पंकजा मुंडे भाजप सोडण्याच्या वाटेवर ?

0
119

अलीकडेच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे भाजप सोडणार असल्याच्या व शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे काल (सोमवारी) पंकजा मुंडेंनी आपल्या ट्विटर अकौंटवरून भाजपचे नाव तसेच आपल्या आजवरच्या राजकीय प्रवासाच्या तपशीलाची माहिती काढून टाकल्यामुळे या अनुषंगाने संकेत मिळाले आहेत. दरम्यान पंकजा मुंडे भाजप सोडणार असल्याच्या वृत्ताचे भाजपकडून खंडन करण्यात आले आहे. मात्र या संदर्भात चर्चांना उधाण आले आहे.

गेल्या ऑक्टोबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बीड मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना त्यांचे चुलत भाऊ धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. फडणवीस सरकारात पंकजा मुंडे मंत्री होत्या. पंकजा मुंडे यांनी रविवारी आपल्या फेसबुक पोस्टवर आपल्या समर्थकांना येत्या दि. १२ डिसेंबर रोजी गोपिनाथ गड येथे येण्याचे निमंत्रण दिले होते. आपले दिवंगत वडील गोपिनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिन कार्यक्रमासाठी हे निमंत्रण होते. गोपिनाथगड हे बीड येथील मुंडे यांचे स्मारक आहे.
हे निमंत्रण देताना पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे की सध्याच्या राज्यातील बदललेल्या राजकीय स्थितीमुळे पुढील वाटचालीचा विचार करून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्याला ८-१० दिवस विचार करण्यासाठी लागणार आहेत असे पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर म्हटले होते. पुढे काय करायचे? कोणत्या मार्गाने जायचे? आमची ताकद काय आहे? आमच्याकडून लोकांच्या काय अपेक्षा आहेत? या सर्वांचे चिंतन करून तुमच्यासमोर मी १२ डिसेंबर रोजी येणार आहे.

पंकजा मुंडे भाजप सोडणार नाही : पाटील
पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्विटर अकौंटवरून भाजप नाव काढून टाकल्यानंतर प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे भाजपचा त्याग करणार नसल्याचे म्हटले आहे. काही माध्यमांमध्ये पंकजा मुंडे भाजप सोडणार असल्याचे प्रसिध्द झालेले वृत्त निराधार असल्याचे पाटील यांनी सांगितले. पाटील म्हणाले, ‘भाजप नेते पंकजा मुंडे यांच्या संपर्कात आहेत. आपल्या पराभवानंतर त्या आत्मपरीक्षण करीत आहेत. याचा अर्थ त्या भाजप सोडणार असा नाही.’ भाजपचे अनेक नेते शिवसेनेत जाणार असल्याच्या शिवसेना नेते संजय राऊत यांच्या वक्तव्याचाही त्यांनी इन्कार केला.