न्यूझीलँडला अजिंक्यपदाचे स्वप्न!

0
103

– महेश गावकर

आजपासून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँडच्या भूमीवर तब्बल ४४ दिवस विश्‍व चषक क्रिकेटचा थरार रंगणार आहे. सुसज्ज अशा १४ मैदानांवर जगातील १४ अव्वल संघ जेतेपदासाठी सर्वस्व पणाला लावणार आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये जागतिक क्रमवारीत प्रथम असलेल्या यजमान ऑस्ट्रेलिया यंदा प्रबळ दावेदार मानला जात आहे. मात्र, संयुक्त यजमानपद भूषविणार्‍या युवा दमाच्या ब्रँडन मॅक्कुलमच्या न्यूझीलँड संघात जग्गजेतेपदाला गवसणी घालण्याची क्षमता ठासून भरली आहे.संयुक्त यजमान असलेल्या न्यूझीलँडला अद्याप विश्‍व चषक क्रिकेट अजिंक्यपदाची चव चाखता आलेली नाही. आत्तापर्यंत झालेल्या सर्व दहाही स्पर्धांत चमकदार कामगिरी करूनही न्यूझीलँडला अजिंक्यपदाने हुलकावणी दिलेली आहे. मात्र, यंदा झुंजार खेळाडू गणल्या जाणार्‍या ब्रँडन मॅक्कुलमच्या नेतृत्वाखाली न्यूझीलँड इतिहास रचण्यास सज्ज झाली आहे. घरच्या मैदानावर खेळणार असल्याने या युवा दमाच्या टीमचा आत्मविश्‍वास दुणावला आहे. यंदा विश्‍व चषक क्रिकेट स्पर्धेत उतरलेली न्यूझीलँडची टीम आत्तापर्यंतची सर्वांत शक्तिशाली मानली जाते. या संघाचा कर्णधार ब्रँडन मॅक्कुलमसह इतर सर्व खेळाडूंमध्येही स्वत:च्या बळावर सामना फिरवण्याची ताकद आहे. अनुभवी रॉस टेलर, युवा विस्फोटक फलंदाज कोरी एंडरसन, घणाघाती फटकेबाजीसाठी प्रसिद्ध ब्रँडन मॅक्कुलम, तेजतर्रार टिम साउथी असे दिग्गज खेळाडू यंदाच्या किवी संघाची खरी ताकद आहे. त्यांच्या गटातील स्कॉटलँड, अफगाणिस्तान या दुबळ्या संघांना मोठ्या फरकाने हरविण्याची जबाबदारी या संघावर आहे. तसेच ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि इंग्लंड या संघांना धूळ चारण्याचे मोठे आव्हान असेल. किवी संघातील भरात असलेले मातब्बर खेळाडू पाहिल्यास त्यांच्याच अजिंक्यपदाला गवसणी घालण्याची क्षमता नक्कीच आहे.
किवीने आत्तापर्यंत झालेल्या दहा विश्‍व चषक क्रिकेट स्पर्धांत चमकदार कामगिरी केलेली आहे. १९७५, १९७९, १९९२, २००७ आणि २०११ साली झालेल्या स्पर्धांत या संघाने उपांत्य फेरीपयर्र्त धडक दिली आहे. हा एक विक्रम आहे. १९८३ व १९८७ सालच्या स्पर्धेत सहावे, १९९६ साली सातवे आणि २००३ मध्ये पाचवे स्थान न्यूझीलँड संघाने पटकाविले होते. विश्‍व चषक क्रिकेट स्पर्धेत या संघाने एकूण ७० सामने खेळले आहेत; पैकी ४० जिंकले आहेत. २९ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला, तर एक अनिर्णित राखला आहे. या संघाची विजयाची टक्केवारी ५७.१४ अशी आश्‍वासक आहे.
किवी संघाचा कर्णधार ब्रँडन मॅक्कुलमच्या खांद्यावर यंदा मोठी जबाबदारी आहे. स्वगृही वातावरणाचा लाभ उठवत कल्पक नेतृत्वाच्या बळावर देशाला पहिले जेतेपद मिळवून देण्याचे स्वप्न साकारण्यासाठी त्याला कसब पणाला लावावे लागणार आहे. तो स्वत: विस्फोटक फलंदाज म्हणून ख्यात आहे. विरोधी गोलंदाजांची पिसे काढण्याची क्षमता त्याच्यात आहे. अलीकडे झालेल्या सामन्यांमध्ये त्याने धावांचा रतीब पाडला आहे. एकदिवसीय, ट्वेंटी – २० आणि कसोटी अशा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये त्याचा दबदबा आहे.
धडाकेबाज कोरी एंडरसन हा किवी संघाचा आणखी एक आधारस्तंभ आहे. युवा दमाच्या या खेळाडूने आत्तापर्यंत केवळ २५ च्या आसपास आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले असले तरी धुवाधार फलंदाजीमुळे तो जगाच्या कानाकोपर्‍यांतील क्रिकेटप्रेमींचा लाडका बनला आहे. पदार्पणाच्या सत्रात वन-डेत सगळ्या जलद शतक नोंदवण्याचा विक्रम त्याने केला होता. (हल्लीच दक्षिण आफ्रिकेच्या ए. बी. डिविलीयर्सने तो मोडला). विश्‍व चषक स्पर्धेत कोरीला रोखणे प्रतिस्पर्ध्यांना मोठे आव्हान असेल, यात तीळमात्र शंका नसावी.
न्यूझीलँड संघाचा पूर्वकर्णधार रॉस टेलर या स्पर्धेत हुकुमाचा एक्का मानला जातो. ठासून भरलेला अनुभव, धडाकेबाज फलंदाजीच्या बळावर तो संघाला खूपच तारक ठरणार आहे. मध्यम फळीचा आधारस्तंभ असलेला हा प्रतिभावंत असा खेळाडू आहे. टीम संकटात असताना त्याचा खेळ उंचावतो, अशी आजपर्यंतची पार्श्‍वभूमी आहे. आणि विशेष म्हणजे, तो स्वगृही खेळणार असल्याने त्याला रोखणे प्रतिस्पर्धी गोलंदाजांना डोईजड ठरणार आहे.
अवघ्या २३ वर्षांच्या युवा दमाच्या केन विलियमसन याच्या कामगिरीकडेही सर्वांचा नजरा असेल. तो किवी संघाचा कणा मानला जातो. सातत्याने धावांचा पाऊस पाडत त्याने संघाचे अनेक विजय साकारले आहेत. त्याला बाद करण्यासाठी विरोधी संघाला घाम गाळावा लागतो. संयत आणि आक्रमक फलंदाजी विशेषत: असलेल्या या खेळाडूची भूमिका किवी संघासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
न्यूझीलँड संघाची गोलंदाजी प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरवणारी अशी आहे. तेज तर्रार ट्रेंड बोल्ट, काईल मिल्स आणि अनुभवी द्रुतगती टिम साउथी यांच्यात विरोधी संघाची दाणादाण उडवण्याची क्षमता आहे. त्यांच्या दिमतीला प्रदीर्घ अनुभवी लेगस्पीनर डॅनियल वितोरी, नाथन मॅक्कुलम असल्याने विरोधी फलंदाजांना नक्कीच जड जाणार आहे. टिम साउथीची तेजतर्रार आणि बाऊंसरचा मिश्रण असलेली गोलंदाजी विरोधकांची भंबेरी उडवण्याची शक्यता आहे.
एकंदरीत, यंदाच्या विश्‍व चषक क्रिकेट स्पर्धेत उतरलेली किवीची टीम आत्तापर्यंतची शक्तिशाली मानली जाते. अनुभवी आणि युवा दमाच्या खेळाडूंचा मिलाफ या संघात आहे. घरच्या मैदानावरचे पोषक वातावरण, ब्रँडन मॅक्कुलमचे सक्षम नेतृत्व, कोरी एंडरसन, केन विलियमसन सारखे दमदार खेळाडू, रॉस टेलर, डॅनियल वितोरी यांचा प्रदीर्घ अनुभव या सगळ्यांच्या भक्कम बळावर न्यूझीलँड निश्‍चितच पहिल्या विश्‍व चषक अजिंक्यपदाला गवसणी घालू शकतो. आणि हो, या संघाने तसे स्वप्न पाहिले आहे आणि ते प्रत्यक्षात उतरविण्यास किवी संघ आतुर झाला आहे.