न्यूझीलंडने जिंकली टी-२० मालिका

0
78

कॉलिन मन्रोच्या विक्रमी तिसर्‍या टी-२० शतकाच्या बळावर न्यूझीलंडने तिसर्‍या व शेवटच्या टी-२० सामन्यात काल वेस्ट इंडीजचा ११९ धावांनी पराभव करत मालिका २-० अशी जिंकली. पावसामुळे दुसरा सामना रद्द करण्यात आला होता. मन्रो याने केवळ ५३ चेंडूंत १०४ धावांची खेळी करत आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटच्या इतिहासात तीन शतके लगावणारा जगातील पहिला खेळाडू होण्याचा मान मिळविला. त्याच्या या झंझावाती खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने ५ बाद २४३ अशी टी-२०मधील आपली सर्वाधिक धावसंख्या नोंदविली. यानंतर त्यांनी विंडीजचा डाव १२४ धावांत संपवला.

गप्टिल (६३) व मन्रो यांनी न्यूझीलंडला ११.३ षटकांत १३६ धावांची सलामी दिली. गप्टिलने आपली खेळी ५ चौकार व २ षटकारांसह सजवली तर मन्रोने तब्बल १० षटकार व केवळ ३ चौकार लगावून शतक पूर्ण केले. विंडीजतर्फे कार्लोस ब्रेथवेटने सर्वाधिक २ गडी बाद केले. विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजचे सलामीवीर चॅडविक वॉल्टन व ख्रिस गेल पहिल्याच षटकात परतले. गेलने तंबूचा रस्ता धरला तेव्हा विंडीजचे नुकतेच खाते उघडले होते. यानंतर ठराविक अंतराने त्यांचे गडी बाद होत राहिले. १६.३ षटकांत त्यांचा संघ आटोपला. दुखापतीमुळे शेय होप फलंदाजीसाठी उतरला नाही. तिसर्‍या स्थानावरील आंद्रे फ्लेचर याने ३२ चेंडूंत ४६ धावा केल्या. याव्यतिरिक्त त्यांच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. न्यूझीलंडकडून टिम साऊथीने ३, ट्रेंट बोल्ट व ईश सोधीने प्रत्येकी २ तर अनारू किचन याने १ गडी बाद केला. या सामन्यासह विंडीजच्या भयावह किवीज दौर्‍याची सांगता झाली. दोन्ही कसोटीत पराजित व्हावे लागल्यानंतर एकदिवसीय मालिकेतील तिन्ही सामन्यात विंडीजला पराभवांचे तोंड पहावे लागले होते. तीन टी-२० सामन्यांतील पूर्ण झालेल्या दोन्ही टी-२० सामन्यांतही त्यांना विजय मिळविण्यात अपयश आले.