न्यूझीलंडचा विंडीजवर ४७ धावांनी विजय

0
88
New Zealand's Glenn Phillips bats during the first Twenty20 international cricket match between New Zealand and the West Indies at Saxton Oval in Nelson on December 29, 2017. / AFP PHOTO / Marty MELVILLE

मन्रो व फिलिप्स यांच्या अर्धशतकानंतर गोलंदाज व क्षेत्ररक्षकांच्या भन्नाट कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडने काल शुक्रवारी झालेल्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडीजचा ४७ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ७ बाद १८७ धावा केल्या. विंडीज संघाचा डाव १९ षटकांत १४० धावांत संपला.
न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात संथ झाली. टेलरने गप्टिलला दुसर्‍या षटकात पायचीत करत संघाला पहिले यश मिळवून दिले. ग्लेन फिलिप्स तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. पॉवरप्लेमध्ये सॅम्युअल बद्रीने टिच्चून मारा केला. आठव्या षटकापर्यंत विंडीजचे वर्चस्व होते. केसरिकने टाकलेल्या ९व्या षटकात मात्र चित्र पालटले. मन्रोने या षटकांतील चौथ्या चेंडूवर चौकार व पुढील दोन चेंडूंवर सलग दोन षटकार खेचून हल्लोबोल करण्यास सुरुवात केली. नवव्या षटकाअखेर न्यूझीलंडची धावसंख्या १ बाद ७६ अशी होती. पुढच्याच षटकात मन्रोने आपले चौथे टी-२० अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतर जास्त वेळ तो खेळपट्टीवर टिकला नाही. ६ चौकार व २ षटकारांसह वैयक्तिक ५३ धावा करून त्याने तंबूचा रस्ता धरला. दुसर्‍या टोकाने ग्लेन फिलिप्स याने आपली फटकेबाजी सुरुच ठेवली. आंतरराष्ट्रीय टी-२०मधील आपले पहिले अर्धशतक लगावताना त्याने ४० चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह आपली अर्धशतकी खेळी सजवली. यानंतर रॉस टेलरने १३ चेंडूंत २० व सेंटनरने ११ चेडूंत नाबाद २३ धावा जमवून न्यूझीलंडला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली.

विंडीजच्या स्फोटक फलंदाजी फळीला या धावसंख्येचा पाठलाग यशस्वीपणे करणे शक्य होते. परंतु, किवीजच्या चपळ क्षेत्ररक्षणाने त्यांना पराभवाची चव चाखण्यास भाग पाडले. यष्टिरक्षक फिलिप्स याने सर्वप्रथम आपल्या यष्टिरक्षणाच्या जागेवरून तीस यार्ड सर्कल पार करत ख्रिस गेलच्या ‘टॉप एज’चे अप्रतिम झेलांत रुपांतर करत विंडीजला अनपेक्षित धक्का दिला. १०व्या षटकाअखेर विंडीजची ३ बाद ६१ अशी स्थिती होती. पुढील १० षटकांत १२च्या सरासरीने धावा काढण्याच्या प्रयत्नात त्यांचा दारुण पराभव झाला. रोव्हमन पॉवेल याचासुद्धा कठीण झेल फिलिप्सने घेतला. पदार्पणवीर किचनने ‘कर्व्हर्स’ क्षेत्रात वॉल्टनचा अफलातून झेल घेत आपल्या चपळतेचे दर्शन घडवले. विंडीजच्या शेय होपने या सामन्याद्वारे टी-२० पदार्पण केले. परंतु, त्याला केवळ १५ धावा करता आल्या. न्यूझीलंडकडून पदार्पण केलेल्या जलदगती गोलंदाज रेन्स याने ३ बळी घेतले. विंडीजकडून आंद्रे फ्लेचर याने सर्वाधिक २७ धावा केल्या. तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा टी-२० सामना १ जानेवारी रोजी खेळविला जाणार आहे.

धावफलक
न्यूझीलंड ः मार्टिन गप्टिल पायचीत गो. टेलर ५, कॉलिन मन्रो झे. ब्रॅथवेट गो. नर्स ५३, ग्लेन फिलिप्स त्रि. गो. बद्री ५५, टॉम ब्रूस पायचीत गो. टेलर २, रॉस टेलर झे. टेलर गो. ब्रॅथवेट २०, अनारू किचन त्रि. गो. विल्यम्स १२, मिचेल सेंटनर नाबाद २३, डग ब्रेसवेल झे. व गो, ब्रॅथवेट ०, टिम साऊथी नाबाद १०, अवांतर ७, एकूण २० षटकांत ७ बाद १८७
गोलंदाजी ः सॅम्युअल बद्री ४-०-२२-१, जेरोम टेलर ४-०-४१-२, केसरिक विल्यम्स ४-०-५२-१, कार्लोस ब्रॅथवेट ४-०-३८-२, ऍश्‍ले नर्स ४-०-३१-१
वेस्ट इंडीज ः चॅडविक वॉल्टन झे. किचन गो. रेन्स ७, ख्रिस गेल झे. फिलिप्स गो. रेन्स १२, आंद्रे फ्लेचर यष्टिचीत फिलिप्स गो. सोधी २७, शेय होप झे. मन्रो गो. ब्रेसवेल १५, जेसन मोहम्मद झे. टेलर गो. ब्रेसवेल ३, रोव्हमन पॉवेल झे. फिलिप्स गो. साऊथी ६, कार्लोस ब्रॅथवेट झे. ब्रूस गो. साऊथी २१, ऍश्‍ले नर्स नाबाद २०, केसरिक विल्यम्स झे. फिलिप्स गो. सेंटनर ३, जेरोम टेलर झे. ब्रूस गो. साऊथी २०, सॅम्युअल बद्री पायचीत गो. रेन्स २, अवांतर ७, एकूण १९ षटकांत सर्वबाद १४०
गोलंदाजी ः सेथ रेन्स ४-०-३०-३, टिम साऊथी ४-०-३६-३, डग ब्रेसवेल २-०-१०-२, अनारू किचन १-०-१०-०, मिचेल सेंटनर ४-०-२१-१, ईश सोधी ४-०-३०-१