नौदलाचे लढाऊ विमान ‘दाबोळी’वर दुर्घटनाग्रस्त

0
127

दाबोळी येथील भारतीय नौदलाच्या विमानतळावरील धावपट्टीवर भारतीय नौदलाचे मिग-२९ के हे लढाऊ विमान काल दुर्घटनाग्रस्त झाले. काही तांत्रिक बिघाडामुळे सदर लढाऊ विमान धावपट्टीबाहेर घसरल्याने त्याने पेट घेतला. सुदैवाने वैमानिकाने प्रसंगावधान राखून आपत्कालीन यंत्रणेद्वारे विमानातून बाहेर उडी मारण्यात यश मिळविल्याने तो किरकोळ जखमांवर बचावला. त्याच्यावर नौदलाच्या येथील हॉस्पिटलात उपचार चालू असून तो सुखरूप असल्याची नौदल अधिकार्‍यांनी माहिती दिली. या विमानाला अशा मोठ्या स्वरुपाचा अपघात होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

प्राप्त माहितीनुसार दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी नौदलाचे मिग-२९ के हे लढाऊ विमान आपल्या रोजच्या सरावासाठी तयार झाल्यानंतर वैमानिकाने विमान पुढे नेले. दाबोळी येथील आयएनएस हंस या धावपट्टीवर उड्डाण करण्याच्या तयारीत असताना विमानात काही तांत्रिक बिघाड असल्याचे वैमानिकाच्या लक्षात येताच त्याने सदर विमान थांबवण्याचा प्रयत्न केला असता विमान धावपट्टीवरून घसरून धावपट्टीबाहेर गेले. त्याचवेळी वैमानिकाने प्रसंगावधान राखून तांत्रिक यंत्रणेचा वापर करून विमानातून बाहेर उडी मारण्यात यश मिळविले. सुदैवाने यात वैमानिक किरकोळ दुखापतीवर बचावला. दरम्यान, विमान धावपट्टीबाहेर गेल्याने लगेच विमानाने पेट घेतला. हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला अपघाताविषयी कळताच त्यांनी सर्व आपत्कालीन सेवा विभागांना माहिती देताच नौदलाचे पाण्याचे बंब व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आगीवर ताबडतोब नियंत्रण आणले व आग विझविली. यावेळी वैमानिकाला तात्काळ रुग्णवाहिकेतून नौदलाच्या आय. एन. एच. जीवन्ती या हॉस्पिटलात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

नागरी विमानांसाठी दोन तास धावपट्टी बंद
अपघात घडला त्या बाजूला या विमानतळावर मोठ्या प्रमाणात विमाने उतरतात व उड्डाणेही करतात. या दुर्घटनेमुळे या धावपट्टीची सुरक्षितता पडताळून पाहण्यासाठी धावपट्टी सुमारे दोन तास नागरी हवाई विमानासाठी बंद ठेवण्यात आली. त्यामुळे इंदूर-गोवा ते हैद्राबाद (इंडिगो), मुंबई-गोवा ते मुंबई (जेट एअरवेज), पुणे-गोवा ते मुंबई (एअर इंडिया), दिल्ली-गोवा ते बेंगलोर (गो एअर) ही चार विमाने वळविण्यात आली. त्यानंतर दोन तासांनी धावपट्टी चालू केल्यानंतर विमाने उतरविण्यात आली. तसेच उड्डाणेही सुरू करण्यात आली. दुर्घटनेमुळे दाबोळी विमानतळावरील प्रवासी अडकून राहिले.

केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने ११ मे २०१६ साली रशियाकडून मिग-२९ के विमाने खरेदी केली होती. भारतीय नौदलाची विमानवाहू युद्धनौका आय.एन.एस. विक्रमादित्य या जहाजावर बहुतेक तैनात करण्यात आलेली आहेत. त्यापैकी तीन विमाने प्रशिक्षणासाठी आयएनएस हंस या नौदलाच्या हवाई तळावर ठेवण्यात आलेली असून काल अपघात झालेले त्यापैकी एक विमान आहे.

एफसी गोवा फुटबॉल संघाला फटका
दरम्यान, काल दुपारी झालेल्या दुर्घटनेमुले विमानतळावरील धावपट्टी देशी विमानांसाठी दुपारी दोन तास बंद ठेवण्यात आल्याने काही विमानांचे उड्डाण लांबणीवर पडले. याचा फटका गोव्याच्या एफसी गोवा फुटबॉल संघाला बसला. सदर संघ मंगळवारी कोलकाता येथे जायला दाबोळी विमानतळावर आला असता ते ज्या विमानातून प्रवास करणार होते त्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते रद्द करण्यात आले होते. त्यामुळे काल हा संघ दुपारी रवाना होणार होता. पण तत्पूर्वी १२ च्या दरम्यान, सदर अपघात घडल्यामुळे त्यांचे उड्डाण लांबणीवर पडले. त्यामुळे त्यांचा काल रात्री ८ वाजता होणारा सामाना ९.१५ वाजता ठेवण्यात आला. सुमारे २३ तासांच्या उशिराने सदर संघ कोलकाताला रवाना झाला. त्यामुळे त्यांना सरावही करण्यास वेळ मिळाला नाही.

अपघाताचे नेमके कारण चौकशीअंतीच ः बहल
पणजी ः या विमान अपघाताविषयी माहिती देताना नौदलाच्या गोवा विभागाचे ध्वजाधिकारी रिअर ऍडमिरल पुनित के. बहल यांनी सांगितले की, हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाल्याचे स्पष्ट असले तरी त्याला मानवी चूक कारणीभूत आहे की विमानाच्या यंत्रणेतील दोष याबाबतीत या क्षणी सांगणे योग्य ठरणार नाही. या संदर्भात योग्य चौकशीअंतीच माहिती द्यावी लागेल. विमानतळ नागरी विमाने उतरण्यास दहा मिनिटांचा अवधी असताना हा अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले.