न भूतो ‘इफ्फी’

0
119

– बबन भगत

यंदाच्या ‘इफ्फी’चे यश होते ते यावेळी आयोजित करण्यात आलेल्या वेगवेगळ्या मास्टर क्लासेस, वेगवेगळे पॅनल डिस्कशन्स, ओपन फोरम आदीत. यंदा हे कार्यक्रम खर्‍या अर्थाने यशस्वी करून दाखवण्यात आले. अभिनयापासून ‘चित्रपटनिर्मिती कशी करावी’, ‘नवे तंत्रज्ञान सिनेमासाठी तारक की मारक’, ‘सिनेमाची कथा कशी फुलवावी’, ‘चित्रपटात ध्वनीचा परिणामकारकपणे कसा वापर करावा’, ‘ब्रिक्समधील चित्रपट’, ‘रवींद्रनाथ टागोर यांचे साहित्य आणि चित्रपट’, ‘चित्रपटातील व्यक्तिरेखा आणि कलाकारांची निवड’, ‘एकाच प्रकारच्या भूमिका करण्याच्या चक्रातून कसे बाहेर पडावे’ अशा नाना प्रकारच्या विषयांवरील कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन यंदा जसे झाले तसे कधीच झाले नव्हते.

 

यंदाच्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे केवळ एका ओळीत वर्णन करायचे झाल्यास मी ‘न भूतो इफ्फी’ अशा शब्दांत करेन. सगळेच जण माझ्या या मताशी सहमत असतील असे नाही, पण ज्या कोणी यंदाच्या ‘इफ्फी’चा खर्‍या अर्थाने आनंद लुटतानाच त्याचे बारीक निरीक्षण केलेले असेल ते निश्‍चितच माझ्या मताशी सहमत असतील.

आतापर्यंत भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्याची जबाबदारी चित्रपट महोत्सव संचालनालय घेत असे; पण यंदा ती जबाबदारी प्रथमच राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाकडे (एनएफडीसी) सोपवण्यात आली. आणि एनएफडीसीनेही ‘इफ्फी’च्या आयोजनाचे शिवधनुष्य लिलया पेलले. त्यामुळे यंदाच्या ‘इफ्फी’च्या यशाचे श्रेय त्यांना द्यावेच लागेल. पण अर्थातच त्यांना या कामी सहकार्य केलेल्या आमच्या गोवा मनोरंजन सोसायटीलाही त्याचे श्रेय द्यावे लागेल.

‘इफ्फी’ म्हणजे केवळ चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणे असे बर्‍याच जणांना वाटत असते. ‘इफ्फी’त सहभागी न होणार्‍या सामान्य लोकांचा तर तसाच समज असतो. पण ‘इफ्फी’ जसा चित्रपटगृहात असतो तसाच तो चित्रपटगृहांच्या बाहेरही असतो. चित्रपटांविषयीची चर्चा, परिसंवाद, मास्टर क्लासेस, देश-विदेशांतील चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते यांच्याबरोबरचा संवाद व मुलाखती, त्यांच्या पत्रकार परिषदा यांद्वारे ‘इफ्फी’च्या प्रतिनिधींना व पत्रकारांना चित्रपट म्हणजे काय, खरा व अभिजात चित्रपट हा कसा असतो अथवा तो कसा असावा याचे पूर्ण ज्ञान मिळू शकते.

कोणत्याही चित्रपट महोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, तो सर्व प्रकारच्या चित्रपटांना सामावून घेत असतो. अट एकच असते, ती म्हणजे, चित्रपटाचा दर्जा. पण वादविवाद व विरोध यामुळे एक-एकदा चांगल्या व अभिजात अशा चित्रपटांनाही चित्रपट महोत्सवाची दारे बंद केली जातात. यंदा ‘एस्. दुर्गा’ या मल्याळम व ‘न्यूड’ या मराठी चित्रपटांबाबतीत तसं घडलं. यापैकी ‘एस्. दुर्गा’ या चित्रपटाला तर तब्बल दहा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.

‘न्यूड’ व ‘एस्. दुर्गा’मुळे गालबोट
मी वर म्हटल्याप्रमाणे यंदाचा इफ्फी ‘न भूतो’ असा झाला. मात्र, त्याला ‘न्यूड’ व ‘एस. दुर्गा’ या चित्रपटांच्या वादामुळे गालबोट लागले. दोन्ही अभिजात असे चित्रपट. पैकी ‘न्यूड’ चित्रपटाची तर ‘इफ्फी’तील इंडियन पॅनोरमा विभागातील ओपनिंग फिल्म म्हणून निवड झाली होती. ‘न्यूड’ हा रवी जाधव यांचा चित्रपट. त्यांनी मराठीतून मैलाचे दगड ठरावेत असे काही चित्रपट केलेले आहेत. मात्र, काही कट्टरपंथीय लोकांच्या विरोधामुळे ‘एस. दुर्गा’ व ‘न्यूड’ या चित्रपटांना ‘इफ्फी’तून वगळण्यात आल्यामुळे तो मोठा वादाचा विषय ठरला.

यंदाच्या ‘इफ्फी’विषयी बोलताना ‘इफ्फी’ने खर्‍या अर्थाने कात टाकली असेच म्हणावे लागेल. ‘इफ्फी’त अभिजात, सर्वांगसुंदर असे चित्रपट हे दरवर्षी पाहायला मिळतात, तसे ते यंदाही पाहायला मिळाले. मग यंदाचा ‘इफ्फी’ कोणत्या अर्थाने वेगळा होता, हा प्रश्‍न उभा राहतो.

यंदाच्या ‘इफ्फी’ची तशी खूप वैशिष्ट्ये आहेत. बारीक बारीक गोष्टी सोडल्यास यंदाच्या ‘इफ्फी’त आयोजनामध्ये गलथानपणा दिसून आला नाही, आणि त्याचे श्रेय अर्थातच गोवा मनोरंजन सोसायटीला द्यावे लागेल. पण गलथानपणा झाला नाही म्हणून ‘इफ्फी’ ग्रेट झाला असे म्हणणे हास्यास्पद ठरेल.
यंदाच्या ‘इफ्फी’चे यश होते ते यावेळी आयोजित करण्यात आलेल्या वेगवेगळ्या मास्टर क्लासेस, वेगवेगळे पॅनल डिस्कशन्स, ओपन फोरम आदीत. आता तुम्ही म्हणाल, हे कार्यक्रम तर दरवर्षीच्या ‘इफ्फी’त होतात. हो, तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण यंदाची गोष्ट वेगळी होती. यंदा हे कार्यक्रम केवळ नावासाठी आयोजित करण्यात आले नाहीत, तर ते खर्‍या अर्थाने यशस्वीही करून दाखवण्यात आले. अभिनयापासून ‘चित्रपटनिर्मिती कशी करावी’, ‘नवे तंत्रज्ञान सिनेमासाठी तारक की मारक’, ‘सिनेमाची कथा कशी फुलवावी’, ‘चित्रपटात ध्वनीचा परिणामकारकपणे कसा वापर करावा’, ‘ब्रिक्समधील चित्रपट’, ‘रवींद्रनाथ टागोर यांचे साहित्य आणि चित्रपट’, ‘चित्रपटातील व्यक्तिरेखा आणि कलाकारांची निवड’, ‘एकाच प्रकारच्या भूमिका करण्याच्या चक्रातून कसे बाहेर पडावे’ अशा नाना प्रकारच्या विषयांवरील मास्टर क्लासेस, परिसंवाद, ओपन फोरम आदींचे यशस्वी आयोजन यंदा जसे झाले तसे कधीच झाले नव्हते. या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने प्रतिनिधींनी लावलेल्या हजेरीमुळे हे कार्यक्रम यशस्वी होऊ शकले. दर एका मास्टर क्लासेसच्या वेळी तर सभागृहे तुडुंब भरल्याचे चित्र पाहावयास मिळाले. चांगल्या विषयावरील मास्टर क्लासेस, परिसंवाद आदींचे आयोजन करणे व ते यशस्वी करून दाखवणे हे ‘इफ्फी’सारख्या महोत्सवात तसे सोपे काम नसते. कारण प्रतिनिधींचा ओढा हा सिनेमागृहात जाऊन चित्रपट पाहण्याकडे असतो. अशा लोकांना ते सोडून गंभीर विषयावरील चर्चेकडे आकर्षित करणे हे सोपे काम नसते. पण ते करून दाखवण्यास एनएफडीसीला यश आले.

मास्टर क्लासेससाठी स्टार मंडळी
यंदाच्या ‘इफ्फी’त मास्टर क्लासेससाठी मोठ्या प्रमाणात स्टार मंडळीना आणण्यात एनएफडीसीला यश आले. त्यांत शेखर कपूर, सुशांत सिंह राजपूत, एकता कपूर, भूमी पेडणेकर, सुभाष घई, करण जोहर, भारतात व विदेशांत मिळून बॉक्स ऑफिसवर दीड हजार कोटींचा गल्ला जमवलेल्या ‘दंगल’ या चित्रपटाची टीम अशा लोकांच्या या मास्टर क्लासेस गाजल्या.

बॉलिवूडमधील स्टार मंडळी ‘इफ्फी’साठी मोठे योगदान देत असते अशातली गोष्ट नाही; पण ही स्टार मंडळी ‘इफ्फी’साठी आली की ‘इफ्फी’ला एक वेगळीच जान येते हे आपण नाकारू शकत नाही. आणि म्हणूनच ‘इफ्फी’च्या उद्घाटन व समारोप सोहळ्यासाठी शाहरूख खान, श्रीदेवी, सुशांत सिंह राजपूत, शाहीद कपूर, अमिताभ बच्चन, सलमान खान, कतरिता कैफ, सिद्धार्थ मल्होत्रा आदी मंडळी आली आणि उद्घाटन व समारोप सोहळा चमकदार झाला. पण खरं सांगायचं झाल्यास, ‘इफ्फी’तील खरे हिरो असतात ते आपल्या देशातील प्रादेशिक चित्रपटवाले आणि देश-विदेशांतून ‘इफ्फी’साठी व सौंदर्यकारी चित्रपटाचा नजराणा घेऊन येणारे अस्सल फिल्म मेकर्स. खरा सिनेमा म्हणजे काय ते याच लोकांकडून शिकावं. पैसा, प्रसिद्धी यांच्या मागे न धावता चित्रपटाकडे केवळ एक अभिजात अशी कला म्हणून पाहणारे हे अवलिया ‘इफ्फी’स्थळी जेव्हा चित्रपटांविषयी व आपल्या भावी स्वप्नांविषयी बोलतात तेव्हा डोळे पाणावल्यावाचून राहत नाहीत. कुणी चांगला सिनेमा बनवण्यासाठी आपली जमीन विकलेली असते, कुणी बायकोचे दागिने विकलेले असतात, तसेच डब्यात पडलेला एखादा चांगला चित्रपट तयार व्हावा यासाठी आपली जीवनभराची मिळकत पणाला लावणारे वेडेही असतात. या वेड्या लोकांनी बनवलेले चित्रपट पडद्यावर पाहताना मग ऊर भरून आल्याशिवाय राहत नाही.

‘इफ्फी’तील शॉर्ट फिल्म्स, माहितीपर, प्रादेशिक चित्रपट पाहणे हा एक वेगळाच आनंददायी असा अनुभव असतो. हे चित्रपट तुम्हाला एक व्यक्ती म्हणून समृद्ध बनवण्याचे काम करतात. वास्तववादी चित्र तुमच्या डोळ्यांपुढे ठेवतात. तुम्हाला विचार करायला लावतात. तुम्हाला बेचैन करतात.

प्रादेशिक चित्रपट
दरवर्षी ‘इफ्फी’त मोठ्या प्रमाणात प्रादेशिक चित्रपट दाखवले जातात. या चित्रपटांतून भारतातील खेडेगावातील दारिद्य्र पाहून मन सुन्न होऊन जातं.
‘व्हिलेज रॉकस्टार्स’, ‘आबा’, क्षितिज ः अ होराईझन‘ आदी काही चित्रपट यंदाच्या ‘इफ्फी’त पाहण्याची संधी मिळाली. भारतात अजून किती दारिद्य्र आहे, उपासमारी आहे याचे चित्र या चित्रपटांतून पाहताना जीव गलबलून गेला. असं प्रत्ययकारी चित्रण घडवणार्‍या कलाकारांना खरं तर आपण डोक्यावर घ्यायला हवं. पण आपण डोक्यावर घेतो ते आभासी जग पडद्यावर दाखवणार्‍या बॉलिवूडवाल्यांना.

आपल्या मास्टर क्लासमधून बोलताना सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई म्हणाले की, चित्रपट म्हणजे विविध कलांचा संगम आहे. चित्रपट दिग्दर्शकाला विविध कलांचे ज्ञान असल्यास तो चांगले चित्रपट बनवू शकतो. दिग्दर्शकाला कथा, पटकथा, संवाद, संगीत, अभिनय, कला दिग्दर्शन, गायन, संकलन यासंबंधीचं ज्ञान असल्यास तो त्या-त्या क्षेत्रातील कलाकारांकडून चांगलं काम करून घेऊ शकतो, आणि पर्यायाने एक उत्कृष्ट चित्रपट तयार होण्यास मदत होऊ शकते. घई यांच्या मास्टर क्लासला आलेले कित्येक भावी चित्रपट दिग्दर्शक हा संदेश नक्कीच घेऊन गेले असतील.

‘इफ्फी कट्टा’, ‘स्कील स्टुडिओ’, ‘बायोस्कोप व्हिलेज’ हे या वर्षीच्या ‘इफ्फी’तील नवे उपक्रम होते. ‘इफ्फी कट्‌ट्या’वर हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. तेथे त्यांच्या मुलाखतींचा कार्यक्रम रंगला. कित्येक कलाकारांनी तेथे मुलाखतींतून आपले विचार व मनोगत व्यक्त केले. ‘इफ्फी’च्या इतिहासात पहिल्यांदाच असा कट्टा उभारण्यात आला होता आणि तो यशस्वी झाला. खास गोव्यातील लोकांसाठी उभारण्यात आलेल्या ‘बायोस्कोप व्हिलेज’चाच ‘इफ्फी कट्टा’ हा भाग होता. ‘बायोस्कोप व्हिलेज’मधून विद्यार्थी व स्थानिक लोक यांना चित्रपटांचा आनंद लुटता आला. त्यामुळे ‘इफ्फी’ यंदा सर्वसमावेशक झाला. यंदा ‘इफ्फी’निमित्त ओपन स्क्रिनिंगही झालं आणि मडगाव शहरातही थिएटर्समधून चित्रपट दाखवण्यात आले. ‘स्कील स्टुडिओ’मधून चित्रपटाच्या विविध अंगांविषयी जाणून घेण्याची इच्छा असलेल्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

सुवर्ण मयूर चित्रपट ः ‘बीट्‌स पर मिनिट’
यंदा ‘बीट्‌स पर मिनिट’ या फ्रेंच चित्रपटाला सुवर्ण मयूर पुरस्कार प्राप्त झाला. १९९० साली पॅरिसमधील कार्यकर्त्यांनी तेथील एड्‌सग्रस्तांसाठी सरकार व फार्मास्युटिकल कंपन्या काहीही करीत नाहीत हे पाहून आंदोलन सुरू केलं होतं, त्यावर आधारित हा चित्रपट आहे. ‘एक्ट अप’ या संस्थेने हे आंदोलन केलं होतं. या संस्थेतील बरेच सदस्य हे समलैंगिक व एचआयव्ही पॉझिटिव्ह होते.

ओपनिंग फिल्म ः ‘बियॉन्ड दी क्लाऊड्‌स’
सुप्रसिद्ध इराणी दिग्दर्शक मजीद मजिदी यांच्या ‘बियॉन्ड दी क्लाऊड्‌स’ या हिंदी चित्रपटाने ‘इफ्फी’चा पडदा उघडला. मुंबईतील झोपडपट्टीत राहणार्‍या एका कुटुंबाची या चित्रपटातून व्यथा मांडण्यात आलेली आहे.

क्लोझिंग फिल्म ः ‘थिंकिंग ऑफ हिम’
यंदा इफ्फीचा पडदा पडला तो ‘थिंकिंग ऑफ हिम’ या अर्जेंटिनास्थित दिग्दर्शक पाब्लो सिजर यांच्या ‘थिंकिंग ऑफ हिम’ या चित्रपटाने. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर व अर्जेंटिना येथील साहित्यिक व्हिक्टोरिया ओकांपो यांच्यातील आध्यात्मिक नातेसंबंध हा या चित्रपटाचा विषय आहे. हा चित्रपट बंगाली, स्पेनिश व इंग्लिश या तीन भाषांतून बनवण्यात आलेला आहे.

अमिताभ बच्चनचा गौरव
‘इंडियन फिल्म ः पर्सोनेलिटी ऑफ दी इयर’ हा पुरस्कार देऊन अमिताभ बच्चन यांचा केलेला गौरव हेही यंदाच्या ‘इफ्फी’चे एक आकर्षण ठरले. समारोप सोहळ्यात बच्चन यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याने खास त्यासाठी समारोप सोहळ्याला आलेल्या लोकांचा आकडा फार मोठा होता. यावेळी अभिनेते अक्षय कुमार यांनी बच्चन यांना भारतीय चित्रपटसृष्टीत केवढे मोठे स्थान आहे हे सांगताना हॉलिवूडवाल्यांकडे सुपरमॅन, स्पायडरमॅन, बॅटमॅन असे सुपर हिरो आहेत, तर आमच्याकडे ‘अँग्री यंग मॅन’ अमिताभ बच्चन आहेत असे टाळ्यांच्या कडकडाटात सांगितले.

जीवन गौरव पुरस्कार
यंदाचा जीवनगौरव पुरस्कार कॅनडातील सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक ऍटॉन इगोयन यांना प्राप्त झाला.

मराठीचा झेंडा
यंदाच्या ‘इफ्फी’त मराठी चित्रपटसृष्टीचा झेंडा उंच फडकला असे म्हणण्यास हरकत नाही. मनोज कदम यांच्या ‘क्षितिज ः अ होराईझन’ या चित्रपटाला आयसीएफटी युनोस्को गांधी पुरस्कार प्राप्त झाला, तर प्रसाद ओक यांच्या ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटाला ‘इफ्फी’च्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी नामांकन मिळाले.

‘इफ्फी’ संचालक ः सुनिल टंडन
‘इफ्फी’चे संचालक सुनिल टंडन यांचा या लेखात मुद्दाम उल्लेख करावा असे ते महाशय आहेत. ‘इफ्फी’तील त्यांचा वावर हा त्यांचे कौतुक करावा असाच होता. टंडन हे निगर्वी व प्रेमळ. ‘इफ्फी’विषयी खूप आस्था असलेले अधिकारी.

‘इएसजी’चे कार्यही उल्लेखनीय
यंदा ‘इएसजी’नेही ‘इफ्फी’च्या आयोजनात कोणतीही कसर सोडली नाही. ‘इफ्फी’चे आयोजन करताना यंदा ‘इएसजी’ने स्थानिकांचा विचार करून, त्यांचीही चित्रपट पाहण्याची सोय करून त्यांनाही एकप्रकारे ‘इफ्फी’चा आनंद लुटू दिला. मडगाव शहरातील लोकांचीही ‘इएसजी’ने सोय केली. ‘इफ्फी’ परिसर नववधूसारखा नटवतानाही ‘इएसजी’ने कमालच केली.

कलाकारांची मांदियाळी
चित्रपटसृष्टीतील कलाकारांची मांदियाळी हेही यंदाच्या ‘इफ्फी’चे एक वैशिष्ट्य ठरले. बॉलिवूड व मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची यंदाच्या ‘इफ्फी’त गर्दी होती.
अमिताभ, शाहरूख, सलमान, अक्षय कुमार, कतरिना, हुमा कुरैशी, भूमी पेडणेकर, सुशांत सिंह राजपूत, करण जोहर, सुभाष घई, जॅकी श्रॉफ, अनुपम खेर आदी बॉलिवूडमधील आघाडीची मंडळी, तर दुसर्‍या बाजूने मराठी चित्रपटसृष्टीतील नट-नट्या व दिग्दर्शक यांच्या गर्दीमुळे इफ्फीला ‘चार चॉंद लग गये’ असेच म्हणावे लागेल.

यंदाचा इफ्फी खर्‍या अर्थाने यशस्वी झाला. त्याचमुळे असेल, तो कधी सुरू झाला आणि कधी संपला ते कळलेही नाही.
आता तर बॉलिवूडमधील कलाकारांसह सगळेच जण म्हणू लागलेत- ‘इफ्फीसाठी गोव्यापेक्षा चांगलं स्थळ असूच शकत नाही.’ इफ्फी व इफ्फीच्या आयोजकांसाठी याच्यापेक्षा चांगला कॉम्प्लिमेंट असूच शकत नाही.