे स्पष्ट केले आहे. या तिन्ही पंचायतींवर त्यांनी पुरस्कृत केलेल्या पॅनलना बहुमत मिळाले आहे. कांदोळी पंचायतीवर त्यांचे अकरापैकी १०, पर्रा पंचायतीत ७ पैकी ६ तर प्रतिष्ठेच्या कळंगुट पंचायतीत अकरापैकी ८ जागी लोबो यांच्या पॅनलचे उमेदवार विजयी ठरले आहेत.