न्यूझीलंड १२ धावांनी विजयी

0
71

ट्रेंट बोल्टने लागोपाठच्या चेंडूवर घेतलेल्या दोन बळींच्या मदतीने न्यूझीलंडने इंग्लंडचा काल टी-२० सामन्यात १२ धावांनी पराभव केला. बोल्टने १८व्या षटकाच्या शेवटच्या दोन चेंडूंवर ख्रिस जॉर्डन व लियाम प्लंकेट यांना माघारी धाडले. यामुळे पाहुण्यांची ८ बाद १६८ अशी स्थिती झाली. विजयासाठी १९७ धावांचे लक्ष्य असताना त्यांना १८४ धावांपर्यंतच पोहोचता आले.

ऑस्ट्रेलिया हा या मालिकेतील तिसरा संघ असून आपले तिन्ही सामने जिंकून त्यांनी २१ रोजी ईडन पार्कवर होणार्‍या अंतिम सामन्यातील आपली जागा निश्‍चित केली आहे. सलामीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाकडून सात गड्यांनी पराजित व्हावे लागल्यामुळे न्यूझीलंडसाठी हा सामना महत्त्वाचा होता.

काल न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ५ बाद १९६ धावा केल्या. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने ७२ धावांची खेळी करताना मार्टिन गप्टिलसह दुसर्‍या गड्यासाठी ८२ धावा जोडल्या. विल्यमसनने केवळ ४६ चेंडूंचा सामना करताना चार चौकार व चार षटकार लगावले तर गप्टिलने ४० चेंडूंत ६५ धावा जमवल्या. हॉंगकॉंगकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या मार्क चॅपमन याने काल न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने ३ चेंडूंत २० धावा केल्या. त्याच्याप्रमाणेच यष्टिरक्षक फलंदाज सिफर्टने पदार्पण करताना ६ चेंडूंत नाबाद १४ धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून आदिल रशीद व मार्क वूड यांनी प्रत्येकी दोन तर ख्रिस जॉर्डनने एक बळी घेतला.

धावांचा पाठलाग करताना जेसन रॉय लवकर बाद झाला. आलेक्स हेल्स (४७) व डेव्हिड मलान (५९) यांनी दुसर्‍या गड्यासाठी ६५ धावा जोडत चुरस वाढवली. तळाला डेव्हिड विलीने १० चेंडूंत २१ धावा जमवून विजयासाठी प्रयत्न केले. परंतु, तो धावबाद होताच इंग्लंडच्या उरलीसुरली आशा संपली. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्ट, मिचेल सेंटनर व ईश सोधी यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. साऊथीने एक बळी घेतला. शुक्रवारी न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे.