न्यूझीलंडने चाखली पराभवाची चव

0
110

>> पाकिस्तानच्या विजयात बाबर, सोहेल, आफ्रिदीची चमक

बाबर आझमने ठोकलेले दहावे वनडे शतक व हारिस सोहेल (६४) याच्यासह त्याने केलेल्या १२६ धावांच्या भागीदारीच्या जोरावर पाकिस्तानने काल न्यूझीलंडचा ६ गडी व ५ चेंडू राखून पराभव केला. यंदाच्या क्रिकेट विश्‍वचषकातील किवी संघाचा हा पहिलाच पराभव ठरला. न्यूझीलंडने विजयासाठी ठेवलेले २३८ धावांचे किरकोळ लक्ष्य पाकिस्तानने ४९.१ षटकांत गाठले.

तत्पूर्वी, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. आमिरने गप्टिलचा त्रिफळा उडवत पाकिस्तानला जबरदस्त सुरुवात करुन दिली. यानंतर दुसरा सलामीवीर मन्रो आफ्रिदीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. रॉस टेलर, टॉम लेथम हे फलंदाजही आपल्या अनुभवाचा उपयोग संघाला करून देऊ शकले नाहीत. दुसर्‍या बाजूने कर्णधार केन विल्यमसनने खेळपट्टीवर तळ ठोकत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र शादाब खानच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक सर्फराजकडे झेल देऊन तो माघारी परतला. त्याने ४१ धावांची खेळी केली. यावेळी न्यूझीलंडची ५ बाद ८३ अशी स्थिती झाली होती.

जिमी नीशम व कॉलिन डी ग्रँडहोम यांनी संयमी खेळ करत संघाचा डाव सावरतानाच आपली अर्धशतके साजरी केली. संघाने द्विशतकी वेस ओलांडल्यानंतर ग्रँडहोम धावबाद होऊन माघारी परतला. मात्र नीशमने सेंटनरच्या साथीने संघाला २३७ धावांपर्यंत नेले. नीशमने नाबाद ९७ जमवत आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी केली.

धावफलक
न्यूझीलंड ः मार्टिन गप्टिल त्रि. गो. आमिर ५, कॉलिन मन्रो झे. हारिस गो. आफ्रिदी १२, केन विल्यमसन झे. सर्फराज गो. शादाब ४१, रॉस टेलर झे. सर्फराज गो. आफ्रिदी ३, टॉम लेथम झे. सर्फराज गो. आफ्रिदी १, जिमी नीशम नाबाद ९७ (११२ चेंडू, ५ चौकार, ३ षटकार), कॉलिन डी ग्रँडहोम धावबाद ६४ (७१ चेंडू, ६ चौकार, १ षटकार), मिचेल सेंटनर नाबाद ५, अवांतर ९, एकूण ५० षटकांत ६ बाद २३७
गोलंदाजी ः मोहम्मद हफीझ ७-०-२२-०, मोहम्मद आमिर १०-०-६७-१, शाहिन शाह आफ्रिदी १०-३-२८-३, इमाद वासिम ३-०-१७-०, शादाब खान १०-०-४३-१, वहाब रियाझ १०-०-५५-०
पाकिस्तान ः इमाम उल हक झे. गप्टिल गो. फर्ग्युसन १९, फखर झमान झे. गप्टिल गो. बोल्ट ९, बाबर आझम नाबाद १०१ (१२७ चेंडू, ११ चौकार), मोहम्मद हफीझ झे. फर्ग्युसन गो. विल्यमसन ३२, हारिस सोहेल धावबाद ६८, सर्फराज अहमद नाबाद ५, अवांतर ७, एकूण ४९.१ षटकांत ४ बाद २४१
गोलंदाजी ः ट्रेंट बोल्ट १०-०-४१-१, मॅट हेन्री ७-०-२५-०, लॉकी फर्ग्युसन ८.१-०-५०-१, कॉलिन डी ग्रँडहोम २-०-१२-०, मिचेल सेंटनर १०-०-३८-०, जिमी नीशम ३-०-२०-०, केन विल्यमसन ८-०-३९-१, कॉलिन मन्रो १-०-९-०

तीन हजारी बाबर
पाकिस्तानचा आघाडी फळीतील फलंदाज बाबर आझम याने काल एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन हजार धावांचा टप्पा ओलांडला. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात २९वी धाव घेत तो ‘तीन हजारी मनसबदार’ बनला. पाकिस्तानकडून सर्वांत कमी ६८ धावांत त्याने तीन हजार धावा केल्या. पाकचा माजी कर्णधार इंझमाम उल हकने बाबरपेक्षा १९ डाव जास्त खेळले होते. दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलाला तीन हजार धावांसाठी केवळ ५७ डाव खेळावे लागले होते.