न विसरता येणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व विष्णू सूर्या वाघ

0
383
  • अवधूत शिरोडकर
    (कार्मीभाट – मेरशी)

अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे श्री. विष्णू सूर्या वाघ गेली दोन वर्षे आजारी आहेत. त्यातून ते हळूहळू सावरत आहेत. वाघ पुन्हा पूर्णपणे बरे व्हावेत आणि साहित्य, संस्कृती, राजकारण, समाजकारण अशा सर्व क्षेत्रांमध्ये त्यांची तोफ धडधडावी अशीच गोमंतकाची इच्छा आहे. आज २४ जुलै हा वाघ यांचा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांच्या स्मृती जागविणारा लेख –

आपले सर्वांचे जिवाभावाचे सांत आंद्रे मतदारसंघाचे लाडके माजी आमदार, दीनदलितांच्या व्यथा मांडणारे ज्येष्ठ कवी, साहित्यासाठी झटणारे झुंजार पत्रकार, नाट्यकलाकार, खर्‍या अर्थाने साहित्याचे अन् गोव्याचे शिलेदार त्याचप्रमाणे मराठी, कोकणी या दोन्ही भाषांमध्ये सातत्याने लेखन करणारे प्रतिभावंत व सिद्धहस्त लेखक, संपूर्ण भारतामध्ये व गोमंतकामध्ये अनेक तोलामोलाचे पुरस्कार व मानपत्रे लाभलेले बहुआयामी अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे विष्णू सूर्या वाघ. अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी प्रभावी ठसा उमटवला आहे. त्याचप्रमाणे साहित्य, संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये प्रभावी कामगिरी करून त्यांनी नावलौकिक मिळवलेला आहे. जाज्वल्य निष्ठा असलेले मराठीचे समर्थक, धडाडीचे भारदस्त वक्ते व प्रवचनकार इत्यादी अनेक गुणांनी विष्णू सूर्या वाघ मंडित आहेत.

असे हे गोव्याचे भूषण असलेले अष्टपैलू व्यक्तिमत्त्व गेली दोन वर्षे अंथरुणावर खिळून आहे, ही गोष्ट त्यांच्यापेक्षाही गोव्यासाठी दुर्दैवी आहे. आज दि. २४ जुलै रोजी ५४ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कर्तबगारीच्या आठवणी मनात दाटून येतात. केवळ गोव्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात गोव्याचे नाव उज्ज्वल करणारे विष्णू हे गोव्याचे थोर सुपुत्र. नाट्यकला, साहित्य, पत्रकारिता, वक्तृत्व, कविता अशा विविध क्षेत्रांत मोलाची कामगिरी करून त्यांनी नावलौकिक मिळून दिला आहे. त्यांच्याएवढा अष्टपैलू माणूस गोव्यातच नव्हे, तर महाराष्ट्रातही शोधून सापडणार नाही. अशा या थोर माणसाला कधीच अहंकाराचा वारा शिवला नाही. व्हीआयपी इतकीच सामान्य माणसाशी मिळून मिसळून वागणारी विष्णूंसारखी माणसे आज सापडणार नाहीत.
विष्णू गेली २ वर्षे झाली, आजारपणाशी लढत असल्याने गेल्या २ वर्षांत गोव्याचे कला, साहित्य, राजकारण, समाजकारण अशा अनेक क्षेत्रांत प्रचंड नुकसान झाले आहे. विष्णूंचा व माझा तब्बल तीस वर्षांचा परिचय व मैत्री. या तीस वर्षांत मी त्यांना माझ्यासह कुणालाही दुखावताना किंवा कुणाशीही उर्मटपणे वागताना बघितले नाही. आमदार झाल्यानंतरही त्यांच्या स्वभावात जराही फरक पडला नाही. सगळ्यांच्या मदतीला व हाकेला सदैव धावणार्‍या विष्णू वाघ यांना नियतीने दोन वर्षे आडवे पाडणे हा कलियुगाचा महिमा म्हणावा लागेल. दुर्जन माणसे समाजात बिनधास्तपणे फिरतात व विष्णूसारखा सज्जन माणूस आजारी पडतो ही गोव्याची शोकांतिका.
सर्वप्रथम माझी व विष्णू सुर्या वाघ यांची पहिली भेट गोवा विद्यापीठात इंडियन हिस्ट्री कॉंग्रेस सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ५ ते ७ नोव्हेंबर १९८७ रोजी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात झाली. त्यांचे चैतन्यदायी कार्य चिरंतनपणे माझ्या आठवणीत आहे.

आज गोव्यात माजलेला हाहाकार व अनाचार याच्या विरोधात फक्त विष्णूच आवाज उठवू शकतात, पण आज त्यांचा आवाज मुका झाल्यामुळे गोवेकरांना कुणीच वाली उरलेला नाही. म्हणूनच गोव्याच्या हितासाठी व त्यांच्या कुटुंबियांच्या सौख्यासाठी विष्णू वाघ लवकरात लवकर बरे होण्याची गरज आहे. लक्षावधी गोवेकर विष्णू सूर्या वाघ पुन्हा बरे व्हावेत आणि त्यांची तोफ धडधडावी म्हणून प्रार्थना करीत आहेत. मी माझा खारीचा वाटा म्हणून मेरशीहून कालापूरला त्यांच्या घरी पायी चालत जाऊन श्री नवनाथ भक्तिसार चरित्राचे तब्बल ९ दिवस पारायण केले.

आज विष्णू सूर्या वाघ यांच्या वाढदिवसाला ते बरे झालेले असते, तर कला अकादमीमध्ये ‘काव्यहोत्र’ पुन्हा रंगले असते. देशातील शेकडो कवींना आपल्या कविता सादर करता आल्या असत्या आणि विष्णू वाघ यांनी प्रसन्न मुद्रेने या कवितांचा आस्वाद घेतला असता, पण नियतीच्या मनात ते नव्हते, त्यामुळे गेली दोन वर्षे गोव्यातील साहित्य क्षेत्र ओकेबोके झाले आहे.

आज विष्णू यांच्या वाढदिवसानिमित्त परमेश्‍वर चरणी एकच प्रार्थना आहे की, हा ढाण्या वाघ पूर्वीसारखा पूर्णपणे बरा व्हावा. स्वत:च्या पायावर पुन्हा मजबूतपणे उभा राहावा. आपल्या भाषणाने व कवितांनी त्याने गोवा आणि महाराष्ट्र पुन्हा मंत्रमुग्ध करावा. वाघ यांना उदंड व उज्ज्वल दीर्घायुष्य लाभू दे, त्याचप्रमाणे उत्तमोत्तम आरोग्य सुख समृद्धी लाभू दे अशी मी कामना करतो.
वाघ यांनी ज्या अनेक कविता लिहिल्या, त्यात एक कविता अशी होती –
या कठोर नियतीपुढती झुकलो नाही |
म्हणूनच बहुधा एका जागी टिकलो नाही ॥
आभाळाची छत्री करूनी चालत गेलो |
बंद भिंतीच्या शाळेमध्ये शिकलो नाही ॥
कुणी कुणाला सलाम केले, काय दिले घेतले |
हिशेब असला ठेवून आनंदाला मुकलो नाही ॥
जरी भासले जीवन सारे धकधकणारे मृगजळ |
वाळवंटीचे उन्हच झालो म्हणून चकलो नाही ॥
काजव्यांवरी होती भाळली भोवतालची झाडे |
तरी सावली होऊन चंद्रावरती थुंकलो नाही ॥
देठांमधुनी जपले माझे झाडाकडचे नाते |
आढ्यामधला आंबा होऊन अवेळी पिकलो नाही |
कळ्याही खुडल्या फुले तोडली उजाड केला बगीचा |
तरी कुणाच्या पायी काटा होऊन रुतलो नाही ॥
क्षितिजाने हे चोरून नेले सर्व किनारे |
अगस्ती होऊन सागर प्यालो म्हणूनच सुकलो नाही ॥
खरोखरच आज ‘या कठोर नियती पुढती मी झुकलो नाही…’ ही विष्णू वाघांची कविता सत्यात उतरू दे.

या जगण्यापासून दूर असा मी नाही रे पळणार |
मजला त्याने छळले तरीही त्याला मी छळणार ॥
फसवीत गेल्या दिशा आंधळ्या चालू लागलो तेव्हा |
विश्‍वासाचा सूर्य होऊनही रात्रीही जळणार ॥

जुने उखाणे निसटून गेले नवी नवी ही कोडी |
तळहातीच्या रेषांमधले गूढ पुन्हा कळणार ॥
पीक फुलेना पडीक शिवारी अंग चोरतो वारा |
उसने घेऊन आसू ढगांचे माती मी मळणार ॥

एकांताच्या गुहेत बसलो मौन पांघरून ओले |
विश्वमित्री मत हे केवळ मेनकेस कळणार ॥
तसा कुणाला नाही लावला फार असा मी लळा |
तरी माझिया उप्रान्ती बघ सारे हळहळणार ॥